Wednesday, July 27, 2011

विनोदांचे स्फोट


‘बडे शहरोंमे ऐसे छोटे-छोटे हादसे होते रहते है.’26/11 च्या बॉम्बस्फोटासंदर्भात महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी उच्चारलेले हे वाक्य देशभरात फेमस आहे. मंगळवारी त्या वाक्याची पुनरावृत्ती आर. आर. पाटील यांनीच केली आणि स्वत:चीच खिल्ली उडवून घेतली.


जै‘बडे शहरोंमे ऐसे छोटे-छोटे हादसे होते रहते है.’26/11 च्या बॉम्बस्फोटासंदर्भात महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी उच्चारलेले हे वाक्य देशभरात फेमस आहे. मंगळवारी त्या वाक्याची पुनरावृत्ती आर. आर. पाटील यांनीच केली आणि स्वत:चीच खिल्ली उडवून घेतली. आजपर्यंत सर्वच स्तरावर लोकांकडून त्यांची खिल्ली उडवली गेली. आर. आर. आबांनी मोठय़ा अभिमानाने सभागृहात या वाक्याची पुनरावृत्ती करताना सांगितले की, माझ्या लहान भाच्याने माझ्या शैलीत हेच वाक्य ऐकवून माझी नक्कल करून दाखवली. या त्यांच्या विधानावर सभागृहात एकच हास्यास्फोट झाला.

मुंबईवरील भीषण बॉम्बस्फोटाचे पडसाद विधिमंडळात अत्यंत तीव्रतेने आणि गांभीर्याने उमटतील, या प्रकरणावर साधक-बाधक चर्चा होईल आणि सरकारकडून ठोस उपाययोजना जाहीर होतील, ही अपेक्षा फोल ठरली. बॉम्बस्फोटांवर सुमारे पाच तास चर्चा झाली. पण चर्चेचे फलित काय, हे कुणालाच समजू शकले नाही. चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजूंच्या सदस्यांकडून अपेक्षित गांभीर्य कुठेच दिसले नाही. बाष्फळ चर्चा, विनोद आणि एकमेकांवर कोटय़ा करून चर्चेला सदस्यांनी खालच्या पातळीवर नेऊन ठेवले. यावर गृहमंत्री आबा पाटलांनी कळस चढवला. ‘मी हिंदी भाषेत बोलायचे नाही,असे ठरवले आहे. कारण, लोक नक्कल करतात. त्यामुळे कमी बोलायचे ठरवले आहे.’ बॉम्बस्फोटाची सूचना गुप्तचर खात्याकडून मिळाली नाही हे गुप्तचर आणि संपूर्ण गृहखात्याचे अपयश असल्याची टीका झाली. स्वत: केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीदेखील गुप्तचर यंत्रणांना ही सूचना मिळालेली नव्हती, असे स्पष्ट सांगितले होते. तरीदेखील यासंबंधीच्या टीकेला उत्तर देताना आबा पाटलांनी विनोदाची कमाल केली. ते म्हणाले, बॉम्बस्फोटांचा कट आंतरराष्ट्रीय असतो. खबऱ्यांना कसा कळेल? ते माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानात जातील का?

आबांच्या या प्रतिप्रश्नांची चांगली खिल्ली उडवली जात होती. अमेरिकेत 9/11झाले तेव्हा अमेरिकेतील खब-यांनी मेट्रो रेल्वेचे तिकीट काढून पाकिस्तानात माहिती घेण्यासाठी जायला हवे होते का, असा प्रश्न जॉर्ज बुश यांनीही विचारला होता का, अशी मार्मिक प्रतिक्रिया उमटली होती. ज्येष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येनंतर गुन्हेगार पुरावे सोडत नाहीत ते हुशार झाले आहेत पण तरीही आम्ही गुन्हेगार शोधून काढू, असे माध्यमांना सांगितले. पण त्यांनी ‘गुन्हेगार पोलिसांपेक्षा स्मार्ट’ अशी बातमी केली. त्याला मी काय करू, असे आबांनी विचारताच सभागृहात पुनश्च हास्यास्फोट झाला. राम प्रधान समितीचा अहवाल आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली नाही, त्याची कबुली देताना त्यांनीही चर्चेसाठी आपल्याला चार ओळीचे पत्र पाठवले नाही,असे सांगून आबांनी पुन्हा टीका ओढवून घेतली.
 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा अभ्यास करण्यासाठी आपण लंडनला टीम घेऊन जाऊ आणि त्यात विरोधी पक्षनेत्यांनाही नेऊ, असे सांगताना आबा आणखीच घसरले. ते म्हणाले, तेथे आम्ही दोघे आमच्या खर्चाने जाऊ. जनतेच्या खर्चाने जाणार नाही. सरकारच्या खर्चाने गेलो तर आमच्या लंडनवारीची बातमी छापली जाईल. त्यांच्या या वक्तव्याने एकच हशा पिकला. शेवटी तर त्यांनी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनाच साकडे घातले की, आता तुम्ही सांगा मी काय करू? खूप बोललो तर प्रसिद्धीसाठी आणि नाही बोललो तर बोलत का नाही, असे म्हणतात. एकंदरीत बॉम्बस्फोटावरील चर्चेवर सर्वात जास्त विनोदाचे स्फोट दस्तुरखुद्द आबा पाटील यांनीच केले. त्या विनोदाने भारावलेल्या विरोधी पक्षांना सभात्याग करण्याचेही भान राहिले नाही. गृहमंत्री आबा आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी दुपारी एकत्र भोजन केले होते. त्या स्नेहभोजनाचा तर हा परिणाम नव्हता ना?

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP