Tuesday, May 26, 2015

श्रीलंकेतील बुद्ध पौर्णिमा उत्सवाचा बोध

गणपती, नवरात्र आणि महापुरुषांच्या जयंती यांच्यासाठी उत्सवाचे निमित्त साधून कार्यकर्ते वर्गणीच्या नावाने खंडणी गोळा करत असतात़ याला लगाम घालणार कोण? या प्रकाराने चंगळवादाला प्रोत्साहन मिळत असून तरुण पिढी भोगवादी संस्कृतीकडे ढकलली जात आहे़ श्रीलंकेतील उत्सवाप्रमाणे येथील उत्सवांमध्ये
सौजन्य असायला हवे, तरच हे उत्सव एका विशिष्ट जाती धर्माचे न राहता ते सर्वांचे होतील़


भारतात बौद्ध धम्माचा उदय झाला असला, तरी आशिया खंडातील जपान, श्रीलंका, थायलंड, तिबेट, ब्रह्मदेश,म्यानमार, तैवान हे देश बौद्ध धर्मीय आहेत़ चीन, कोरिया, लाओस, व्हिएतनाम, मंगोलिया, कंबोडिया या देशांमध्ये तसेच पश्चिमेकडे युरोप, अमेरिका, आफ्रिका या देशांमध्येही बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे़ वाढता दहशतवाद आणि युद्धस्थिती या पार्श्वभूमीवर शांततेचा संदेश देणारा बुद्ध जगाला तारू शकतो़ या वास्तवाची जाणीव त्यांनी ठेवली आहे़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात धम्माचे पुनरुज्जीवन केल्यानंतर आणि त्यांच्या अनुयायांना धम्मदीक्षा दिल्यानंतर येथे धम्मप्रचाराचे कार्य सुरू झाले; परंतु इतर देशांमध्ये ज्याप्रमाणे श्रद्धेने धम्माचे पालन केले जाते तसे भारतात होते का? याविषयी शंका आहे़ यंदा श्रीलंकेतील बुद्ध पौर्णिमा उत्सव पाहिला, ३ ते १० मे या कालावधीत संपूर्ण आठवडाभर चाललेल्या या उत्सवाचा अनुभव घेत असताना भारतातील विशेषत: महाराष्ट्रातील उत्सवांची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही़ श्रीलंकेत बुद्ध पौर्णिमा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो़ बुद्ध जयंती, बुद्धाला दिव्यज्ञान प्राप्त झालेला दिवस आणि बुद्धाचे महापरिनिर्वाण या तिन्ही घटना वैशाख पौर्णिमेला म्हणजेच बुद्ध पौर्णिमेलाच झाल्या असल्याचे मानले जाते़ त्यामुळे बुद्ध पौर्णिमेला विशेष महत्त्व आले आहे. ७ ते १० दिवस चाललेला श्रीलंकेतील बुद्ध पौर्णिमा उत्सव आणि आपल्या देशात साजरा करण्यात येणारा बुद्ध जयंती आणि आंबेडकर जयंती उत्सव यात प्रचंड तफावत जाणवली़ श्रीलंकेतील उत्सवात जाणवणारी निरामय शांतता, विहाराविहारांमध्ये एकाग्र चित्ताने सुरू असलेले धम्मग्रंथांचे पठण आणि वंदना, धार्मिक प्रवचने आणि ध्यानधारणा तसेच अतीव शांततेत बुद्ध पुतळ्यांचे कमलपुष्पांनी होणारे पूजन अशा प्रकारे श्रद्धेने उत्सव साजरा करताना तेथील लोकांच्या चेहºयावर कमालीचा सात्विक आनंद दिसून येत होता़ संपूर्ण देशातील शहरे आणि गावे धम्माचे झेंडे, पताका,कमानी, आकाशकंदिलांनी सजली होती़ रस्ते, घरे, विहारे सर्वत्र ध म्मध्वज लहरत होते़ रात्री विविधरंगी रोषणाईने गावे आणि विहारे उजळून निघाली होती़ गावागावांमध्ये असलेल्या मोठमोठ्या बुद्धमूर्ती लक्ष आकर्षून घेत होत्या़ या उत्सवानिमित्त रस्त्यांच्या कडेला ठिकठिकाणी मंडप घालण्यात आले होते़ गोरगरीबांना अन्नदान केले जात होते़ अत्यंत शांततेत आनंदात, नम्रपणे साजरा होणारा हा आगळावेगळा उत्सव होता़ एक निर्मळ, निरव शांततेची अनुभूती देणारा उत्सव होता़ भारतात दिसणारा उच्छृंखलपणा,
उथळपणा, कर्कशपणा याचा कुठेही मागमूस नव्हता़ रस्त्यांवर नाक्यानाक्यांवर कर्कश वाजणारे लाऊडस्पीकर नव्हते, चौक दणाणून सोडणारे डीजे साऊंड नव्हते की ‘मुन्नी बदनाम हुई, शीला की जवानी’ अशा अश्लील गाण्यांवर बेधूंद नाचणारी तरुणाईची झुंड नव्हती़ बुद्ध जयंती आंबेडकर जयंतीप्रमाणेच गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यासारखे सणही याला अपवाद नाहीत़ या उत्सवांमध्ये परंपरावादी भक्ती, दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा आणि ढोल, ताशांच्या तालावर बेधूंद नाचणारी तरुणाई, धर्माचा अहंकार, कानठळ्या बसवणारे
डीजे मात्र श्रद्धेचा, भक्तिभावाचा अभाव असे प्रकार येथे सर्रास पाहावयास मिळतात़ भारतात साजरे होणारे
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असो अथवा बुद्ध जयंती, शिवजयंती, आंबेडकर जयंती असो त्यात निखळ आनंदाचे दर्शन कधी होत नाही़ लोक केवळ रुढीबद्ध, चाकोरीबद्ध, परंपरा म्हणून हे सण साजरे करतात की चंगळवादातून आलेल्या भौतिक सुखासाठी साजरे करतात? भारतात काही सण साजरा करणारे गल्लीतील, चौकातील
शंभर एक लोक असतात; परंतु आजूबाजूच्या परिसरातील जे हजारो नागरिक यामध्ये सहभागी झालेले नसतात, त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो़ अशा पद्धतीने नागरी कर्तव्ये बाजूला सारून सण साजरे होत असतात़ महापुरुषांच्या जयंत्या, धार्मिक सण, खाजगी सोहळे, विशिष्ट समूह यांचे उत्सव हे अशा पद्धतीने
साजरे व्हायला हवे की, आजूबाजूच्या परिसरातील लोकांनाही त्यातून आनंद वाटायला हवा, प्रसन्न वाटायला हवे़ आपल्याकडे विविध धर्म व त्या धर्मातील शेकडो जाती यांचे सण, उत्सव वेगवेगळे आहेत़ प्रत्येकाने आपल्या उत्सवातून दुसºयाच्या भावनाही जपल्या पाहिजेत़ श्रीलंकेतील बुद्ध जयंतीला दिसणारी प्रसन्नता, उल्हासीत, आल्हाददायक वातावरण भारतात साजरा होणाºया विविध धर्म-जाती-पंथांच्या उत्सवांमध्ये दिसत नाही़ महाराष्ट्रातील बौद्ध धर्मीयांनी श्रीलंकेतील बुद्ध अनुयायांचे अनुकरण करणे आवश्यक आहे़ या समाजाने बुद्धांच्या शिकवणुकीनुसार बुद्ध जयंती आणि आंबेडकर जयंती साजरी करून इतरांसाठी नवा आदर्श घालून दिला पाहिजे़ प्रज्ञाशील करुणा ही बुद्धांची शिकवण आहे़ बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महाज्ञानी महापुरुषाची जयंती बुद्धतत्त्वाप्रमाणे झाली, तर भारतात हा उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीला नवा आयाम मिळेल़ डॉ़ आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय यांचा पुरस्कार करणारा बुद्धाचा धम्म दिला,
या धम्माचे अधिष्ठान भारतीय संविधानाला दिले़ बुद्धांचे तत्त्वज्ञान मानवी जीवनाला प्रेरक आहे. धम्म हा मानव जातीला उन्नतीकडे नेतो. त्यातील मानवता अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारी आणि जीवन समृद्ध करणारी आहे़ त्यातील शांती मानवी जीवनाला सत्याकडे आकर्षित करते़ अन्य धर्मांतील जुन्या रुढी, परंपरा, जातीयता, अंधश्रद्धा, दैववाद या अवनतीकडे नेणाºया बाबींना बुद्ध धम्मात स्थान नाही़ धम्माने समता  स्थापीत
करून ज्ञानाचा आणि ‘अत्त दीप भव’ अर्थात स्वयंप्रकाशित होण्याचा म्हणजेच व्यक्तिगत उत्कर्षाचा मार्ग दाखवला आहे़ असा मार्ग दाखवणाºया बुद्धांचा देश म्हणून जगात भारताची ओळख आहे़ बौद्ध धर्मीय देशांमधील जनता या बुद्धाच्या देशाकडे पाय करून झोपत नाही, अशी अगाध श्रद्धा इतर देशांतील लोक बाळगत आहेत़ बुद्धांचे तत्त्वज्ञान आचरणात आणून ते सुखी, समृद्ध व प्रगतिशील झाले आहेत. या भारताच्या भूमिपुत्र असलेल्या बुद्धांचा धम्म डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांनी येथील दलित समाजाला दिला आहे़ त्यांच्या मार्गावरून चालत असलेल्या दलित समाजाने प्रचंड प्रगती केली आहे़ देशातील इतर कोणत्याही मागास जातींमधील समुदायाने एवढी वेगवान प्रगती साधलेली नाही़ बौद्धिक, आर्थिक, राजकीय, शासकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रांत येथील नवबौद्धांनी वेगळा ठसा उमटवला आहे़ त्यामुळे बुद्ध जयंती व आंबेडकर जयंती अत्यंत
उत्साहाने साजरी करण्यात येत आहे़ काही सन्माननीय अपवाद वगळता येथील बौद्धांनी जयंती उत्सवांना अत्यंत उथळपणा आणला आहे़ इतर सर्व उत्सवांप्रमाणे धम्माचा उत्सवदेखील धांगडधिंग्यात साजरा केला जात आहे़ तो विचारांचा महोत्सव व्हावा, यासाठी काही संघटना निश्चितपणे प्रयत्न करीत आहेत़ या उत्सवांना ‘थ्रीडी’ म्हणजे डीजे, डान्स, दारू असे ओंगळ स्वरूप आले आहे़ बरेचदा त्याला राजकीय शक्तिप्रदर्शनाच्या मंचाचे रूप दिले जात आहे़ स्वत:च्या फोटोंचे मोठमोठे फ्लेक्स लावून बुद्धांचे व बाबासाहेबांचे विचार सर्वत्र पोहोचणार नाहीत, तर ते विचार प्रत्यक्ष आचरणात आणून लोकांसमोर आदर्श निर्माण करावा लागेल़ जयंतीच्या निमित्ताने रस्त्यावर येऊन बेधुंद नाचणे, बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत नसलेले वर्तनकरणे, कर्णकर्कश आवाजाचे डीजे लावणे, लोकसंगीताच्या नावाखाली द्वैअर्थी गाण्यांचे कार्यक्रम आयोजित करणे आणि भीमगीतांच्या नावाखाली इतर धर्मीयांवर हल्लाबोल करणे असे प्रकार सदोदीत चालू आहेत़ ब्राह्मणांनी अन्याय, अत्याचार अथवा छळ फक्त नवबौद्ध झालेल्या दलितांचाच केलेला नाही, तो जातीच्या उतरंडीतील इतर मागास जातींचाही केलेला होता; परंतु जणू काही आपलाच छळ केला, अशा प्रकारचा आर्विभाव असतो़ त्यातून कटुता कमी होण्याऐवजी अधिक वाढू शकते़ तसेच इतर मागासवर्गीय संघटितपणे त्यांच्यासोबत येत नाही; परंतु याचे भान ठेवले जात नाही़ अशा प्रकारच्या जयंती कार्यक्रमांतून धम्म चळवळीचे संवर्धन कसे काय होणार? याचा विचार केला  जात नाही़ गणपती, नवरात्र आणि महापुरुषांच्या जयंती यांच्यासाठी उत्सवाचे निमित्त साधून कार्यकर्ते वर्गणीच्या नावाने खंडणी गोळा करत असतात़ याला लगाम घालणार कोण? या प्रकाराने चंगळवादाला प्रोत्साहन मिळत असून तरुण पिढी भोगवादी संस्कृतीकडे ढकलली जात आहे़
श्रीलंकेतील उत्सवाप्रमाणे येथील उत्सवांमध्ये सौजन्य असायला हवे, तरच हे उत्सव एका विशिष्ट जाती धर्माचे न राहता ते सर्वांचे होतील़  

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP