Monday, August 31, 2015

महाराष्ट्रात होईल का ‘हार्दिक पटेल’?

महाराष्ट्रातील मराठा समाज हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना यांच्यासह अनेक संघटनांमध्ये विभागला गेला असल्याने त्यांच्यात एकजूट होऊन हार्दिक पटेल निर्माण होणे केवळ अशक्य आहे़ त्यामुळे आरक्षणाची मागणी लावून धरण्याची तीव्रता गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात दिसू शकत नाही़

देशातील सर्वच जातीपातींना आरक्षण हवे आहे़ उच्चवर्णीय असल्याचा टेंभा मिरवणाºया जातींनाही आरक्षणासाठी मागासवर्गीय बनायचे आहे़ मागासवर्गीय बनल्याशिवाय आपला विकास साधणार नाही, अशी त्यांची ठाम समजूत झालेली दिसते़ स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेल्या ६५ वर्षांत मागासवर्गांना मिळणाºया आरक्षणामुळे तथाकथित उच्च जातींमध्ये असूया निर्माण झाली होती़ या असुयेचे अस्मितेमध्ये रूपांतर झाले असून आरक्षणासाठी सर्व जातींमधून मागणी वाढू लागली आहे़ महाराष्ट्रातील मराठा समाजानेही आरक्षणाची मागणी केली़ गुजरातमध्ये मात्र एकट्या हार्दिक पटेल नावाच्या अवघ्या २२ वर्षांच्या युवकाने रस्त्यावर उतरून पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी संपूर्ण समाजाला एकत्र आणले़ गुजरातमध्ये अनेक ठिकाणी त्याच्या लाखांवर सभा होऊ लागल्या़ या समाजाने जी एकजूट दाखवली ती पाहून येथील मराठा समाजांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली़ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी येथील मराठा समाजाला गुजरातप्रमाणे एकजूट दाखवण्याचे आवाहनच केले़ वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये विभागलेले मराठा नेते एकत्र येतील का? आणि त्यांच्यापैकी एकाच्या नेतृत्वाखाली आरक्षणाचे आंदोलन करतील का अथवा मराठा समाजामध्ये कोणी ‘हार्दिक पाटील’ निर्माण होईल का? हा प्रश्नच आहे़
आजकाल एखादी जाहीर सभा घ्यायची तर राजकीय पक्षांना ट्रक भरून लोक आणावे लागतात, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करावी लागते, त्यांना बिदागी द्यावी लागते तरच सभा यशस्वी होऊ शकते़; पण लाखभर लोक स्वत:हून सभेसाठी येतात आणि हार्दिक पटेलला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात, अशा प्रकारचे दृश्य अलीकडच्या काळात दुर्मिळ झाले आहे; परंतु या आंदोलनाला हिंसक स्वरूप येवून त्यात १० जणांचे बळी गेले, ही बाब अत्यंत गंभीर असून नरेंद्र मोदींच्या राज्याला भूषणावह नक्कीच नाही़ हार्दिक पटेल हा सरदार पटेलांच्या नावाने सेवादल स्थापन करतो काय, त्यानंतर पटेल समाजाला आरक्षण या विषयावर एकत्र करतो काय आणि लाखोंच्या सभा घेतो काय, हे सर्व कोणत्याही राजकीय विश्लेषकाला चकित करणारे आहे़ आपल्या देशाची सर्वात मोठी लोकशाही दिवसेंदिवस अधिक भक्कम होत असताना हार्दिक पटेलसारख्या तरुणाने सरकारला हिंसक मार्गाचा अवलंब करत आव्हाने देण्याच्या ज्या गर्जना केल्या आणि त्याला लोकांनी उदंड प्रतिसाद दिला, हे सर्व दिङमूढ करणारे आहे़ समाजसेवेत अनेक दशके कार्यरत असणाºया मुरब्बी राजकारण्यालाही हे कौशल्य जमत नाही ते पावसाळ्यात उगवणाºया छत्रीप्रमाणे उगवलेल्या हार्दिकला कसे काय जमले? हे पाहून सारे राजकीय पक्ष व त्यांचे नेतेही अचंबित झाले आहेत़ ज्या गुजरातचे नेतृत्व गेली १५ वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले तेही हार्दिकच्या लाखोंच्या सभा पाहून हवालदिल झाले असतील़ एरवी विरोधकांनी देशभर गदारोळ केलेल्या मुद्यांवर नरेंद्र मोदी बोलत नाहीत परंतु या पटेल आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन खास गुजरातीमध्ये त्यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले़ चर्चेतून मार्ग काढता येऊ शकेल, असे आश्वासनही दिले़ म्हणजेच या हार्दिक पटेलची दखल पंतप्रधान मोदींनाही घ्यावी लागली यातच हार्दिकचे महत्त्व सामावले आहे़
गुजरातमध्ये १२ टक्के असलेल्या पटेल समाजाने सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रांमध्ये साम्राज्य निर्माण केले आहे़ हा समाज सधन व प्रगतीशील आहे. इतकेच नव्हे तर या समाजाने जगभर अनेक व्यवसायांवर आपली पकड बसवली आहे़ अशा पटेल समाजाला आरक्षणाची गरज का बरे भासली? असा प्रश्न साहाजिकच उपस्थित होतो़ मुळात गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये हिंदू समाजातील सर्व जातीजमातीचे ध्रुवीकरण होऊन हा समाज एकजुटीने भाजपच्या पाठीमागे उभा राहिला़ विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी अशा अनेक संघटनांचा त्यात प्रमुख सहभाग होता़ नरेंद्र मोदींचे राजकीय नेतृत्व हिंदुत्ववादावर याच ठिकाणी प्रगल्भ झाले़ ते दिवसेंदिवस विकसित होऊन पंतप्रधान पदापर्यंत पोहोंचले़ गुजरातच्या प्रयोगाने हिंदुत्ववादी जहाल संघटना देशभर प्रबळ झाल्या; परंतु देशाच्या अन्य भागांत त्यांना निवडणुका जिंकता आल्या नाहीत़ गुजरातमध्ये मात्र मोदींनी भाजपला कायम सत्तेत ठेवले़ ज्यांनी मोदींना मोठे केले त्याच जहालवाद्यांनी हार्दिक पटेल प्रकरणाला समर्थन दिले असावे़ गुजरात ही जहालवाद्यांची प्रयोगशाळाच जणू बनली आहे़ किंबहूना हिंदुत्ववादी संघटनाच त्याच्यामागे आहेत़ विशेष म्हणजे या संघटनांचा आरक्षणाला सक्त विरोध असल्यानेच हार्दिक पटेलने ‘आम्हाला नाही तर कोणालाच आरक्षण देऊ नका’ असा पवित्रा आपल्या भाषणात घेतला़ कट्टर हिंदुत्ववादी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याप्रतीदेखील त्याने जाहीर आदर व्यक्त केला आहे तो यामुळेच़आरक्षणाची मागणीच करायची होती तर आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आणि डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख तरी त्याने करावयास हवा होता़ त्यांचा मात्र हार्दिकला विसर पडला़ आज गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल   आहेत़ यापूर्वीही राजकारणातप्राबल्य असलेल्या पटेल समाजाचे चिमणभाई पटेल, बाबूभाई पटेल, केशूभाई पटेल हे मुख्यमंत्री झाले आहेत़ आजही गुजरातच्या विधानसभेत ५६ आमदार या समाजाचे आहेत. असे असतानाही आरक्षणाच्या मुद्द्याने गंभीर स्वरूप धारण केले आहे़ लोकांमध्ये आरक्षणावरून धूमसत असलेल्या असंतोषाला संघटीत करण्याचे काम हार्दिकने केले आहे़महाराष्ट्रातही असेच घडले़ महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून काँग्रेस सरकारमध्ये वर्चस्व असलेल्या मराठा समाजाच्या काही विशिष्ट नेत्यांनी आपल्याच हाती सत्ता केंद्रीत केली आणि गरीब मराठ्यांच्या विकासाचा विचार केला नाही़ त्यामुळे मराठा समाजाच्या अनेक संघटनांनी आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला़ त्यांच्या असंतोषाचा फायदा घेत शिवसेना-भाजप या पक्षांनी मराठा समाजातील नेत्यांना आकर्षित करून त्यांना निवडणुकीसाठी तिकिटे आणि पक्षपातळीवर पदे देण्यास सुरुवात केली़ त्यामुळे अनेक वर्षे सत्ता उपभोगणाºया नेत्यांपासून गरीब मराठा समाज तुटत चालला आणि शिवसेना-भाजप युतीला ताकद मिळू लागली़ परिणामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला़ शेवटी राजकीय कारणास्तव  काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारचे डोळे उघडले आणि विधानसभा निवडणुका तीन-चार महिन्यांवर आलेल्या असताना मराठ्यांना १६ टक्के आणि मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, तरीदेखील लोकसभेची पुनरावृत्तीच विधानसभा निवडणुकीत झाली़ मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा केंद्र सरकारने निकाली काढला तर मराठा समाजाच्या आरक्षणाचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत़ आघाडीची १५ वर्षे सत्ता असताना त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न धसास लावला नाही आणि आता १५ दिवसांत फडणवीस सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील देत आहेत़ राष्ट्रवादी काँग्रेसनेही मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षणाचा त्वरित निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे़ महाराष्ट्रातील मराठा समाज हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना यांच्यासह अनेक संघटनांमध्ये विभागला गेला असल्याने त्यांच्यात एकजूट होऊन हार्दिक पटेल निर्माण होणे केवळ अशक्य आहे़ त्यामुळे आरक्षणाची मागणी लावून धरण्याची तीव्रता गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात दिसू शकत नाही़ क्षत्रिय वर्गात येणाºया महाराष्ट्रातील मराठा, गुजरातमधील पटेल, राजस्थानातील गुज्जर, उत्तरेतील जाट या जातींनी कायम सत्ता भोगली आहे़तरीदेखील या जातींमध्ये आर्थिक विषमता वाढत गेली असल्याचा दावा केला जात आहे आणि त्यांना मागास प्रवर्गात समावेश करून हवा आहे़ वास्तविक पाहता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानूसार ५० टक्क्यापेक्षा अधिक आरक्षण देता येणे अशक्य असल्याने हा प्रश्न सोडविणे कठीण आहे़ या समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट केले तर सर्वच ओबीसीमधील जाती उठाव करून देशात अराजक निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही़ तेंव्हा हा प्रश्न केंद्र सरकार कसा सोडवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़ मात्र महाराष्ट्रात सध्या जो आवाज उठू लागला आहे तो पाहता गुजरातच्या हार्दिक पटेलपासून प्रेरणा घेऊन येथे काही घडते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल़ त्याचबरोबर हार्दिकचे आंदोलनही तरी अधिक काळ चालते का, याविषयी शंका वाटत आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP