Saturday, July 30, 2011

विरोधकांचा पर्दाफाश


गिरणी कामगारांच्या घरांचे प्रन सोडवण्याचा निर्धार आपलाच आहे, आपणच त्यांचे तारणहार आहोत, आपणच त्यांना मोफत घरे देणार आहोत, असा आव आणून गुरुवारी मोर्चा काढणा-या विरोधकांचे प्रेम पुतना मावशीचे होते. हे आज दोन्ही सभागृहांत स्पष्ट झाले.


गिरणी कामगारांच्या घरांचे प्रन सोडवण्याचा निर्धार आपलाच आहे, आपणच त्यांचे तारणहार आहोत, आपणच त्यांना मोफत घरे देणार आहोत, असा आव आणून गुरुवारी मोर्चा काढणा-या विरोधकांचे प्रेम पुतना मावशीचे होते. हे आज दोन्ही सभागृहांत स्पष्ट झाले. गिरणी कामगारांसाठी विविध कामगार संघटनांबरोबर सर्व विरोधी पक्ष आपापले झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले. त्यांनी सरकारला जबरदस्त हादरा दिला, असा डांगोरा पिटणारे विरोधी पक्षाचे नेते आज उघडे पडले. लाखोंचा मोर्चा असल्याचा दावा करणा-या विरोधी पक्षांच्या दोन्ही सभागृहात विरोधी आमदारांची उपस्थिती नगण्य होती. मोर्चात डरकाळय़ा फोडणा-या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 45 पैकी मोजून सहा आमदार सभागृहात उपस्थित होते. कामगारांना मोफत घरे देण्याच्या मागणीसाठी आपले आमदार सभागृहात रणकंदन करतील आणि सरकारला जाब विचारतील ,अशी डरकाळी फोडणा-या ठाकरेंच्या आमदारांनी त्यांची पुरती गोची करून टाकली. मुंबईचे आमदारदेखील चर्चेच्यावेळी सभागृहात उपस्थित नव्हते. शिवसेना, भाजप व मनसेचे मिळून एकूण 103 आमदार आहेत. यापैकी शिवसेनेचे पाच, भाजप पाच आणि मनसे पाच असे 15 आमदार चर्चेला उपस्थित राहिले.

खरेतर गिरण्यांच्या जमिनींची विक्री आणि कामगारांना घरे अशाप्रकारचा चर्चेचा प्रस्ताव आणून विरोधक स्वत:च उघडे पडले. सत्ताधारी सदस्यांनी त्यांच्या वर्मावर बोट ठेवत गिरण्यांच्या जमीन विक्रीला युती सरकारच्या काळात परवानगी दिली आणि गिरण्यांच्या जमिनी शिवसेना व भाजप नेत्यांनीच बळकावल्या, असा पर्दापाश करून त्यांचा आवाज बंद करून टाकला. भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी तीन गिरण्यांच्या जमीनी घेतल्या आणि त्यावर टॉवर बांधले, ते गिरणी कामगारांसाठी नव्हे तर धंद्यासाठी आणि कोहिनूर मिलची जमीन शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्याच मुलाने घेतली, असे सांगितल्याने शिवसेना, भाजप नेत्यांना थातूर-मातूर उत्तर देऊन वेळ मारून न्यावी लागली.
 
कालच्या मोर्चात शिवसेनेबरोबर मोफत घरांची मागणी करणा-या भाजपने सभागृहात घुमजाव केले. खडसे यांनी मोफत नव्हे माफक दरात द्या आणि लॉटरी काढून दिली तरी चालतील, अशी सरकारला अनुकूल भूमिका मांडली. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आपला पूर्ण विश्वास असल्याचे सांगून त्यांच्यासमोर चक्क नमते घेतले.
 
विधानसभेत काँग्रेसचे मधु चव्हाण, राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे, जिंतेद्र आव्हाड यांनी तर विधान परिषदेत काँग्रेसचे भाई जगताप आणि राष्ट्रवादीचे किरण पावसकर यांनी शिवसेना, भाजपने गिरणी कामगारांच्या टाळूवरचे लोणी कसे खाल्ले, हे सांगून त्यांच्या विरोधातील हवाच काढून घेतली. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी गोंधळ घालणा-या विरोधकांना कामगारांची नव्हे निवडणुकीची चिंता असल्याचे सांगून त्यांची बोलती बंद केली.
 
मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी अत्यंत भावूक भाषण करून गिरणी कामगारांच्या परिस्थितीचे दारुण वास्तव कथन केले. उद्धव आणि राज यांचा नामोल्लेख टाळून शिवसेनेच्या ‘मुंबई बंद’मध्ये मनसे सहभागी नसल्याचा मिश्किल टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी मारला होता. त्यावर आमचे नाते रक्ताचे आणि भक्ताचे आहे, वाटा मागणारे नाही, असा प्रतिटोला नांदगावकर यांनी लगावला.


सभागृहाची नियोजित वेळ संपली तरी अनेक सदस्यांना बोलायचे होते. जिंतेद्र आव्हाड यांना अपेक्षित वेळ मिळाला नसल्याने त्यांनी रागात भाषण बंद करून सभागृहबाहेर धूम ठोकली. अध्यक्षस्थानी असलेल्या नवाब मलिक यांनी सदस्यांना वेळेचे भान ठेवण्याचे आवाहन केले. परंतु, सदस्य आपले ऐकत नाहीत, तेव्हा संसदीय कार्यमंत्री बाळासाहेब थोरात यांनीच निर्णय घ्यावा, असे सूचवले. थोरातही सदस्यांना थोपवू शकले नाहीत तेव्हा प्रत्येकाने समजून उमजून आवरते घ्यावे, असे मलिक यांनी सांगितले. शेवटी सदस्यांना आवरते घ्यायला लावून मुख्यमंत्र्यांचे उत्तर ऐकणे भाग पडले.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP