Tuesday, July 28, 2015

पुण्याच्या गुन्हेगारीवर अष्टप्रधानांचे मौन

संघटित टोळीयुद्धांचे प्रमाण वाढीस लागून उपनगरांमध्ये अनेक बेरोजगार तरुण या टोळ्यांमध्ये सामील होऊ लागले़ अल्पकाळात श्रीमंत होण्याच्या राजमार्गावरून अनेक तरुण बिनदिक्कतपणे मार्गक्रमण करू लागले़ अर्थात याला अनेक राजकीय शक्तींनीही हातभार लावलाच़ या सगळ्यांची परिणिती म्हणजेच सध्या पुणे शहरातच नव्हे तर जिल्ह्यातही संघटित गुन्हेगारीने आपली पाळेमुळे घट्ट केली आहेत़

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे हे शिक्षणाचे माहेरघर, आयटी हब, क्रीडा नगरी, औद्योगिक नगरी तसेच भावी प्रशासकीय अधिकारी निर्माण करणारे मुख्य केंद्र, अशी या शहराची ओळख जगभर पसरली आहे़ शैक्षणिक संस्थांचे जाळे आणि आयटी हबमुळे देशातील सर्व राज्यांतूनच नाही तर परदेशातूनही लाखो विद्यार्थी आणि नोकरी धंद्यासाठी लोक येथे येत असतात. मुंबईपाठोपाठ पुणे हे मोठे मेट्रोपोलिटियन शहर बनले आहे़ ‘पुणे तिथे काय उणे’ अशी म्हण देशभरात प्रचलित झाली आहे़ इतर कोणत्याही शहरापेक्षा पुण्याचे वेगळेपण हे पुणेकरांच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची बाब आहे़ पुण्यावर आतापर्यंत आलेली कोणती भीषण आपत्ती आहे? असा प्रश्न विचारला तर पुणेकरांना आपल्या मेंदूला ताण द्यावा लागत असे़ मग अगदीच सांगण्याची वेळ आली तर पानशेत पुराची दुर्घटना आणि जोशी-अभ्यंकर हत्याकांड एवढीच काय ती आपत्ती आठवणीत होती़ पुण्याच्या या शांत व संयमी प्रवृत्तीबद्दल पुणेकरांना  खासा अभिमान वाटत असे़ अगदी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर देशभरात आगडोंब उसळला़; परंतु पुण्यात मात्र याचे थंड पडसाद उमटले़ या शहरात काँग्रेसचे वर्चस्व असूनही पुणेकरांनी दाखविलेला संयम ही विशेष उल्लेखनीय बाब होती़ तसे पाहता पुणे हे पेन्शनरांचे शहर अशी याची ख्याती आहे़ निवृत्त प्रशासकीय अधिकाºयांचे कायम वास्तव्याचे हे लाडके ठिकाण तर होतेच; पण सेवा कार्यकाळामध्ये एकदा तरी पुण्यात पोस्टिंग मिळावे, यासाठी अधिकाºयांमध्ये अहमहमिका लागत असे़ काळाच्या ओघात पुणे शहराचा चोहोबाजूने वेगाने विस्तार होत गेला़ पुण्याची लोकसंख्याही त्याच वेगाने वाढत गेली़ जमिनीचे भाव आकाशाला भिडले़ यातच पुणे-मुंबई असा द्रुतगती महामार्ग सुरू झाल्याने बांधकाम व्यावसायिकांचे मुंबईनंतरचे सर्वाधिक पसंतीचे शहर ठरले व यातूनच गुंठामंत्री आणि लॅण्डमाफियांचा उदय झाला़ संघटित टोळीयुद्धांचे प्रमाण वाढीस लागून उपनगरांमध्ये अनेक बेरोजगार तरुण या टोळ्यांमध्ये सामील होऊ लागले़ अल्पकाळात श्रीमंत होण्याच्या राजमार्गावरून अनेक तरुण बिनदिक्कतपणे मार्गक्रमण करू लागले़ अर्थात याला अनेक राजकीय शक्तींनीही हातभार लावलाच़ या सगळ्यांची परिणिती म्हणजेच सध्या पुणे शहरातच नव्हे तर जिल्ह्यातही संघटित गुन्हेगारीने आपली पाळेमुळे घट्ट केली आहेत़ 
गुंडगिरीच्या जोरावर दुसºयाच्या जमिनी बळकावणे, जबरदस्तीने घर खाली करून घेणे, खुनाच्या सुपाºया घेणे यासह सोनसाखळी चोरांनीही उच्छाद मांडला आहे़ केवळ महिलाच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकही यामुळे सध्या भयभीत झाले असून आपण या शहरात सुरक्षित आहोत का, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे़ नुकत्याच झालेल्या सिंहगड रस्त्यावरील जळीतकांडाने तर गुन्हेगारीतील अपप्रवृत्तींचा प्रवेश थेट घरापर्यंतच येऊन ठेपला आहे़ या घटनेला आज महिना होत आला तरीही खºया आरोपीच्या ओळखीबाबत नागरिकांमध्ये संदिग्धता आहे़ या घटनेनंतर काहीच दिवसाच्या फरकाने पर्वतीसारख्या संवेदनशील भागात दोन गटांच्या भांडणाचे पर्यावसान हे दंगलीत होऊन शहरात भीतीचे वातावरण तयार झाल्याने नेमके या घटनेनंतर काही तासांच्या अवधीतच पुणेकरांचे श्रद्धास्थान असणाºया अखिल मंडई मंडळाच्या गणपतीचे दागिने चोरीस गेले़ सदर दागिने जरी दोन दिवसांत परत मिळाले असले तरीही यात पोलीस यंत्रणेचे काहीच कसब नसून आरोपीच्या वडिलांनीच आपली सद्विवेकबुद्धी जागरूक ठेवून ते दागिने परत केले आहे़ पुणे पोलिसांचे हे अपयश नक्कीच चिंताजनक असून यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढीस लागत आहे़ साध्या भुरट्या चोरांचादेखील बंदोबस्त करू न शकणारे हे पोलीस दल नरेंद्र दाभोलकरांचे खुनी पकडतील याची शक्यता दिसत नाही़ पोलीस यंत्रणेतील वाढता भ्रष्टाचार, त्यातून निर्माण झालेली अकार्यक्षमता तसेच खबºयांचे कमी असणारे नेटवर्क हेच पोलीस यंत्रणेचे अपयश आहे़
मात्र पोलीस यंत्रणेबरोबरच येथील राजकारण्यांना विशेषत: पुण्याचे कारभारी बनलेल्या भाजपच्या अष्टप्रधानांना जबाबदार धरावे लागेल़ शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असताना निषेधाचा एक शब्दही या आठ आमदारांच्या तोंडून बाहेर पडत नाही़ किंबहूना सर्वसामान्यांमध्ये असुरक्षितता वाढत असताना पुण्याचे कारभारी मात्र आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यात गर्क आहेत़ कर्वेनगर, कोथरुडसारख्या सुशिक्षितांचे वर्चस्व असलेल्या भागातही गुन्हेगारी वाढली असताना तिला आळा घालण्याची वल्गना करणाºया तेथील आमदार मेधा कुलकर्णी या अधिक काळ मुंबईतच असल्याबद्दल त्यांच्या मतदारसंघात तीव्र नाराजी आहे़ याउलट शिवसेनेच्या विधान परिषदेतील आमदार डॉ़ नीलम गोºहे या शहरात कोणताही गुन्हा घडला की त्वरित घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना दिलासा देण्याचे काम तरी करीत आहेत़ त्याचबरोबर विधीमंडळातही याबाबत अत्यंत आक्रमक भूमिका घेत आवाज उठवित आहेत़ पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे पुण्याच्या राजकारणातील सर्वात अनुभवी ज्येष्ठ भाजप नेते असून पुण्याची नाळ त्यांना चांगलीच माहिती आहे़ त्यांनी पुणे पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्यावर वचक ठेवणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र त्यांचे लक्ष त्यांच्याकडे असलेल्या अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन या खात्यांकडेच जास्त असल्याचे दिसते़ दुसरे आमदार दिलीप कांबळे हे सामाजिक न्याय राज्यमंत्री असून मुंबईतच अधिक काळ राहणे पसंत करीत आहेत़ आमदार विजय काळे यांच्यावर आमदारकी लादली आहे की काय, असे वाटावे असेच त्यांचे वर्तन दिसून येत आहे़  पुण्याच्या सार्वजनिक जीवनात त्यांचे अस्तित्वच दिसत नाही़ तर तरुण आमदार जगदीश मुळीक व योगेश टिळेकर हे नवीन असल्याने अजूनही राजकारणातील प्राथमिक धडे गिरविण्यातच मग्न असल्याने शहरात काय चालले आहे, याकडे त्यांचे दुर्लक्षच आहे़ आमदार माधुरी मिसाळ या मंत्रीपद मिळवण्याच्या स्वप्नरंजनात असल्याने शहरातल्या गुन्हेगारीकडे जाणूनबुजून कानाडोळा केला जात आहे़ पोलीस आयुक्त के. के. पाठक हे पुण्यातील गुन्हेगारी कशी आटोक्यात आणतील, याबाबत नागरिकांना ते अद्याप विश्वास देऊ शकले नाहीत़ आयुक्तांना आपल्या आश्वासनांचा विसरच पडला असल्याचे दिसून येत आहे. या पदावर येताच त्यांनी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याचे तसेच ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारचे गुन्हे घडतील़ त्या ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकास जबाबदार ठरवून त्याच्यावर कारवाई करणार असल्याचे जाहीर वक्तव्य केले होते़ मात्र पुण्यातील वाढत्या गुन्ह्यांची संख्या व संबंधीत पोलीस ठाण्यातील अधिकाºयांची शाबूत असलेली खूर्ची बघता आयुक्तांना कारवाईचाही विसर पडला आहे, असेच म्हणावे लागेल़  वाढती गुन्हेगारी लक्षात घेता या पोकळ आश्वासनांना येथील जनता फसणार नाही, हेही तितकेच खरे़ यासोबतच पोलीस दलातील अंतर्गत नाराजी ही पोलिसांच्या अकार्यक्षमतेला कारणीभूत ठरत असून वरिष्ठ अधिकारी केवळ आपल्या मर्जीतील पोलीस निरीक्षकांच्याच बढती-बदलीमध्ये रस घेत आहेत़ ‘तूतू मैंमैं’ मध्ये अडकलेल्या या पोलीस दलास बहुधा आपल्या मुख्य कार्याचा विसरच पडला असावा़ काही दिवसांवर येऊन ठेपलेले दही हंडी, गणेशोत्सव व नवरात्रोत्सव या दिवसात तर अपप्रवृत्ती अधिकच बळावतात़ यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक तीव्र होणार आहे़ गुन्हेगारांवर जरब बसावी याकरिता पोलीस आयुक्त कोणती ठोस पावले उचलतात, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे़ नव्वदच्या दशकात संघटीत टोळीयुद्धाचे प्रमुख केंद्र असलेल्या मुंबई शहरातील टोळीयुद्धाला आळा घालण्यात पोलिसांना आणि तत्कालीन सत्ताधाºयांनादेखील यश आले असताना पुणे मात्र सध्या अशा प्रकारच्या गुन्हेगारीचे केंद्र बनत आहे़ याबद्दल पुणेकरांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे़ गेल्या दहा वर्षांत वाढीस लागलेल्या या संघटीत गुन्हेगारीला आळा घालायचा झाल्यास पुण्याच्या आठही कारभाºयांनी संघटीत होण्याची गरज असून इच्छाशक्ती दाखविणे तितकेच महत्त्वाचे आहे़ मेट्रो रेल्वे, विकास आराखडा, एफएसआय या कंत्राटदारधार्जीण्या कामाला प्राधान्य देण्याऐवजी त्यांनी पुणेकरांवर असलेले भीतीचे सावट दूर करणे गरजेचे आहे़

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP