Friday, July 29, 2011

उमाळा बिल्डरांचा..


बॉम्बस्फोट आणि वारकरी अपघात या प्रकरणी ढेपाळलेले विरोधक गुरुवारी गिरणी कामगारांच्या प्रश्नावर आक्रमक होतील, असे वातावरण सुरुवातीला निर्माण केले होते. सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न विरोधकांच्या अंगाशी आला.


बॉम्बस्फोट आणि वारकरी अपघात या प्रकरणी ढेपाळलेले विरोधक गुरुवारी गिरणी कामगारांच्या प्रश्नावर आक्रमक होतील,असे वातावरण सुरुवातीला निर्माण केले होते. सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न विरोधकांच्या अंगाशी आला. विरोधी सदस्यांना गिरणी कामगारांचा उमाळा आहे की, बिल्डरांचा असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला. गिरण्यांच्या जमिनी खरेदी करणारे कोण, या सत्ताधा-यांच्या प्रश्नावर विरोधकांची बोलतीच बंद झाली. कारण युतीच्या अनेक नेत्यांनी गिरण्यांच्या जमिनी खरेदी करून उत्तुंग इमारती उभारल्या. त्यातले एकही घर गिरणी कामगाराला मिळालेले नाही. त्यामुळे कामगारांच्या संघटनांना पाठिंबा देऊन मोर्चा काढला खरा, पण सभागृहात कामगारांऐवजी त्यांना बिल्डरांचाच उमाळा असल्याचे चित्र उमटले.

सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी गोंधळाला सुरुवात केली. विधानसभेत अध्यक्ष विराजमान होण्याआधीच विरोधक वेलमध्ये जमा झाले. अध्यक्षांचे आगमन होताच विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न सुटला नसल्याबद्दल निषेधाचे फलक फडकवले. अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू करून प्रश्नोत्तरे पुकारली. मात्र विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवला. गिरणी कामगारांच्या प्रश्नावर सरकारने चर्चा करावी आणि त्यासाठी प्रश्नोत्तराचा तास स्थगित ठेवावा, अशी मागणी विरोधकांनी केली. त्यावेळी अध्यक्षांनी चर्चेची तयारी दर्शवताना, प्रथम प्रश्नोत्तराचा तास पूर्ण करू आणि त्यासाठी सर्व सदस्यांनी आपल्या जागेवर बसावे, अशी सूचना केली. मात्र सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवताना नेहमीच्या जागेवर न बसता अध्यक्षांच्या समोर वेलमध्ये बसण्याचे ठरवले. सदस्य वेलमध्येच बसल्याने अध्यक्षांनी, ‘‘आज जेथे बसलात तेथेच उद्यापासून बसावे, प्रत्येकाने आपापल्या जागा लक्षात ठेवाव्यात,’’ असे सांगून त्यांची खिल्ली उडवली.
राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले सुरेशदादा जैन सहका-यांसोबत वेलमध्ये बसण्यासाठी पुढे आले. मात्र, अध्यक्षांनी त्यांना रोखले. ‘दादा तुम्ही कशाला त्यांच्याबरोबर वाहत जाताय, तुम्ही तुमच्या जागेवर बसा’, असे अध्यक्षांनी सांगताच दादा जागेवरच बसले. त्यानंतर भाजपचे आमदार सरदार तारासिंग पुढे येऊ लागले तेव्हा अध्यक्षांनी ‘सरदार तारासिंग तुम्ही देशाचे नेते आहात, तुम्ही तुमच्या जागेवर बसा’, अशी खिल्ली उडवत भाजपचे सदस्य देवेंद्र फडणवीस यांना ‘तुम्ही उत्कृष्ट संसदपटू आहात, तुम्हीही जागेवर बसा’, असे सांगताच ते जागेवरच उभे राहिले. शेवटी सभागृहात विरोधकांच्या घोषणा वाढल्या तेव्हा सत्ताधारी सरसावले. ‘गिरण्यांच्या जमिनी हडप करणाऱ्या शिवसेना, भाजप, मनसे नेत्यांची नावे जाहीर करा’,अशी मागणी करून राष्ट्रवादीचे सदस्य जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे यांनी विरोधकांची तोंडे बंद केली.

विधान परिषदेतही गिरणी कामगारांच्या प्रश्नावरून स्थगन प्रस्ताव देण्यात आला. सभापती शिवाजीराव देशमुख यांनी गिरणी कामगारांचा प्रश्न गंभीर असल्याची आम्हालाही जाणीव आहे. या मुद्दय़ावर चर्चा झालीच पाहिजे. मात्र
, प्रश्नोत्तराचा तास होऊ द्यावा, अशी भूमिका मांडली. त्यानंतरही विरोधकांनी आग्रह धरला असता, सभापतींनी त्यांना आपल्या दालनात चर्चेला बोलावले. चर्चा लवकर पूर्ण न झाल्याने सहा वेळा कामकाज तहकूब करण्यात आले. शेवटी सभागृहात आल्यानंतर विरोधकांनी गिरणी कामगारांना घरे मिळालीच पाहिजेत, अशा घोषणा दिल्या. सरकारने दिवसभराचे कामकाज उरकून घेतले आणि सभापतींनी सभागृहाची बैठक दिवसभरासाठी तहकूब केली. कामकाज तहकूब झाल्यानंतर सत्ताधारी, विरोधी दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. विरोधकांची घोषणा होती, ‘चर्चा नको घरे द्या’, त्यावर सत्ताधारी प्रत्त्युतर देत होते, ‘गिरण्यांच्या जमिनी लाटणा-या नेत्यांचा धिक्कार असो.’ सत्ताधा-यांच्या या आरोपावर विरोधकांकडे उत्तर नव्हते.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP