मिसाइल मॅनशी बोलण्याचे भाग्य

मुंबईच्या विमानतळावर मी आणि माझे दोनतीन सहकारी काही कारणास्तव थांबलो होतो़ लोकमतचे विजय दर्डाही सोबत होते़ तेवढ्यात दिल्लीहून अब्दुल कलाम मुंबईत आले होते़ ते विमानतळाबाहेर येत असताना विजयबाबूंनी अब्दुल कलाम समोरून येत असल्याचे आम्हाला सांगितले़ त्यांना पाहताच मी सरळ त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिले़ मला थेट समोर आलेले पाहून तेही थांबले़ मी माझी पत्रकार म्हणून ओळख करून दिली आणि त्यांच्याशी हस्तांदोलन केले़ त्यांच्याशी काय बोलावे, काय विचारावे याचा काहीच विचार मनात नव्हता़ पण तरीदेखील पत्रकार नेहमी विचारतात त्याप्रमाणे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली़ खरेतर अशाप्रकारे अनाहूतपणे कोणी पत्रकार येऊन प्रश्न विचारतो असे पाहून कोणीही उत्तर दिले नसते़ नंतर भेटा असे सांगून निघून गेले असते़ असे अनुभव पत्रकारांना नेहमीच येत असतात़ पण आश्चर्य म्हणजे अब्दुल कलाम थांबले़ खरे सांगायचे तर त्यांच्या संशोधनाबद्दल मला फारशी माहितीही नव्हती़ पण मी विचारले की, आपले नवीन संशोधन काय असेल? त्यांनी सांगण्यास सुरुवात केली़ मिसाइलसंदर्भात बोलले़ मग मी विचारले, त्याचा देशाला किती आणि कसा लाभ होईल? देशाच्या एकात्मतेसाठी ते आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले़ पुढे मी असेही विचारले की, लोकांना काय संदेश द्याल आणि मुख्य म्हणजे पत्रकारांना काय संदेश द्याल? असे तीनचार प्रश्न विचारले़ त्याची उत्तरेही त्यांनी सविस्तर दिली़ त्यांच्या आजूबाजूचे लोक माझ्याकडे एकप्रकारे रागाने आणि आश्चर्याने पाहात होते़ एवढ्या मोठ्या माणसाला थांबवून बोलणारी ही कोण, असे त्यांचे भाव होते़ पण पत्रकार म्हणून माझे काम झाले होते़ त्याचा आनंद तर होताच, पण एवढ्या लहान पत्रकाराशी एवढा मोठा जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ वाटेत थांबून बोलला, याचा आनंद शब्दातीत होता़ पत्रकारांसाठी त्यांचा संदेश होता, ‘‘सामान्य माणसांसाठी काम करा’’़ असामान्य माणूस, पण सामान्य माणूस हाच त्यांच्या विचाराचा केंद्रबिंदू हे त्याक्षणी भेटीतही जाणवले़ एवढा मोठा हिमालयाएवढ्या ज्ञानाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा माणूस असूनही सर्वसामान्य माणसाशी सामान्यांप्रमाणे बोलत उभा राहतो, हे एक आश्चर्यच म्हटले पाहिजे़ एका अल्पशा भेटीतही खूप जुनी ओळख असल्याप्रमाणे त्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाने आपल्याशी संवाद साधला, त्या माणसातल्या माणसाला भावपूर्ण आदरांजली़
0 comments:
Post a Comment