Monday, October 31, 2011

भारतरत्न-गिनिस रेकॉर्ड, दखल-बेदखल


भारतरत्न इंदिराजी, राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी प्राणाची बाजी लावून कर्तृत्व गाजविले, महाराष्ट्रात ठाकरे कुटुंबीयातील नररत्ने मात्र राज्याच्या एकात्मतेला सुरुंग लावण्याचा सतत प्रयत्न करीत आहेत. अमिताभ आणि सचिनमध्ये भारतरत्न मिळण्यासाठी स्पर्धा लावीत आहेत. गिनीस बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करून कर्तृत्व सिद्ध करणा-या नितेश राणे यांच्याबाबत पक्षपातीपणा केला जात आहे. पदांबरोबर व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेण्यासाठी मनाचा मोठेपणा दाखविला जात नाही.


भारतरत्न हा सर्वोच्च किताब अमिताभ बच्चन यांना द्यायचा की सचिन तेंडुलकरला यावरून सध्या महाराष्ट्रात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. भारतरत्न व देशाच्या माजी पंतप्रधान इंदिया गांधी यांचा आज 31 रोजी स्मृतीदिन, देशाच्या एकात्मतेसाठी प्राणपणाला लावणा-या इंदिराजी तसेच त्यांचे सुपूत्र भारतरत्न माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीही देशाच्या एकात्मतेसाठी प्राणाची आहुती दिली, त्यांच्या त्यागाचे स्मरण करताना भारतरत्न किताबासाठी त्यांची नावे समर्पक आणि वादातीत होती. त्यांना भारतरत्न का दिले? द्यावे की देऊ नये याची कुठेही चर्चा झली नाही एवढी ही व्यक्तीमत्त्वे उतुंग आहेत. लता मंगेशकरांनी आयुष्यभर गानसेवा करून जगभरात भारताचे नाव रोशन केले म्हणून त्यांनाही भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले. पण यंदा भारतरत्न कोणाला द्यायचे याची चर्चा जर भारतरत्न मिळालेल्या लतादिदी करणार असतील तर ते कितपत योग्य आहे. याचाही विचार झाला पाहिजे. महाराष्ट्र ही तर रत्नांची खाण आहे. भारतरत्न इंदिराजी, राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी प्राणाची बाजी लावून कर्तृत्व गाजविले, महाराष्ट्रात ठाकरे कुटुंबीयातील नररत्ने मात्र राज्याच्या एकात्मतेला सुरुंग लावण्याचा सतत प्रयत्न करीत आहेत. अमिताभ आणि सचिनमध्ये भारतरत्न मिळण्यासाठी स्पर्धा लावीत आहेत. गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करून कर्तृत्व सिद्ध करणा-या नितेश राणे यांच्याबाबत पक्षपातीपणा केला जात आहे. पदांबरोबर व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेण्यासाठी मनाचा मोठेपणा दाखविला जात नाही.


भारतरत्न देण्याची मागणी केली म्हणून अमिताभला हा सर्वोच्च किताब मिळेल असा समज जर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी करून घेतला असेल तर त्याला कोण काय करणार? अमिताभला भारतरत्न द्या मग सचिनला का नको? याचे उत्तरही त्यांनी दिले पाहिजे. एका भारतरत्न मिळालेल्या गुणवंत व्यक्तीने म्हणजेच लता मंगेशकरांनी अमिताभ हा सचिनपेक्षा सरस आहे. त्यालाच भारतरत्न द्या, अशी मागणी करणे हास्यास्पद आहे. आपल्या भारतरत्नाचा आब राखण्यासाठी या वादात लतादिदींनी पडता कामा नये, अशी सर्वसामान्यांची भावना आहे. अमिताभ बच्चने जनतेसाठी काय केले आहे, करोडो रुपये घेऊन लोकांचे मनोरंजन जरूर केले, तसेच सचिनने देखील केले आहे. इंदिरा गांधीसारखा कोणताही त्याग नाही. देश एकसंघ ठेवण्यासाठी कर्तृत्व गाजवलेले नाही, देशाच्या विकासकार्यात भर घालून गोरगरीबांची सेवा केलेली नाही, करोडो रुपये कमवून लोकांचे मनोरंजन तेवढे केले आहे, अशा अभिनेत्याला भारतरत्न देण्याची मागणी करून चर्चा सुरू करणारांचा अंतस्थ हेतू निराळाच असावा. भारतरत्न हा किताब केंद्र सरकार देते, यासाठी ज्या क्षेत्रातील व्यक्ती असेल त्या क्षेत्रातील मुख्यसंघटनेचा प्रस्ताव पाठवावा लागतो. अमिताभच्या भारतरत्नसाठी फिल्म संघटनेने प्रस्ताव पाठवावा लागेल, हा प्रस्ताव संबंधित सरकारच्या सांस्कृतिक विभागाने पाठवावा लागेल. समाजवादी पक्षाशी थेट संबंध असलेल्या अमिताभचा प्रस्ताव बहुजन समाज पार्टीचे मायावती सरकार पाठविल का हेही पहावे लागेल. कारण असा प्रस्ताव ती व्यक्ती ज्या राज्यातील असेल त्या राज्य सरकारने पाठविणे आवश्यक आहे. पद्म पुरस्कारांसाठी असलेले निकष भारतरत्नसाठी देखील आहेत. अद्वितीय कामगिरी बजावणाऱ्या दिवंगत नेत्यांना या प्रक्रियेमधून जाण्याची गरज नाही. त्यांना सर्वानुमते  हा किताब दिला जातो. पण आता या पदासाठी स्पर्धा सुरू झाली असल्याने संपूर्ण प्रक्रियेतून जावे लागेल. या स्पर्धेमुळे अद्वितीय व्यक्तिमत्व असेल त्याचेही अवमूल्यन होईल.
 
सचिनने तो केवळ मुंबई महाराष्ट्राचा नाही तर सर्वाचा, सर्व जगाचा असल्याचे विधान केल्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्याला भारतरत्न देण्यास विरोध केला. मराठीपणाचा सदैव उद्घोष करणाऱ्या शिवसेनाप्रमुखांना सचिनच्या मराठीपणाचा विसर कसा पडला? त्याच्या विशाल कतृत्वाप्रमाणे आणि त्याला जगात मिळणाऱ्या लोकप्रियतेला उतराई होण्यासाठी आपण सर्वाचे आहोत, असे व्यापक विधान केले. त्यावर शिवसेनेने अत्यंत संकुचित वृत्तीने टीका केली. इतकेच नव्हे तर शिवसेनेकडे असलेल्या महानगरपालिकेने सचिनचा गृहप्रवेश होण्यापूर्वी परवानगी घेतली नाही, म्हणून त्याला दंड ठोठावला आहे. ही कृतीसुद्धा त्यांचा संकुचितपणाच दर्शविते.
 
अमिताभ हा बॉलिवूडचा शहेनशहा आहे पण सचिन क्रिकेट सम्राट नाही असे म्हणणे हा पक्षपातीपणा आहे. अमिताभचे नाव पुढे चालविण्यात शिवसेनेचा राजकीय डाव दिसतो. एरवी उत्तर भारतीयांना शिव्या-शाप देणारी शिवसेना निवडणूक काळात अगदी शिवसेना भवनात उत्तर भारतीयांचे मेळावे भरवते. आता संजय निरुपम यांनी केलेल्या वक्तव्यामुळे उत्तर भारतीय दुरावण्याची भीती शिवसेनेला वाटू लागली. त्यामुळे अमिताभचे नाव भारतरत्नसाठी पुढे करून उत्तर भारतीयांना आकर्षित करण्याचा डाव खेळला जात आहेत.
 
अर्थात काँग्रेसचे संजय निरुपम यांनी उत्तर भारतीयांची एकगठ्ठा मते मिळविण्यासाठी मराठी माणसांवर टीकास्त्र सोडले त्याचेही समर्थन करता येणार नाही. ज्या मराठी माणसाने रक्ताचे पाणी करून मुंबई महाराष्ट्र प्रगतीपथावर नेला त्या मराठी माणसाने नव्हे तर उत्तर भारतीयांनी मुंबईचे ओझे खांद्यावर घेतले असे म्हणणे अन्यायकारक आहे. ज्या काँग्रेसने विविध जाती, धर्म, पंथ, भाषा प्रदेश या सर्वाना एकाच सूत्रात बांधून राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता कायम राखण्यावर भर दिला त्या काँग्रेस नेत्याने मतांसाठी केवळ एकाच प्रांताच्या लोकांची बाजू उचलून धरणे आणि मराठी माणसाला खडय़ासारखे उचलून बाजूला ठेवणे योग्य नाही. शिवसेनेचा सर्वनाश करण्याची भाषा करणारे संजय निरुपम उत्तर भारतीय अणि मराठी मतांचे विभाजन करून शिवसेनेचा सर्वनाश कसा करणार? शिवसेनेचा सर्वनाश करण्याचे काम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी हाती घेतले आहे. त्यांना साथ देण्याऐवजी मतविभाजन करणा-यांना अभय दिले जात आहे ही काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे. तोडफोडीचे राजकारण करणारी ठाकरे कंपनी असो अथवा अन्य कोणी स्वयंघोषित नेते असो त्यांना दूर ठेऊन लोकांनी या शहराची एकात्मता कायम राखली पाहिजे. आपल्या मर्जीतल्या व्यक्तीला भारतरत्न द्या असे संकुचित धोरण अवलंबिणारे कधी ‘मी मुंबईकर’ तर कधी ‘मी मराठी’ म्हणणारे ‘मी दादरकर’पर्यंत खाली घसरतील याबद्दल शंका बाळगण्याचे कारण नाही.

करोडोंची माया जमविणा-यांना भारतरत्न देण्याची मागणी करायची, त्यातही अमिताभ बच्चन आणि सचिन यांच्यामध्ये पक्षपातीपणा करायचा, करोडो रुपये कमवून गाण्याचे जागतिक रेकॉर्ड करायचे, त्याची गिनिज बुकात नोंद झाली तर कौतुकांचा चोहोबाजूंनी वर्षा करायचा, या कौतुकाची नोंद करायला वृत्तपत्रे आणि प्रसिद्धी माध्यमे देखील पुढे सरसावली ही चांगली गोष्ट आहे. जे चांगले त्याचे कौतूक झालेच पाहिजे. पण हा न्याय सर्वाना सारखाच मिळाला पाहिजे. एकीकडे आशाबाईंनी वर्ल्डरेकॉर्ड केला म्हणून वृत्तपत्रे व प्रसार माध्यमांचे रकाने भरले गेले. मात्र 25 हजार 300 बेरोजगारांना एकाच दिवशी काम दिल्याने गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या स्वाभिमान संघटनेचे नितेश राणे यांच्या कर्तृत्वाकडे मात्र दुर्लक्ष झाले. खरे तर हजारोंचे संसार उभे करणा-या आणि सर्वसामान्यांना दिलासा देणा-या या रेकॉर्डकडे अधिक आत्मियतेने पाहण्याची गरज होती. मात्र तसे घडले नाही. हे रेकॉर्ड करणा-या तरुणाच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याबाबत मात्र हात आखडले गेले. आजपर्यंत कोणत्याही युवानेत्याने जे केले नाही ते नितेश राणे यांनी करून दाखविले आहे. हे कौतूकास्पद आहेच. पण एका मराठी तरुणाचे हे कर्तृत्व महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असेच आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP