Monday, May 18, 2009

राष्ट्रवादीची वाटचाल दिल्लीकडून गल्लीकडे!

शरद पवारांनी राजकारणात विश्वासार्हता कधीच कमावली नाही, राजकीय नेते व कार्यकर्ते यांनी तर नाहीच; पण लोकांनीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. दिवसागणिक त्यांची विश्वासार्हता कमी होत गेली. एवढी की, राज्यात किमान १५ जागा मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राष्ट्रवादीला आठ जागांपर्यंत खाली यावे लागले.


देशाच्या राजकारणात आघाडय़ांचे पेव फुटले होते. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान लोकांना विश्वास देण्याऐवजी पंतप्रधानपदासाठी एकमेकांना विश्वास देण्यात अनेक नेते आघाडीवर होते. आपापल्या वेगवेगळय़ा आघाडय़ा करायच्या आणि वेळ येताच पंतप्रधानपदावर दावा ठोकायचा, यासाठी अनेक जण देव पाण्यात ठेवून बसले होते. देशाला स्थिर आणि मजबूत सरकार देणा-या काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाने सरकार बनवण्यासाठी आघाडय़ांवर अवलंबून राहावे आणि त्यांना सरकार बनवणे अशक्य करून टाकावे म्हणजे ते आपलेच नाव पर्याय म्हणून पुढे करतील, अशा वेडाने अनेकांना झपाटले होते. त्यात महाराष्ट्रातील जाणते राजे आघाडीवर होते. लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी, मायावती, मुलायमसिंग, लालूप्रसाद यादव, नितीशकुमार, शरद पवार, जयललिता, चंद्राबाबू नायडू, रामविलास पासवान, सीताराम येच्युरी, प्रकाश करात असे किती तरी सिंहासनावर उडी मारण्यासाठी टपून बसले होते; पण एकालाही जनतेचा विश्वास संपादन करता आला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तर या सर्व नेत्यांच्या किती तरी आधी पंतप्रधानपदावर नजर ठेवली होती; पण कालच्या निकालाने त्यांच्या महत्त्वाकांक्षेवर पाणी फेरले आहे. गल्लीतून दिल्लीत जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राष्ट्रवादीला माढाच्या गल्लीतच परतावे लागले, दिल्ली बहोत बहोत दूर है हा संदेश लोकसभा निवडणुकीच्या निकालाने राष्ट्रवादीला आणि शिवसेना-भाजप युतीला दिला आहे. शरद पवारांनी ज्या प्रकारे तोडफोडीचे राजकारण आजवर केले, त्याचा सर्वाधिक फटका त्यांना स्वत:लाच बसला आहे. आता तरी जाणते राजे वास्तव जाणून घेतील का, हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना निश्चितपणे पडला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून त्यांच्या सगळय़ा चाली चुकल्या आणि त्यांनी स्वत:ला हास्यास्पद करून ठेवले, इतके की एकाने निकालानंतर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली की, आता बारामतीचे पंतप्रधान होणार का? अशा प्रकारे पवारांची लोकांनी खिल्ली उडवावी, हे अत्यंत खेदजनक आहे.

आघाडय़ांच्या राजकारणाचा जमाना असून कोणालाही बहुमत मिळत नसल्याने कितीही कमी जागा आल्या तरी कोणीही पंतप्रधान होऊ शकतो, असे मानून चाललेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याला आपली प्रतिक्रिया देताना दुसरे टोक गाठावे लागले व सांगावे लागले की, लोकांना स्थिर सरकार हवे असल्याने यूपीएच्या बाजूने कौल दिला आहे. शरद पवारांनी राजकारणात विश्वासार्हता कधीच कमावली नाही, राजकीय नेते व कार्यकर्ते यांनी तर नाहीच; पण लोकांनीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. दिवसागणिक त्यांची विश्वासार्हता कमी होत गेली. एवढी की, राज्यात किमान १५ जागा मिळवण्याचे स्वप्न पाहणा-या राष्ट्रवादीला आठ जागांपर्यंत खाली यावे लागले. राज्यात १००हून अधिक प्रचारसभा घेणा-या पवारांना राष्ट्रवादीची एक जागादेखील वाढवता आली नाही. उलट आधीच्या नऊ जागांमधली एक कमी झाली आहे. राष्ट्रवादीची पश्चिम महाराष्ट्रवादी काँग्रेस अशी अवहेलना केली जात होती; पण या वेळी आणखी गजब झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आता पश्चिम महाराष्ट्रवादीदेखील राहिला नाही. जिकडे - तिकडे पाटलांच्या सवत्यासुभ्यांना खिंडारं पडली आहेत. बारामतीमधून सुप्रिया सुळे निवडून येणे अपेक्षित होते, तसे माढातून स्वत: पवार निवडून येणार नाहीत, असे म्हणण्याचे धाडस कोणी केले नाही. थोडय़ाफार फरकाने का होईना निवडून येतील, अशी भावना लोक बोलून दाखवत होते.
 
बारामती व माढा वगळता पवारांच्या सर्वाधिक प्रचार सभांचा परिणाम एकाही मतदारसंघात दिसला नाही, साता-यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले, त्याचे श्रेय पवारांना देता येणार नाही. उदयनराजेंनी तिकीट घ्यावे याकरिता राष्ट्रवादीनेच त्यांच्यासमोर लालगालिचे पसरले होते. निकालानंतरची उदयनराजेंची प्रतिक्रिया मोठी बोलकी आहे. ते म्हणाले, मी माझ्या जीवावर निवडून आलो आहे, माझ्या हिमतीवर जिंकली आहे, पक्षबिक्ष गेला खडय़ात! पण राष्ट्रवादीच्या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवल्यामुळे ती जागा राष्ट्रवादीच्या कोटय़ातच जाणार आहे. तेव्हा पश्चिम महाराष्ट्रात तीन जागा, उत्तर महाराष्ट्रातील नाशिकची समीर भुजबळ यांची जागा उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक निवडून आणली आहे. तिथे मराठा समाजाने त्यांना भरपूर त्रास दिला होता. त्यानंतर भंडारा-गोंदियाची राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रफुल्ल पटेल यांची जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचा हातभार लागला आहे. पटेलांनी सोनियांच्या सभेचा आग्रह धरला होता. त्यानंतर मराठवाडय़ात उस्मानाबादची डॉ. पद्मसिंह पाटील यांची जागा त्यांनीच निवडून आणली. त्यांच्या भावनिक आव्हानाला लोकांनी प्रतिसाद दिला. बारामती, माढा, सातारा, नाशिक, भंडारा, उस्मानाबाद या सहा जागा प्रत्येकाच्या ताकदीवरच्या आणि उरलेल्या ईशान्य मुंबईची संजय पाटील यांची व ठाण्याची संजीव नाईक यांची जागा मनसेच्या कृपेने आल्या आहेत. तेव्हा पवारांचा करिश्मा कुठेही दिसलेला नाही. पंतप्रधानपदासाठी ज्या नेत्याला महाराष्ट्रासमोर उभे करण्यात आले, त्या नेत्याच्या शब्दाला किंमत देऊन अधिकाधिक जागा जिंकून द्यावयास हव्या हात्या; पण तसे काही घडले नाही. याचे स्वत: पवारांना व त्यांच्या चेलेचपाटय़ांना आत्मपरीक्षण करावे लागेल.
 
राष्ट्रवादी पक्षाला व्यापक दृष्टिकोणातून वाढवणे पवारांना शक्य झाले नाही. प्रत्येक मतदारसंघातील प्रस्थापित मराठा नेत्यांच्या सवत्यासुभ्यांवर लक्ष ठेवून एका जातीची अस्मिता जोपासण्याचे आणि त्यांचे संघटन आपल्या बाजूने उभे करण्यावरच त्यांच्या राजकारणाचा भर राहिला, त्यातूनच विनायक मेटे, पुरुषोत्तम खेडेकरांसारखे फुटीर वृत्ती जोपासणारे लोक पुढे आले. दलित मागासवर्गीय आणि महिला यांचे संघटन करून उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी काम करण्याच्या वल्गना अनेकदा केल्या; पण त्या हवेतच विरल्या. या वल्गना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न झाला नसल्यामुळे राष्ट्रवादीची निवडणूक म्हणजे वाऱ्यावरची वरात ठरली. राष्ट्रवादीच्या ज्या जागा निवडून आल्या त्यात काँग्रेसच्या पुण्याईचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच काँग्रेसमध्ये आता चर्चा सुरू झाली आहे की, यापुढे काँग्रेसने स्वबळावरच निवडणुका लढवल्या पाहिजेत. विश्वासघातकी राजकारण करणा-यांचे लोढणे किती दिवस सांभाळायचे याची चर्चा सुरू झाली आहे.


आता देशात काँग्रेसच्या बाजूने वारे वाहू लागले आहेत, ते विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहणारच आहेत. शिवसेना-भाजपला या निवडणुकीत चांगलाच फटका बसला, मनसेने त्यांची उरलीसुरली ताकददेखील खच्ची केली आहे. या निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा गौण ठरला. भावनिक मुद्दय़ांऐवजी लोकांनी विकासाला अधिक महत्त्व दिले. हिंदूंचा मसिहा अशी प्रतिमा असलेल्या नरेंद्र मोदींनाही लोकांनी झटका दिला. अनेक राज्यांनी मोदींच्या सभा नाकारल्या. मनसेला मराठी अस्मितेच्या मुद्दय़ावर भरपूर मते मिळाली. शिवसेनेपासून मराठी माणसे दूर गेली होती आणि अमराठींचे काँग्रेसच्या बाजूने मजबूत संघटन झाले, त्यामुळे मुंबई-ठाण्यासारख्या महानगरांमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. 

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP