Sunday, July 26, 2015

पितृतुल्य सहृदय नेता

महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावणारे, दलित मागासवर्गीयांच्या कल्याणाची तळमळ असणारे, फुले-आंबेडकरी विचारांचे कट्टर सर्मथक, बुध्दधम्म चळवळीचे प्रसारक, स्वभावाने अत्यंत संयमी आणि समतोल, सर्वांना बरोबर घेवून काम करणारे, दूरदृष्टी असलेले नेतृत्व याबरोबरच एक प्रेमळ सुह्रदय पितृतुल्य व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. रा.सू. गवई उर्फ दादासाहेब यांच्या असंख्य आठवणी त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाच्या मनात दाटून आल्या असतील तर नवल नाही. पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करणार्‍या असंख्य पत्रकारांशी त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध होते. पत्रकारांशी गप्पागोष्टी आणि चर्चा करण्यात त्यांना विशेष आनंद वाटत असे. त्यांचे पत्रकारांशी इतके आपुलकीचे संबंध होते की, दादासाहेब सर्वांना आपल्या घरातलेच वाटत इतकी जवळीक त्यांनी सर्वांशी साधली होती. रिपब्लिकन पक्षाचे ते नेते होते तरी महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते. केवळ दलित चळवळीचा नव्हे तर महाराष्ट्राच्या हिताचा ते सदोदित विचार करीत असत. महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ अनुभवी नेते म्हणून त्यांच्याशी माझी सतत चर्चा होत असे. त्यांच्यासोबत कौटुंबिक जिव्हाळ्य़ाचे संबंध निर्माण झाले होते. दादासाहेब जेव्हा जेव्हा मुंबईत असत तेव्हा त्यांची भेट झाली नाही तरी फोनवर त्यांच्याशी बोलणे होत असे. ते बिहारचे राज्यपाल असताना २00७ साली त्यांच्या आमंत्रणावरून मी माझ्या मैत्रिणीसोबत त्यांच्याकडे गेले तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वातले काही विशेष पैलू मला जाणवले आणि दादासाहेबांबद्दलचा आदर आणखी वाढला. त्या आठवणी आजही ताज्या आहेत.

मी आणि माझी मैत्रिण गल्फ न्यूजची पत्रकार पामेला पाटण्याला जाण्यासाठी निघालो. जाताना आम्ही येत असल्याचा त्यांना फोन केला. दादासाहेब म्हणाले, 'आताच येऊ नका, येथे होळीची धूम आहे. पण त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठाच प्रश्न निर्माण झाला आहे.' पण आमची संपूर्ण तयारी झाली आहे आणि आम्ही एअरपोर्टला निघालो आहोत, हे सांगितले तेंव्हा त्यांनी नाईलाजाने होकार दिला. राजभवनवर आमची चांगलीच बडदास्त ठेवली होती. मात्र आम्ही बिहारमधील इतर स्थळे पाहण्यासाठी जावू नये, वाटेत धोका होवू शकतो, असे त्यांनी वारंवार बजावले असतानाही आम्ही मात्र त्यांचे ऐकले नाही. वेगवेगळ्या स्थळांना भेटी देणे सुरुच ठेवले. राजभवनचे अंगरक्षक सोबत असल्यामुळे भीतीचे कारण नाही असे मानून आम्ही दोघी महिला पत्रकार पर्यटनाचा आनंद घेत होतो. एके दिवशी आम्ही बुध्दगयाला जाण्यासाठी सकाळीच निघालो. दादासाहेबांना सांगितले. तेंव्हा त्यांच्या चेहर्‍यावर काळजी जाणवली. रात्र करू नका, दिवसाउजेडी परत या, असा वडिलकीचा सल्ला त्यांनी दिला खरा, पण आम्ही उशीर केलाच. आम्हाला त्याचा एवढा फटका बसला की आयुष्यभर लक्षात राहील असा. आम्ही गयाला जात असताना वाटेतील खेडेगावानजिक ठिकठिकाणी मोठमोठय़ा घोळक्याने लोक होळी खेळत होते. विविध रंगांबरोबरच चिखल-शेणांनी बरबटून गेलेली माणसे प्रवाशांना कमालीचा त्रास देत होते. गाड्या अडवणे, गाडीच्या समोर आडवे येणे, होळी मागणे, गाड्यांवर रंग फासणे असले प्रकार होत होते. आम्हालाही त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला होता. वाटेत आलेल्या अडथळ्यांमुळे गयेला पोहोंचण्यास आम्हाला उशीर झाला. महाबोधी विहार आणि आजुबाजूचा परिसर पाहिल्यानंतर संध्याकाळच्या प्रार्थनेला उपस्थित राहिलो त्यानंतर विहाराच्या प्रमुख भन्तेजींना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. तोवर संध्याकाळचे सात वाजले. हळूहळू काळोख पडू लागला तेंव्हा भन्तेजींनी आम्हाला विहाराच्या वसतिगृहात राहण्याचा सल्ला दिला. दोन तासांत पाटण्याला पोहोचू, असे सांगत त्यांचा सल्लाही आम्ही नाकारला. तरीदेखील त्या भन्तेजींनी पोलीस ठाण्याला फोन करुन आमच्यासोबत पोलिसांची एक जीप दिली. आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. संरक्षण देणारी जीप वेगाने पुढे गेली, आमची गाडी मागे राहिली आणि तेवढय़ात १५-२0 जणांच्या घोळक्याने आमच्या जीपला घेरले. गाडीच्या काचा फोडल्या. आम्ही दोघी मागच्या बाजूला जीव मुठीत घेवून बसलो होतो. राजभवनचा एक चालक आणि एक अंगरक्षक एवढय़ा लोकांचा सामना करणार कसे? आम्ही घाबरून गेलो तेवढय़ात पुढे गेलेली जीप मागे आली आणि हवेत गोळीबार करुन बंदूकीच्या दांड्याने हल्लेखोरांना मारण्यास सुरुवात केली, तसे ते पळून गेले. अडथळ्यांची शर्यत सुरुच राहिली. कारण जेहानाबाद तुरुंगासमोरच आमची गाडी बंद पडली. या तुरुंगातील २00 माओवादी कैदी होळीआधीच तुरुंग फोडून पळाले होते. रात्रीच्या काळोखात वातावरण अत्यंत भयावह, घाबरलेल्या मन:स्थितीतच मी दादासाहेबांना फोन केला आणि घडलेली परिस्थिती सांगितली. त्यांनी तातडीने आणखी एक पोलिसांची जीप मदतीला पाठवली. महाराष्ट्रातून बिहारात नियुक्ती झालेल्या सर्व आयएएस आणि आयपीएस अधिकार्‍यांना राजभवनवर बोलावून घेतले. बंदोबस्ताच्या आणि दक्षतेच्या सूचना दिल्या आणि दादासाहेब अत्यंत अस्वस्थतेत आमची वाट पाहत बसले. आम्ही पोहोचल्याबरोबर पाहतो तर काय, सर्व अधिकार्‍यांसोबत दादासाहेब चिंताक्रांत बसले होते. झोपेची वेळ टळून गेली तरी बसून होते. आम्हाला पाहताच त्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. आमची आस्थेने विचारपूस केली. आम्हाला कुठे मारहाण अथवा इजा तर झाली नाही ना, अशी आपुलकीने चौकशी केली. डॉक्टरही बोलावून ठेवले होते. दादासाहेबांच्या आमच्याबद्दल ज्या पित्यासमान भावना होत्या त्या पाहून आम्ही सद्गदीत झालो. तो आमच्या मुक्कामाचा शेवटचा दिवस होता. आम्ही मुंबईला परतलो तेव्हा त्यांचे स्वीय सहाय्यक सुहास सोनवणे यांनी 'महाराष्ट्रातील महिला पत्रकारांवर माओवाद्यांचा हल्ला' अशा वृत्तांची कात्रणे आम्हाला पाठवली. बिहारच्या रक्तरंजीत होळीचा हा जीवघेणा थरारक अनुभव दादासाहेबांच्या प्रेमामुळे आणि आधारामुळे कुठच्या कुठे पळून गेला हे आम्हाला कळलेही नाही.

'लोकमत'मध्ये पत्रकारिता करीत असताना लोकमतचे संस्थापक जवाहरलाल दर्डा हे राज्याचे आरोग्यमंत्री होते तेव्हा हाफकिन इन्स्टीट्युटमधील कर्मचार्‍यांच्या अन्यायाला वाचा फोडणारी वृत्तमालिका मी प्रसिध्द केली होती. हे प्रकरण दादासाहेबांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते असताना सभागृहात उपस्थित केले आणि बाबुजी (दर्डा) आरोग्यमंत्री असल्यामुळे त्यांच्यावरच टीकेची झोड उठवली. त्यांना शिवसेनेचे मनोहर जोशी, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर या तिन्ही सदस्यांनी साथ दिली. हे प्रकरण एवढे गाजले की तेथील संचालकाच्या राजीनाम्याची मागणी करीत विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. सभागृह बंद पाडले. आता बाबुजी काय म्हणतात याची मला चिंता लागली होती. पण बाबुजींनी देखील ते प्रकरण गांभिर्याने घेतले. आपल्याच वर्तमानपत्रात छापून आलेल्या वृत्तांतामुळे टीका सहन करावी लागली, असा व्यक्तिगत रोष त्यांनी ठेवला नाही. याचे कारण उत्कृष्ट संसदपटू असलेल्या दादासाहेबांनी लोकमतच्या न्यायाच्या भूमिकेचे कौतुक करीत तो विषय समतोलपणे मांडला होता.

दादासाहेबांच्या निधनाचे वृत्त आले आणि त्यांच्या सहवासातील असंख्य स्मृती डोळ्यासमोर तरळू लागल्या

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP