Monday, July 15, 2013

'मोदी' गणपतीच्या प्रतिष्ठापनेची घाई!

हिंदू राष्ट्रवादीच्या प्रचाराचा आलेख वर जाण्याऐवजी धप्कन खाली केव्हा घसरला हे मोदींनाही कळणार नाही. हिंदू राष्ट्रवादी हा गुजराती राष्ट्रवादी आणि नंतर ओबीसी राष्ट्रवादी एवढा संकुचित होऊ शकतो. अशा प्रकारची संकुचित प्रवृत्ती असलेली व्यक्ती जर पंतप्रधानपदावर जाण्याचा निर्धार करीत असेल तर धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभावाचे काय होणार?

पुण्याचा गणेशोत्सव जगभर प्रसिद्ध पावला आहे. इथले गल्लीबोळ गणपतीच्या वास्तव्याने पावन झाले आहेत. सर्वसामान्यांच्या जीवनाशी साधम्र्य असलेली नावे धारण करून इथले सगळे गणपती पुणेकरांच्या घराघरांत आणि मनामनांत वास करीत आहेत. माती गणपती, हत्ती गणपती, मोदी गणपती, चिमण्या गणपती, जिलब्या गणपती, असे अनेक गणपती येथे स्थानापन्न झाले आहेत. कालच्या रविवारी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे पुणे शहरात येऊन गेले आणि इथल्या मोदी गणपतीची प्रकर्षाने आठवण झाली. येथील काही पुणेकर मंडळींना आणखी एका मोदी गणपतीची प्रतिष्ठापना, पुण्यात नव्हे तर थेट दिल्लीच्या तख्तावर करण्याची घाई झाली आहे. त्याचा पुढाकार अन्य कोणी व्यक्ती, पक्ष अथवा संघटनेने नव्हे तर चक्क फग्यरुसन महाविद्यालयाने घेतला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्चस्व असलेल्या डेक्कन एज्युकेशन संघटनेचे फग्यरुसन महाविद्यालय यामध्ये अँम्पी थिएटरच्या उद््घाटनासाठी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी मोदींना खास पाचारण करण्यात आले होते. पुण्याचा ऐतिहासिक ठेवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि दिग्गजांची उज्‍जवल परंपरा लाभलेल्या फग्यरुसन महाविद्यालयाने मोदींना निमंत्रित केले आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. पुणे शहर हे आता पूर्वीचे राहिलेले नाही, इथला पेठांचा टक्का कमी झाला असून, शहराचा चेहरा बदलला आहे. प्रत्येक शाळेच्या मैदानात पूर्वी असलेल्या संघाच्या शाखा पाच टक्केही उरलेल्या नाहीत. इथले सदाशिवपेठी ब्राह्मणी वर्चस्व आता कमी कमी होत गेल्याने हे शहर मुंबईसारखे कॉस्मोपॉलिटीन बनले आहे. सदाशिवपेठेतून 'शिव, शिव' ऐकू येण्याऐवजी मटणाचा तांबडा रस्सा, पांढरा रस्सा अशा ऑर्डरी ऐकू येत आहेत. शाकाहारी हॉटेल शोधावे लागत आहे; पण रस्त्याच्या दुतर्फा मांसाहारी हॉटेलांची रेलचेल झाली आहे, यातच काय ते समजून घ्यावे. तेव्हा नरेंद्र मोदींना फग्यरुसनने बोलावले तेदेखील विद्यार्थ्यांसाठी संवाद साधण्यासाठी यावरून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.

'मी हिंदू राष्ट्रवादी' असे वादग्रस्त विधान करून सर्वांच्या टीकेचे लक्ष्य बनलेल्या मोदींना फग्यरुसनने बोलावल्यामुळे तेथील व्यवस्थापनावर प्रखर टीका होऊ लागली आहे. कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या तसेच लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकरांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या या महाविद्यालयामध्ये माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव, व्ही. पी. सिंग, पाकिस्तानचे झुल्फिकार अली भुत्ताे, डॉ. मनमोहन सिंग तसेच रँग्लर परांजपे, राम गणेश गडकरी, काकासाहेब गाडगीळ, प्र. के. अत्रे, एस. एम. जोशी, न. चि. केळकर, श्रीराम लागू, वि. दा. सावरकर, विठ्ठलरामजी शिंदे, बाळासाहेब भारदे, भालचंद्र नेमाडे, स्मिता पाटील अशा असंख्य प्रज्ञावंतांची व्यक्तिमत्त्वे येथे बहरली आणि ज्यांनी आपल्या बुद्धिचातुर्याने देशाच्या जडणघडणीत मोठा वाटा उचलला असे हे महाविद्यालय. ज्या अँम्पी थिएटरचे उद््घाटन मोदींनी केले तेथे महात्मा गांधींचे भाषण झाले होते. अशी पार्श्‍वभूमी लाभलेल्या या महाविद्यालयामध्ये मोदींसारख्या वादग्रस्त व्यक्तिमत्त्वाला बोलावण्यामागचा हेतू निराळाच असावा, असे दिसते.

मोदींनी स्वत:ला हिंदू राष्ट्रवादी संबोधून भारतीय राज्य घटनेचा अपमान केला आहे. कट्टर हिंदुत्ववादी नेत्याला अप्रत्यक्षपणे पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पुढे आणण्याचा डाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रचला असल्यामुळे संघाच्या अधिपत्याखालील संस्थेने मोदींना बहुमान दिला हे उघड आहे. महाविद्यालयाला जर हिंदुत्वाचा एवढा पुळका होता तर त्यांनी खरे हिंदुहृदयसम्राट असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना हा बहुमान का दिला नाही? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या गळय़ातले ताईत बनले आहेत, त्यांना विद्यार्थ्यांशी संवाद साधायला का बोलवले नाहीत? लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, अरुण जेटली, गोपीनाथ मुंडे यांना बोलवावेसे का वाटले नाही. पंतप्रधान अथवा मुख्यमंत्री यांना बोलावले तर समजू शकते; परंतु हिंदुत्वाचा राजकारणासाठी वापर करणार्‍या वादग्रस्त व्यक्तिमत्त्वाला पंतप्रधान पदासाठी संघाने दिलेली मान्यता भाजपाच्या पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट करणारी आहे आणि फग्यरुसनने हिंदुत्वाच्या अजेंड्याचा गौरव केला आहे. वास्तविक पाहता एसपी, फग्यरुसन, कर्वे यांसारख्या अनेक महाविद्यालयांमध्ये कॉँग्रेसचे वर्चस्व होते; परंतु पुण्यामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या तुलनेत कॉँग्रेस पक्षामध्ये कमालीची मरगळ दिसून येत आहे. त्यामुळे महत्त्वाच्या शिक्षण संस्थांकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. अशा अनेक शिक्षणसंस्थांवर संघाने ताबा मिळवला आहे. शिक्षण संस्था आणि बॅँका ही संघाची ताकद असून त्या जोरावर 'मोदी गणपती' बसविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. नरेंद्र मोदींची नुकतीच प्रसिद्ध झालेली मुलाखत विरोधाभासाने भरलेली आहे. हिंदू राष्ट्रवादी आणि धर्मनिरपेक्षता यांची सोयीस्करपणे व्याख्या करून लोकांना संभ्रमात टाकण्याची खेळी मोदींनी केली आहे. हिंदू धर्मात जन्मल्यामुळे आजन्म हिंदू आणि देशभक्त असल्यामुळे राष्ट्रवादी असे भंपक विधान त्यांनी केले आहे. देशाच्या सर्वोच्च स्थानावर जाण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणार्‍या नेत्याने स्वत:ला 'हिंदू राष्ट्रवादी' म्हणवून घेतले तर मुस्लीम राष्ट्रवादी, जैन राष्ट्रवादी, बौद्ध राष्ट्रवादी, शीख राष्ट्रवादी उभे ठाकणार नाहीत कशावरून? मग धर्मनिरपेक्षतेचे आणि सर्वधर्मसमभावाचे काय होणार? आता सध्या तेलंगण राज्यासाठी आंदोलन सुरू आहे. 'तेलुगू राष्ट्रवादी' निर्माण झाले आहेत. विदर्भ, मराठवाड्यात 'मराठी राष्ट्रवादी', कर्नाटकात 'कानडी राष्ट्रवादी', आसामात 'आसामी राष्ट्रवादी', 'बंगालमध्ये 'बंगाली राष्ट्रवादी', उत्तरेत 'यूपी-बिहारी राष्ट्रवादी', गुजरातमध्ये 'गुजराती राष्ट्रवादी', पंजाबमध्ये 'पंजाबी राष्ट्रवादी' अशा राज्य पातळीवरील राष्ट्रवाद्यांनंतर मराठा राष्ट्रवादी, दलित राष्ट्रवादी, आदिवासी राष्ट्रवादी, ओबीसी राष्ट्रवादी, ब्राह्मण राष्ट्रवादी, मातंग राष्ट्रवादी अशा प्रकारे धर्म, जात, प्रांत, भाषा यांवर आधारित राष्ट्रीयत्वाची भावना उफाळून येईल. विविधतेतून एकाता आणि एकात्मता निर्माण करण्याची ताकद भारतीय राज्यघटनेत आहे; परंतु या घटनेलाच सुरुंग लावून संकुचित मानसिकता निर्माण करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. भारतीय राष्ट्रीयत्वाची भूमिका नरेंद्र मोदी घेत नाहीत.

एकीकडे धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्वांना समान न्याय असे ते म्हणतात तसेच धर्मनिरपेक्ष म्हणजे भारताला सर्वोच्च प्राधान्य म्हणतात आणि दुसरीकडे हिंदू राष्ट्रीयत्वाला महत्त्व देतात, हा दुतोंडेपणा असून, त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचे प्रदर्शन आहे, असे म्हणावे लागले. हिंदू राष्ट्रवादीच्या प्रचाराचा आलेख वर जाण्याऐवजी धप्कन खाली केव्हा घसरला हे मोदींनाही कळणार नाही. हिंदू राष्ट्रवादी हा गुजराती राष्ट्रवादी आणि नंतर ओबीसी राष्ट्रवादी एवढा संकुचित होऊ शकतो. अशा प्रकारची संकुचित प्रवृत्ती असलेली व्यक्ती जर पंतप्रधानपदावर जाण्याचा निर्धार करीत असेल तर धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभावाचे काय होणार? देशाचे सार्वभौमत्व, सर्वधर्मसमभाव आणि भारतीय राष्ट्रीयत्वावर घाला घालणार्‍यांना त्यांची जागा दाखवलेली बरी, उगाच गणपती बसविण्याची घाई करण्यात अर्थ नाही.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP