Monday, February 28, 2011

अणुऊर्जा प्रकल्पाने दिली मैत्रीला ऊर्जा!

मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागलेले राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासोबतच पतंगराव कदम हे अस्वस्थ झाले. आता चव्हाण यांच्याशी जुळवून घेण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नाही, हे त्यांना कळून चुकले आहे. चव्हाणांनी राणेंशी मैत्री करून पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या या प्रतिस्पध्र्याना काही न बोलता परस्पर त्यांची जागा दाखवून दिली आहे. कोकणात दादाम्हणून ओळखले जाणारे राणे हे सोबतीला असतील तर राष्ट्रवादीतील दादाआटोक्यात राहतील, हेही माहीत असल्यामुळे राणे यांना सोबतीला घेऊन चव्हाणांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत.

राज्याचे राजकारण सध्या  एका नव्याच मैत्रीपर्वाने ढवळून निघाले आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावर उलटसुलट चर्चा होत असताना राज्याच्या राजकारणात एक महत्त्वपूर्ण घडामोडही सहजपणे घडत गेली. मुख्यमंत्रीपदाचा अनुभव गाठीशी असलेले व महसूलमंत्री म्हणून प्रदीर्घ अनुभवामुळे प्रशासनाच्या खाचाखोचा माहीत असलेले  उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यासारखे  ज्येष्ठ नेते आणि देशाच्या राजकारणाचा वारसा लाभलेले व प्रत्यक्ष पंतप्रधान कार्यालयाच्या अनुभवामुळे देश व आंतरराष्ट्रीय प्रशासनाची नाडी अवगत असलेले  पृथ्वीराज चव्हाण हे दोन दिग्गज नेते खूप जवळ आले. विकासाच्या प्रश्नांवर  राजकीय ऐक्य कसे असावे, याचे एक अनुकरणीय उदाहरणच या दोघांच्या एकजुटीने घालून दिले आहे. 

राज्यात मुख्यमंत्रीबदल झाला तेव्हा नारायण राणे यांच्यासह प्रमुख काँग्रेस नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाच निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार त्यांनी राज्याच्या राजकारणात नवखे असलेल्या चव्हाण यांना पाठविले. विधिमंडळाचा एकही दिवसाचा अनुभव नाही,राज्याच्या प्रशासनाचा अनुभव नाही, अशी ज्येष्ठ व्यक्ती मुख्यमंत्रीपदी कशी यशस्वी होईल, असा प्रश्न काँग्रेसमधील काही हितचिंतकांना पडला होता. मात्र राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रत्यक्ष कारभार सुरू केला तेव्हा  चव्हाण यांनी ज्येष्ठ मंत्र्यांशी विशेषत: नारायण राणे यांच्याशी साधलेला संवाद आणि त्यांच्या सल्ल्यावर दाखविलेला विश्वास यामुळे ही अवघड वाट चव्हाण यांच्यासाठी सुकर झाली.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर चव्हाण-राणे यांच्या एकीचे दर्शन झाले. त्यामुळे विधिमंडळात गदारोळ माजवून चर्चा उधळून लावण्याचे विरोधकांचे मनसुबे उधळले गेले. शेतक-यांना द्यावयाची मदत असो लवासाचा वाद असो की जैतापूर प्रकल्पाबाबत झालेली चर्चा. यावर राणे आणि चव्हाण यांची विधिमंडळातच केलेले विचारविनियम, राणे यांच्या पुढाकारामुळे आखलेले डावपेच आणि त्यामुळे नामोहरम झालेले विरोधक हे राजकारणात अनपेक्षित असलेले चित्रही पाहायला मिळाले.  सोनिया गांधी यांनी  घेतलेल्या निर्णयावर पूर्ण श्रद्धा ठेवून त्याची अमलबजावणी करण्यासाठी लागणारी निष्ठा राणे यांच्याकडून शिकावी, असे चित्रच यानिमित्ताने निर्माण झाले आहे.

जैतापूर प्रकल्पाने या दोघांच्या ऐक्याने एक नवे शिखर गाठले आहे, हे मुख्यमंत्र्यांच्या दोन दिवसाच्या कोकण दौ-यातून दिसून आले. जैतापूर प्रकल्पाच्या निर्मिती प्रक्रियेने राज्यात गेल्या पाच वर्षात वेग घेतला. त्याच काळात विद्यमान मुख्यमंत्री हे केंद्रात याच खात्याचा कारभार पाहणाऱ्या विभागाचे मंत्री होते. भारत-अमेरिका करार झाल्याने या प्रकल्पाच्या उभारणीसाठी अणुइंधन आणि तंत्रज्ञान मिळण्याचा मार्ग खुला झाला. हा करार करण्यामागे ऐतिहासिक भूमिका चव्हाण यांनीच बजावली. एवढेच नव्हे तर अणुऊर्जा प्रकल्प उभारताना वा अन्य आण्विक प्रकल्पांच्या ठिकाणी काही दुर्घटना घडल्यास मिळावयाची नुकसानभरपाई ठरविणारे  न्यूक्लिअर लायबिलिटी बिल पारीत करवून घेण्यातही चव्हाण यांचीच भूमिका महत्त्वाची होती. या पार्श्वभूमीवर तेच राज्याचे मुख्यमंत्री झाले असताना आपणच केंद्रात या प्रकल्पाचा मार्ग प्रशस्त केल्यानंतर राज्यातही या प्रकल्पाच्या मार्गातील  अडथळे दूर व्हावेत म्हणून ते किती गंभीर असतील, याची कल्पना करणे शक्य आहे. मात्र दिल्लीत राहून प्रकल्पाची आखणी करणे वेगळे आणि तो प्रत्यक्षात उतरविणे वेगळे, याची कल्पना राज्यात येताच मुख्यमंत्र्यांना  आली.  या प्रकल्पासाठी भूमी संपादनाची प्रक्रिया पाच वर्षाआधी सुरू झाली तेव्हा स्थानिकांमध्ये या प्रकल्पाविरुद्ध नाराजी पसरली. या नाराजीला काही राजकारण्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी खतपाणी घातले. शास्त्रीय कारणांचा मुखवटा पांघरून  गर्भवतींवर विपरित परिणामाच्या, कर्करोगाच्या  अंधश्रद्धा पेरल्या जाऊ लागल्या. सत्य रांगू लागते तेव्हा असत्य जग फिरून आलेले असते,’ असे एक जगप्रसिद्ध वाक्य आहे. असे वातावरण निर्माण होत असताना स्थानिक काँग्रेस पक्ष व सत्तारूढ पक्षातील लोकप्रतिनिधींनी त्याकडे दुर्लक्ष केले. वेळीच हा अपप्रचार खोडून काढला असता तर ही वेळ आली नसती, याची कबुली यासंदर्भात काँग्रेसने नेमलेल्या समितीचे सदस्य हुसेन दलवाई यांनीच दिली हे बरे झाले.  चव्हाण यांनी अनोखे पाऊल उचलून थेट जनतेशी मुंबईत संवाद साधण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र जनतेने त्याकडे पाठच फिरविली. अशा परिस्थितीत हा प्रकल्प मार्गी लावण्याची क्षमता एकाच व्यक्तीत आहे, याची कल्पना असल्याने त्यांनी राणे यांची साथ घेतली. मुख्यमंत्र्यांना भेटायलाही नकार देणारे जैतापूर प्रकल्पग्रस्त राणे यांच्या चार फेब्रुवारीच्या दौ-यानंतर पालटले. कालपर्यंत सरकारची बाजूच ऐकून घेण्यास नकार देणा-या कोकणवासीयांना आपल्या परिसराचा लोकनेता हा प्रकल्प घातक नाही, असे तळमळीने सांगत असल्याने प्रकल्पग्रस्तांनाही आपल्या विरोधाचा फेरविचार करावा, असे वाटू लागले आहे. साखरी नाटे येथील मच्छीमार वगळता इतर गावांतील ग्रामस्थ प्रकल्पाबाबत बरेच अनुकूल झाले आहेत. मुख्यमंत्री जैतापूरच्या दौ-यावर येण्याच्या पूर्वीही राणे यांनी साखरी नाटेतील ग्रामस्थांशी प्रदीर्घ चर्चा केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेस या ग्रामस्थांनी खास हजेरी लावली. त्यांच्या प्रतिनिधीने तर प्रकल्पाविरुद्ध असलेले आक्षेप नोंदविले. राणे यांच्या नेतृत्वाचा हा करिश्मा माहीत झाल्यानेच जैतापूर सभेच्या पूर्वसंध्येला कणकवलीत झालेल्या काँग्रेसच्या जनजागरण मेळाव्यात चव्हाण यांनी राणे यांच्याबद्दल भरभरून व्यक्त केलेले गौरवोद्गार ऐकताना कोकणवासीयांचा ऊर अभिमानाने भरून येत होता.  मुख्यमंत्र्यांनी राणे यांच्याबद्दल केलेल्या प्रत्येक विधानावर टाळ्यांचा कडकडाट  करून ते आनंद व्यक्त करीत होते. ‘‘एखाद्या जिल्ह्याचा विकास कसा करावा, याचा आदर्शच राणे यांनी घालून दिला आहे. सर्वानीच याचे अनुकरण करावे,’’असे  सांगून चव्हाण  यांनी राणे यांच्या नेतृत्वाची उंची कशी मोठी आहे, हे दाखवून दिले.

अतिथी देवो भव, ही कोकणची संस्कृती आहे, असे सांगत राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे अभूतपूर्व स्वागत केले. अबोलीचे फूल प्रेमाचे तर सुरंगी हे निखळ मैत्रीचे प्रतीक मानले जाते. या मैत्रीच्या स्नेहबंधाबरोबरच आपुलकीच्या  गोडव्याचे प्रतीक म्हणून हापूस आंब्याकडे पाहिले जाते. राणे यांनी अबोली, सुरंगी आणि हापूस हारांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले तेव्हा राज्याच्या राजकारणात मैत्रीचे नवे पर्व सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. वर्षभरात मुंबई-ठाणे महापालिकांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. या निवडणुका जिंकणे हे मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेचे आहे. मुंबई-ठाण्यात राहणारा मराठी व विशेषत: कोकणी माणूस यांच्यावर राणे यांच्या नेतृत्वाचा असलेला प्रभाव मुख्यमंत्र्यांना माहीत आहे. शिवसेनेवर निर्णायक प्रहार करण्याची क्षमता केवळ राणे यांच्यातच आहे. त्यामुळे चव्हाण यांना राणेंची साथ लाभली तर काँग्रेसच्या विजयाचा मार्ग मोकळा होण्याची अधिक शक्यता आहे. चव्हाण-राणे यांची ही मैत्री पाहून  मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागलेले राधाकृष्ण विखे-पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासोबतच पतंगराव कदम हे अस्वस्थ झाले. आता चव्हाण यांच्याशी जुळवून घेण्याशिवाय  त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नाही, हे त्यांना कळून चुकले आहे.  चव्हाणांनी राणेंशी मैत्री करून पश्चिम महाराष्ट्रातील या प्रतिस्पध्र्याना काही न बोलता परस्पर त्यांची जागा दाखवून दिली आहे.
कोकणात दादा म्हणून ओळखले जाणारे राणे हे सोबतीला असतील तर राष्ट्रवादीतील दादा आटोक्यात राहतील, हेही माहीत असल्यामुळे राणे यांना सोबतीला घेऊन चव्हाणांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP