Sunday, May 24, 2009

रामदास आठवले को गुस्सा क्यों आता है?

साखरसम्राटांनी आठवलेंना पाडण्याचाच निर्धार केला होता. मात्र केवळ विखेच नव्हे, तर कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह येथील सगळेच साखरसम्राट व शिक्षणसम्राट त्यांच्या पराभवास जबाबदार असल्याचे दिसून येते. मराठा आणि बौद्ध दलित यांच्यातील वैमनस्यातून आठवलेंचा पराभव घडवून आणण्यात आला आहे.


रिपब्लिकन नेते रामदास आठवले भयंकर संतापले आहेत. त्यांच्या समर्थकांमध्येदेखील संतापाची लाट पसरली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात झालेला पराभव आठवले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. इतका की, काँग्रेस व राष्ट्रवादी या दोहोंनी जाणूनबुजून आपला पराभव केला, असा थेट आरोप आठवले यांनी केला आणि राज्यभर त्यांच्या कार्यकर्त्यांनी उग्र निदर्शने केली. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व निवडणूक प्रचारप्रमुख बाळासाहेब विखे-पाटील यांच्या पुतळय़ांचे दहन करण्यात आले. आठवलेंचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिल्यानंतरच त्यांचे समर्थक शांत झाले. या प्रकाराने अनेक प्रश्न उपस्थित होतात. काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यामध्ये आठवलेंचा पराभव होतोच कसा? त्यांचा पराभव कसा झाला, कुणी केला, कशासाठी केला, पराभव करण्यामागे नेमकी कारणे कोणती, याचा अंदाज घेतला असता, आठवलेंच्या आरोपात तथ्य असल्याचे दिसून येते. आठवलेंचा पराभव जाणूनबुजून करण्यात आला, जातीय प्रवृत्तीमधून करण्यात आला, शिर्डी मतदारसंघातील साखरसम्राटांनी आठवलेंना पाडण्याचाच निर्धार केला होता. मात्र केवळ विखे-पाटीलच नव्हे, तर कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह येथील सगळेच साखरसम्राट व शिक्षणसम्राट त्यांच्या पराभवास जबाबदार असल्याचे दिसून येते. मराठा आणि बौद्ध दलित यांच्यातील वैमनस्यातून आठवलेंचा पराभव घडवून आणण्यात आला आहे.


काँग्रेस नेत्यांनी ठरवले, तर रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणणे त्यांना अशक्य नाही. १९९८ साली प्रकाश आंबेडकर, रा. सू. गवई, आठवले व जोगेंद्र कवाडे या चौघांना काँग्रेसने निवडून आणले होते. हिंदुत्ववादी शिवसेना-भाजप युतीचे आव्हान परतवून लावण्यासाठी सर्वधर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येऊन युतीचा सामना करण्याचा निर्णय घेतला होता. रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट तर एकत्र आले होते. परिणामी एकजुटीचा विजय झाला होता. १९९९ साली झालेल्या निवडणुकीत सर्वानी पुन्हा वेगळय़ा चुली मांडल्या आणि पराभूत झाले. गवई काँग्रेससोबत, तर आठवले राष्ट्रवादीसोबत गेले. वास्तविक पाहता रिपब्लिकन पक्षामध्ये एकजूट नसेल, तर त्यांच्या मतांची विभागणी होऊन त्यांची राजकीय शक्ती क्षीण होते. या मतांचा विजयासाठी फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे शिवसेना-भाजप उमेदवाराला फायदा मिळू शकतो, याची जाणीव असल्यामुळे दलित जनता काँग्रेस पक्षाला भरभरून मते देत असल्याचा अनुभव येतो. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने गवई-आठवले यांचा सन्मान ठेवला आहे. त्यांच्या नेत्यांना अनुक्रमे अमरावती व शिर्डी या दोन जागा सोडल्या. काँग्रेस पक्षात असलेल्या निष्ठावान दलित नेत्यांसाठी काँग्रेस कार्यकर्तेही निष्ठेने काम करीत असल्याचे मुकुल वासनिक आणि एकनाथ गायकवाड यांच्या विजयाने सिद्ध झाले आहे.


अहमदनगर आणि शिर्डी (राखीव) या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये शिजलेल्या अंतर्गत राजकारणाचा आठवले हे बळी ठरले आहेत. आठवलेंचा तर बळी गेलाच, पण काँग्रेस-राष्ट्रवादीने एकमेकांच्या असे पायात पाय घालून पाडले की, अहमदनगरमध्ये भाजप आणि शिर्डीत शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला. नगर जिल्ह्यातील एका माजी आमदाराने शिर्डीच्या पराभवावर मार्मिक प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, पती मेल्याच्या दु:खापेक्षा सवत विधवा झाल्याचा आनंद अधिक आहे. यावरून कुरघोडीचे राजकारण अशा थराला गेले की, हम तो डुबेंगे सनम, लेकिन तुमको लेकर डुबेंगे असा प्रकार घडला. पवारांनी खेळी केली, विखे-पाटलांबरोबर असलेल्या दुश्मनीतून आठवलेंना काँग्रेसच्या गळी उतरवून त्यांच्या कोटय़ात टाकले व विखेंचा काटा काढण्याचे ठरवले. विखेंचा काँग्रेसचा हात मतदारसंघात जाऊच नये, अशी तजवीज करून ठेवली. त्यांनी शहाला काटशह देऊन आठवलेंचा शिर्डीत आणि नगरमध्ये राष्ट्रवादीच्या शिवाजी कर्डिलेंचा पत्ता कट केला. शिर्डीमध्ये साखरसम्राटांनी आठवलेंना ठरवून पाडले असल्याचे मतांच्या आकडेवारीवरून सिद्ध होते. या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांपैकी शिर्डी हा काँग्रेसचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांचा मतदारसंघ. त्यात शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना २८ हजाराचे मताधिक्य आहे. काँग्रेसचे कृषिमंत्री बाळासाहेब थोरातांच्या संगमनेरमध्ये २३ हजार, काँग्रेसचे श्रीरामपूरचे आमदार जयंत ससाणे यांच्या मतदारसंघात ३० हजार, राष्ट्रवादीचे शंकरराव कोल्हे यांच्या कोपरगावमध्ये २५ हजार आणि राष्ट्रवादीचे मधुकर पिचड यांच्या अकोले मतदारसंघात ११ हजार असे मताधिक्य शिवसेनेचे वाकचौरे यांना मिळाले आहे. निवडणूक प्रचारासाठी आठवलेंनी आमदारांना दिलेले पैसे धनुष्यबाणासाठी वापरण्यात आले, अशी चर्चा होत आहे. या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा तालुक्यांमध्ये दहा सहकारी साखर कारखाने आहेत. शिवसेनेच्या अशोक काळे यांचा कोपरगाव सहकारी साखर कारखाना वगळता नऊ कारखाने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत आणि त्या प्रत्येकाच्या शिक्षणसंस्था आहेत. प्रत्येक संस्थेत १० ते १५ हजार कामगार आहेत. सभासद शेतकरी आहेत. त्यांचे कुटुंबीय धरून प्रत्येकाची हक्काची किमान एक लाख मते आहेत. त्यांच्या जीवावर ते कुणालाही निवडून आणू शकतात, अथवा पाडू शकतात. कोल्हें,पिचड,रामदास धुमाळ, नरेंद्र घुले, थोरात,विखे, यशवंतराव गडाख या काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांच्या अधिपत्याखाली कारखाने आहेत, तेवढय़ाच शिक्षणसंस्थाही आहेत. एकेकाळी कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्हय़ात काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्रित मते मिळतील, अशी आठवलेंची अपेक्षा होती; परंतु विखेंना नगरची जागा मिळाली असती, तर विखेंनी काँग्रेसच्या कोटय़ात आलेल्या आठवलेंना मदत केली असती; परंतु आठवलेंना काँग्रेसकडे पाठवून नगरची जागा पवारांनी राष्ट्रवादीकडे ठेवण्यात यश मिळवले आणि राजकारण सुरू झाले. शिर्डी हा एकमेव मतदारसंघ आहे जेथे अ‍ॅट्रॉसिटीचा मुद्दा खूप चर्चिला गेला.नीळ हवी की गुलाल असा जातीय प्रचार झाला आणि मराठा समाज गुलालाच्या बाजूने भगव्याला साथ देण्यास एकवटला.शरद पवारांनी आठवलेंना माढातून उभे करायला हवे होते, या मतदारसंघातून (पूर्वीचा आठवलेंचा पंढरपूर राखीव मतदारसंघ) अकलूजच्या विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आठवलेंना निवडून आणले होते; पण नगरमधले साखरसम्राट बेजबाबदारपणे वागले. त्यात विखे आणि थोरातांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे आठवलेंना राग येणे स्वाभाविक आहे; पण पवारांनी आठवलेंना या राजकारणाच्या खाईत लोटणे योग्य नव्हते. आयुष्यभर पवारांच्या ओंजळीने पाणी पिणारे आठवले पवारांच्या खेळीचेही बळी ठरले आहेत.रिपब्लिकन नेते एकत्र येऊ शकत नाहीत, ऐक्याची ताकद दाखवू शकत नाहीत. त्यामुळे राजकीय दबाव आणता येत नाही, ही वस्तुस्थिती मान्य करून आठवलेंनी निदर्शने थांबवली पाहिजेत, अन्यथा बौद्ध-मराठा यांच्यातील वैमनस्य अधिक वाढेल  ते समाजस्वास्थ्यासाठी घातक ठरेल. 

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP