Monday, July 13, 2015

पवारांचे धक्कातंत्र सरकार अस्थिर करेल?

पवारांचे धक्कातंत्र सरकार अस्थिर करेल?
शरद पवार मात्र सरकार अस्थिर करण्यासाठी आणि आपल्याच नेत्यांना अभय मिळवून देण्यासाठी धक्कातंत्राचा वापर तर करत नाहीत ना? भाजपाने राष्ट्रवादीवर जे भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत, त्यासंबंधी 'दूध का दूध पानी का पानी' हे सिद्ध करून महाराष्ट्रासमोर ठेवतील का की पवारांच्या खेळीला बळी पडतील, याचीही उत्सुकता आहे.राही भिडेसध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठी उलथापालथ होऊन राजकीय भूकंप होईल की काय? अशी विधाने बड्या राजकीय नेत्यांकडून येऊ लागली आहेत. राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता आहे का? देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रपदाची खुर्ची डळमळीत होत आहे का? सरकारमध्ये अस्थिरता निर्माण होत आहे का? यासंबंधीच्या चर्चेने राजकीय वतरुळात वेग घेतला आहे. ही चर्चा सुरू होण्यासारखे नेमके घडले तरी काय? याची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली आहे. यामध्ये नेमका राजकीय सस्पेन्स तरी काय आहे आणि तो कोणी कशासाठी निर्माण केला आहे? संशयाची सुई अनेकांभोवती फिरत असताना याचा सूत्रधार दुसरा-तिसरा कोणी नसून महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेले शरद पवारच आहेत, याविषयी कोणाच्या मनात शंका उरलेली नाही. याचे कारण उघड आहे. ते म्हणजे भाजपा १२२ आणि शिवसेना ६0 मिळून १८२ असे दोन्ही पक्षांचे बलाबल भक्कम असताना सरकार अस्थिरतेच्या छायेत असल्याच्या वावड्या पिकवल्या जात आहेत. राज्यातील जनतेला तसेच राजकीय नेत्यांनाही पाच वर्षे निवडणुका नको असताना मध्यावधी निवडणुकांची घाई कोणाला का व्हावी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. खरे तर अनेक वर्षे मोठय़ा भावाच्या भूमिकेत असलेल्या शिवसेनेला युती तोडल्यानंतर झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत भाजपापेक्षा निम्म्या जागा कमी मिळाल्या आणि भाजपा वडीलधार्‍या भावाच्या भूमिकेत आला; पण भाजपाची ही भूमिका काही शिवसेनेच्या पचनी पडली नाही. त्यांनी दुय्यम भूमिका स्वीकारली नाही. संख्याबळाला न मानता भाजपानेच पूर्वीसारखी दुय्यम भूमिका घ्यावी, हा सेनेचा अट्टाहास आणि यामुळे झालेला बेबनाव, याचा पुरेपूर राजकीय लाभ पवार यांनी घेतला व सरकार स्थापनेकरिता भाजपाला न मागता पाठिंबा जाहीर केला. निवडणुकांच्या निकालाच्या दिवशीच न मागता दिलेल्या या पाठिंब्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. मात्र, यामध्ये भाजपाला राजकीयदृष्ट्या सुरक्षित करत शिवसेनेला वाटाघाटीसाठी जागाच ठेवली नाही. ज्या राष्ट्रवादीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील भ्रष्टवादी ठरवले होते त्यांच्या पाठिंब्यावर सरकार चालवणे भाजपाला परवडणारे नव्हते. अखेर शिवसेनेशी युती करून सरकार बहुमतात आणावे लागले. शिवसेनादेखील चांगल्या खात्याच्या अपेक्षेने सत्तेत जाण्यासाठी आतूर झालेली होती; परंतु त्यांचा भ्रमनिरास झाल्यामुळे शिवसेनेने वेळोवेळी भाजपावर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. सामना या दैनिकातून देखील भाजपावर शरसंधान साधत उसने अवसान आणत आपला स्वाभिमान शाबूत असल्याचा भास निर्माण करत राहिले. मग प्रथम विरोधी पक्ष म्हणून बाकावर बसत नंतर यू टर्न घेत दुय्यम खात्यांसह सत्तेत सामील होत सेनेची डरकाळी फोडणारा ढाण्या वाघ हा केविलवाणा असल्याचेच चित्र निर्माण झाले. या केविलवाण्या अवस्थेवर तिखट-मीठ चोळण्याचे काम शरद पवारांनी आरंभले आहे. उद्धव ठाकरेंच्या स्वाभिमानाची तुलना बाळासाहेब ठाकरेंशी करून शिवसेनेच्या गोटात अस्थिरता निर्माण करण्याचाही प्रय▪सुरू आहे. ठाकरेंचा स्वाभिमान जागृत झाला तर मध्यावधी निवडणुका होतील, असा साक्षात्कारदेखील पवारांना झाला आहे. मात्र, हे करताना पवार यांनी नेहमीप्रमाणेच एका दगडात दोन-तीन पक्षी मारून टाकले आहेत. मध्यावधीचे भूत उभे करून कार्यकर्त्यांना सक्रिय करायचे, दुसरीकडे उद्धव ठाकरेंना अधिक क्षीण करून टाकायचे आणि तिसरीकडे सरकारमध्ये संभ्रम निर्माण करायचा, अशी त्यांनी खेळी लपून राहिलेली नाही. त्यांचीच री ओढत अजित पवार यांनीही सत्तेचा रिमोट कंट्रोल उद्धव ठाकरेंच्या हाती असून ते ज्या दिवशी पाठिंबा काढून घेतील त्या दिवशी सरकार पडेल, असे शिवसेनेला डिवचले आहे. काका-पुतण्यांनी शिवसेनेला मूर्ख बनवण्याचा उद्योग यानिमित्ताने केलेला दिसून येत आहे. स्वाभिमानाला आव्हान देताच उद्धव ठाकरे सरकारमधून बाहेर पडतील, असे भाकित यांनी केले, याचेच आश्‍चर्य वाटते. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे चांगले संबंध लक्षात घेता, तसेच सत्तेसाठी एकमेकांनी एकमेकांशी जुळवून घेतलेले असताना पवारांनी उद्युक्त केले म्हणून सरकार पडेल, असे मानणे राजकीयदृष्ट्या अपरिपक्वपणाचे ठरते.; पण मुत्सद्देगिरीची बिरुदे लागलेल्यांना हे कसे कळणार?

दीर्घकाळ दिल्लीच्या राजकारणात मग्न असलेले शरद पवार तेथून महाराष्ट्रातही आपला रिमोट कंट्रोल चालवत होते. मात्र, केंद्रात व राज्यात नुकत्याच झालेल्या सत्तांतरानंतर पवारांचे बाहू आता पुन्हा एकदा स्फूरण पावू लागले आहेत. पुन्हा एकदा राजकीय आखाड्यात शड्ड ठोकत ते सक्रिय झाले आहेत. महाराष्ट्रातील विविध भागांत होत असलेले त्यांचे दौरे, हे याचेच द्योतक मानले जात आहे. निवडणुकीत झालेल्या पराभवाने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज निराशेच्या गर्तेतून अजूनही सावरले नसताना पवार यांच्या राजकीय हालचालींनी कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यास नक्कीच हातभार लावलेला आहे. कधी मराठवाड्यातील दौरा तर कधी पश्‍चिम महाराष्ट्रात सभांद्वारे त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली आहे. पुरेसे संख्याबळ नसतानाही देशाच्या राजकारणात आपले स्थान महत्त्वाचे मानणारे पवार जेव्हा पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची झाडाझडती घेतात त्याचे सर्वांनाच आश्‍चर्य वाटते. अर्थात त्यामुळे पवारांना अपेक्षित असलेला परिणाम यामुळे साधला जातो, असे कार्यकर्त्यांना वाटते. आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लावणे व पक्षाची प्रतिमा जास्तीत जास्त उजळून पक्ष लोकाभिमुख होणे, याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. त्याचा कितपत परिणाम होतो, हे आगामी काळात दिसून येईलच. हा परिणाम साधण्याकरिता थेट पुण्यातल्या नगरसेवकांचेच प्रगतीपुस्तक तपासत आगामी काळात मला कुठल्याही तक्रारी कानावर येऊ नयेत, असा सज्जड दम देण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. पुण्याचे कारभारी म्हणून इतके दिवस अजित पवार कार्यरत असताना अचानक साहेबांनी सूत्रे आपल्या हातात का घेतली? असा संभ्रमच राष्ट्रवादीसह इतरही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पडल्याशिवाय राहत नाही. राजकीय संभ्रमावस्था तयार करून स्वत:च्या सोयीने राजकारण करणे, ही पवारांची खासियत या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्र अनुभवत आहे. मग कधी मध्यावधी निवडणुकीची शक्यता वर्तवून सत्ताधार्‍यांमध्ये अस्वस्थता निर्माण करणे तर कधी स्वाभिमान गमावलेली सध्याची शिवसेना, असे संबोधत अप्रत्यक्ष उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत सध्याचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल काय, यावर प्रश्नचिन्ह उभ करत आहेत.दुष्काळाच्या छायेत आलेल्या महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचा ऊस दराचा प्रश्न हातात घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनाही ते कोंडीत पकडण्याचा प्रय▪करत आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडत असलेला घटनाक्रम पाहता राज्याच्या राजकारणाचे सारथ्य हे अजूनही आपल्याच हातात असून भाजपा व शिवसेनेच्या सत्ताकारणामध्ये जणू काही आपणच केंद्रस्थानी असल्याचे भासवण्याचा प्रयत्नही पवारांनी सुरू ठेवला आहे. राज्याच्या राजकारणातील कोणतीही घटना असो ती आपल्याच नावाभोवती कशी फिरेल, यावर त्यांचा कटाक्ष असतो.

विधानसभा निवडणुकांअगोदर भाजपा-शिवसेनेच्या टीकेचे सर्वाधिक लक्ष्य ठरलेल्या राष्ट्रवादी नेत्यांची भ्रष्टाचार प्रकरणे भाजपा-शिवसेना सरकार बाहेर काढेल, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असताना गेल्या आठ महिन्यांत याबाबत कोणतीच ठोस कारवाई झालेली नसल्याने सरकारच्या भूमिकेबाबत संदिग्धता निर्माण होत आहे. यामुळेच आगामी काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय भूमिका घेतात, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. न मागितलेल्या पाठिंब्याच्या मोबदल्यात राष्ट्रवादीला अभय देतात की त्यांच्या मुसक्या आवळतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. शरद पवार मात्र सरकार अस्थिर करण्यासाठी आणि आपल्याच नेत्यांना अभय मिळवून देण्यासाठी धक्कातंत्राचा वापर तर करत नाहीत ना? भाजपाने राष्ट्रवादीवर जे भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत त्यासंबंधी 'दूध का दूध पानी का पानी' हे सिद्ध करून महाराष्ट्रासमोर ठेवतील का की पवारांच्या खेळीला बळी पडतील, याचीही उत्सुकता आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP