Wednesday, February 18, 2015

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे़़़

इतके दिवस शरद पवार आणि भाजपाची जवळीक, पवार आणि मोदींचे गुफ्तगू, पवार आणि मोदींच्या गुप्त भेटी अशी आवई अधूनमधून उठत असे; पण असे चोरून­लपून काही करणे योग्य नसल्याचे दोहो बाजूंना पटले. त्यातूनच खुल्लम खुल्ला समोर येण्याचे त्यांनी ठरवले असावे़ यापुढे आपल्याला भाजपा अस्पृश्य नाही, अशी मनाची तयारी करण्याचा संदेशच जणू त्यांनी कार्यकर्त्यांना दिला़
अखेर ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या दिवशी बारामतीमध्ये नरेंद्र मोदी आणि शरद पवारांचे जमले़ एकमेकांच्या प्रेमाच्या आणाभाका झाल्या़ इतके दिवस अधिकृतपणे लोकांसमोर न आलेल्या मोदी­पवारांनी ‘व्हॅलेंटाईन्स डे’चा दिवस निवडला आणि एका व्यासपीठावर येऊन खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो, इस दुनिया से नही डरेंगे हम दोनो़़़ असा संदेश देऊन टाकला़ जणूकाही भाजपा­राष्ट्रवादीचे हॅपी एंडिंग झाले, असे वाटले़ भाजपा­राष्ट्रवादी के जनम जनम के फेरे असल्याचा भास सर्वांना झाला़ याचे कारणच तेवढे उघड होते, प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आपल्या भाषणात सांगितले की, महिन्यातून दोन दिवस तरी एकमेकांशी बोलल्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही़ देशाच्या विकासासाठी पवारांचा सल्ला मोदींना महत्त्वाचा वाटतो आणि त्याच कारणास्तव पक्षविरहित सत्ताकारण पवारांना भावते यातच सारे काही आले़ मोदी म्हणाले की, बारामतीला मती आणि गती दोन्ही असल्यामुळे प्रगती झाली़ त्यांचे हे वक्तव्य ऐकून पवारांना मती आहे आणि मोदींना गती आहे, त्यातून देशाची की दोघांची प्रगती होणार आहे, हे त्यांनाच ठाऊक़ लोकसभा आणि विधानसभा प्रचारादरम्यान दोघांनी एकमेकांवर जे टीकास्त्र सोडले त्याची चूकभूल द्यावी­घ्यावी, एकमेकांना माफ करावे, अशी कबुली देऊन आपल्या अनेक वर्षांच्या दोस्तीचे त्यांनी गुणगान गायले़ नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी ही नॅशनॅलिस्ट करप्ट पार्टी म्हणजे राष्ट्रवादी भ्रष्ट पार्टी असल्याचा हल्ला मोदींनी चढवला होता़ परवा बारामतीमध्ये नॅशनॅलिस्ट क्लेव्हर पार्टी असे म्हणत त्यांनी पवारांची प्रशंसा केली, पवार आणि त्यांच्या पक्षाचा गौरव केला़ पवारांचे निमंत्रण तत्काळ स्वीकारून एकाच व्यासपीठावर बसलेल्या मोदी­पवारांचा ‘व्हॅलेंटाईन्स डे’ उभ्या भारताने पाहिला़
इतके दिवस शरद पवार आणि भाजपाची जवळीक, पवार आणि मोदींचे गुफ्तगू, पवार आणि मोदींच्या गुप्त भेटी अशी आवई अधूनमधून उठत असे; पण असे चोरून­लपून काही करणे योग्य नसल्याचे दोहो बाजूंना पटले. त्यातूनच खुल्लमखुल्ला समोर येण्याचे त्यांनी ठरवले असावे़ यापुढे आपल्याला भाजपा अस्पृश्य नाही, अशी मनाची तयारी करण्याचा संदेशच जणू त्यांनी कार्यकर्त्यांना दिला़मोदी­पवारांनी एकमेकांचे जाहीर गोडवे तर गायलेच; पण आतून काही राजकारण शिजले का? त्यांनी नेमक्या आणाभाका तरी काय घेतल्या असाव्यात? त्यांची उघड भेट म्हणजे पुढील सत्ताकारणाची नांदी तर नव्हे, अशा अनेक प्रश्नांच्या चर्चा होऊ लागल्या आहेत़ एक मात्र खरे की, मोदींनी म्हणजेच भाजपाने राष्ट्रवादीवरील भ्रष्टाचाराच्या केसेस मागे घेईपर्यंत ‘अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नही’ असे मोदींना वारंवार ऐकवले जाईल की काय, अशी शंका लोकांना आल्याशिवाय राहत नाही़ आपल्यावर असलेली भ्रष्टाचाराची आपत्ती दूर करणे सर्वस्वी मोदींच्या हाती आहे, तर मोदींवर आलेली शिवसेनेची आपत्ती दूर करण्याचा, बाहेरून पाठिंब्याचा जालीम उपाय शरद पवारांपाशी आहे़ त्यामुळे एकमेकांना आपत्ती निवारणात साहाय्य करणारे हे जीवलग मित्र एकत्र आले, हे बरे झाले़  मोदी­पवारांच्या एकत्र येण्याने राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि महादेव जानकर यांची अस्वस्थता मात्र वाढतच चालली आहे़ महादेव जानकरांनी धनगरांना आरक्षण मिळण्यासाठी संपूर्ण विधानसभा निवडणूक प्रचार पणाला लावला, उपोषणाला बसले. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या व्यासपीठावर जाऊन आरक्षण देण्याचे कबूल केले आणि उपोषण सोडवले़ सत्ता मिळाल्यानंतर आरक्षणातला ‘आ’देखील कोणी उच्चारला नाही; पण बारामतीमध्ये धनगरांची मोठी संख्या लक्षात घेता यापुढील काळात सुप्रियातार्इंच्या निवडून येण्याची कायमची सोय करायची असल्यामुळे दस्तुरखुद्द पवारांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला; परंतु मोदींना आदिवासी अर्थात वनवासी समोर दिसत असल्यामुळे त्यांनी या मुद्द्याला शिताफीने बगल दिली, ही गोष्ट निराळी़ त्यामुळे जानकरांवर हात चोळत बसण्याची वेळ आली़ जानकरांचे असे होणारच होते. लोकसभा निवडणुकीत महायुती असूनही जानकरांच्या प्रचारासाठी मोदी आले नव्हते़ पवारांच्या विनंतीला मान देऊन बारामतीत येण्याचे त्यांनी टाळले होते, याची आठवण अनेकांना झाली़ राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची परिस्थितीही काही निराळी नव्हती़ ऊस आम्ही पिकवला, गुºहाळ आम्ही घातले; पण आम्हाला रस नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे़ पश्चिम महाराष्ट्रात शेतकºयांचे समर्थन असलेल्या राजू शेट्टींना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान नाही आणि महाराष्ट्रात सदाभाऊ खोतांना कोणतेही पद दिलेले नाही़ या दोघांची ताकद वाढली तर राष्ट्रवादीचे काय होणार? हा पवारांना भेडसावणारा प्रश्न मोदींनी लिलया सोडवला असून पवारांना अडचणीचे ठरणाºया शेट्टी, खोत, जानकर यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्णय केला़ याला म्हणतात दोस्ती़ म्हणूनच शरद पवार वारंवार म्हणत असतात, ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’़ याला पुष्टी म्हणून राष्ट्रवादीवाले असेही सांगत सुटले आहेत की, आमची दोस्ती वाजपेयींच्या काळापासून आहे़ तेही खरेच म्हणा, अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना आपत्ती निवारणातला पवारांचा गाढा अभ्यास पाहता त्यांनी पवारांना आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद देऊन लाल दिव्याची गाडीदेखील दिली होती़ पवारांसाठी वाजपेयी आणि मोदी, म्हणजेच भाजपाने एवढे का करावे, शरद पवार हे पहिल्यांदा १९७८मध्ये महाराष्ट्रात पुलोदचे मुख्यमंत्री झाले. त्या वेळी त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात भाजपाचा समावेश करून घेतला होता़ ज्या भाजपाची महाराष्ट्रात किंचितही ताकद नव्हती, त्या भाजपाला मंत्रीपदांची ताकद मिळाल्यामुळे भाजपाचा विस्तार होऊ लागला आणि आज भाजपाच्या विस्ताराची जी घोडदौड सुरू झाली, त्याचा पाया पवारांनी घातला होता़ त्यामुळे आज पवारांना भाजपाची मिळणारी मदत ही कदाचित परतफेड असू शकते़
मोदी­पवारांनी आपली दोस्ती अधिक घट्ट करण्याकरिता सत्ताकारणामध्ये एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत़ कदाचित बारामतीतील भेट ही पुढील सत्ताकारणाची नांदीच म्हटली पाहिजे़ खरे तर काँग्रेसचे कृषीमंत्री असताना गुजरातमध्ये जाऊन नरेंद्र मोदींना तेथील हरितक्रांतीसाठी युक्तीच्या चार गोष्टी सांगणारे पवार हे भाजपा सरकारचे कृषीमंत्री झाले तर बिघडले कुठे? यापुढचा काळ पक्षविरहित सत्ताकारणाचा असल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे़ अर्थात एकमेकांना विकासपुरुष म्हटल्याने सर्वसामान्य माणसांचा खºया अर्थाने विकास होईल, असे मानणे धार्ष्ट्याचे ठरेल. खरोखर विकास झाला असता तर ‘आप’चा उदय झालाच नसता आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसमुक्त दिल्ली करण्यासाठी लोकांनी अरविंद केजरीवालांवर विश्वास टाकला नसता़ देशभर सुसाट सुटलेला भाजपाचा अश्वमेध दिल्लीत रोखण्यात त्यांना यश आले आहे़


जाता जाता...
अण्णांनी रचिला पाया...
‘ज्ञानदेवे रचिला पाया,
उभारिले देवालया...
तुका झालासे कळस,
भजन करा सावकाश...’
या बहिणाबार्इंच्या अभंगाची आठवण दिल्लीतील सत्तांतराच्या अभूतपूर्व क्रांतीने झाली खरी़ अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीने केलेली ही क्रांती एका दिवसात झालेली नाही़ या क्रांतीचा पाया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रचला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही़ दिल्लीच्या जंतरमंतर येथे, तसेच रामलीला मैदानावर भ्रष्ट सत्ताधाºयांचा पर्दाफाश करून जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी आग्रही भूमिका घेतली़ त्यांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले़ वर्षानुवर्षे देशावर राज्य करणारे सत्ताधारी राजकीय पक्ष व त्यांचे नेते भ्रष्टाचारी आहेत, मतलबी आहेत आणि देशाची लूट करीत आहेत़ हे सर्व संगनमताने होत असल्याचे वास्तव अण्णांच्या आंदोलनाने अधिक गडद झाले़ सर्वसामान्य माणसाचा या भ्रष्टाचाºयांनी विचारच केलेला नाही. त्यांना गरिबीच्या खाईत लोटले आणि आपण मात्र करोडोंची माया गोळा केली, हे कटुसत्य लोकांच्या मनावर बिंबवण्यात अण्णा यशस्वी झाले आणि त्यांना देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळू लागला़ त्यातूनच अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी यांच्या नेतृत्वाचा उदय होऊन आम आदमी पार्टी अस्तित्वात आली़ पुढे मतभेदातून बेदी बाहेर पडल्या तरी उत्कृष्ट संघटन कौशल्य आणि आंदोलनाचे मार्केटिंग यांच्यामुळे केजरीवालांचे जनसमर्थन वाढत गेले़ अण्णांनी इमारतीचा जो मजबूत पाया रचला त्यावर कळस चढवण्याचे काम त्यांनी केले़

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP