Sunday, February 6, 2011

नारायण राणे यांनी बांधला ‘संवाद सेतू’!

(05 February, 2011)

उद्योगमंत्री नारायण राणे यांनी प्रकल्पग्रस्त जैतापूर परिसरातील ग्रामस्थांशी संवाद साधत सरकार आणि जनता यांच्यातील संवादाचा एक नवाच सेतू तयार केला.

रत्नागिरी-जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांच्या भावना तीव्र आहेत. त्यांचा विरोध एवढा टोकाचा आहे की, ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यांच्याशी संवाद साधण्याच्या सर्व कार्यक्रमांवर ते बहिष्कार घालतात. या सर्व अनुभवांना एक सुखद छेद देत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी प्रकल्पग्रस्त जैतापूर परिसरातील ग्रामस्थांशी संवाद साधला. तेव्हा मात्र सरकार आणि जनता यांच्यातील संवादाचा एक नवाच सेतू तयार झालेला सर्वाना बघायला मिळाला. राणे यांच्या प्रयत्नांना काँग्रेस सोबतच राष्ट्रवादीतील सर्व नेत्यांनी साथ दिली आणि एकजुटीचे दर्शन घडवले तर जनतेचे मतपरिवर्तन होऊन जैतापूर प्रकल्प पूर्ण होण्यातील अडथळे दूर होतील, हा संदेशही राणे यांच्या या भेटीने दिला.
 
शिवसेना वगळता जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला प्रमुख राजकीय पक्षांचा तत्त्वत: विरोध नाही. शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपचा प्रकल्पाला विरोध नसून केवळ प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन व्हावे, असा आग्रह आहे. केंद्रातील काँग्रेस आघाडी सरकारचाच हा प्रकल्प असल्याने राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही सर्व ताकदीनिशी या प्रकल्पाला समर्थन देण्यासाठी पुढाकार घ्यावा, ही अपेक्षा आहे. राज्यातील सरकारमध्ये काँग्रेससह सहभागी झालेला राष्ट्रवादी पक्ष कोकणामध्ये उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे. कोकणातील सर्व काँग्रेसजनांचा आणि राष्ट्रवादीचा याबाबत थंड प्रतिसाद असल्याचे दिसत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हेही राष्ट्रवादीचे आहेत. मात्र जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात वातावरण निर्मिती होत असताना त्यांनी मात्र मूग गिळून बसणेच पसंत केलेले दिसते. प्रकल्पविरोधी संघर्ष समितीमध्ये सहभागी झालेल्या कोकणाबाहेरील काही विघ्नसंतोषी तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांनी येथील जनतेची मने कलुषित करण्याचे सतत प्रयत्न सुरू ठेवले, मात्र  राणे वगळता कोणीही त्यांचे गैरसमज दूर करण्याकरिता पुढे आलेले नाही. त्यामुळे अणुऊर्जा प्रकल्प हा आघाडी सरकारचा प्रकल्प आहे की, केवळ काँग्रेस पक्षाचा प्रकल्प आहे, अशी शंका वाटू लागली आहे. अणुऊर्जा प्रकल्प होत असलेल्या भागाला भेट देऊन तेथील नागरिकांचे शंका-समाधान करण्यासाठी पहिला सरकारी अधिकृत दौरा काढण्यासाठी राणे यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी चांगली वातावरण निर्मिती करण्यात यश मिळवले आहे. यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे या भागास भेट देणार असून, त्यासाठी पार्श्वभूमी निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम राणे यांनी शुक्रवारी केले आहे. 

प्रकल्प विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेला सडेतोड शास्त्रीय उत्तर देऊन त्यांचे गैरसमज दूर करण्याची जबाबदारी सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर असताना राणे हेच सर्वाशी एकाकी लढत देत असल्याचे चित्र दिसत आहे. राणे यांच्या समवेत खा. डॉ. निलेश राणे यांनीही प्रकल्पाला असलेला विरोध मोडून काढण्याचे प्रयत्न सुरू ठेवले असून, रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांचे दौरे त्यांनी वाढवले आहेत. 

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP