Saturday, July 27, 2013

मोदींचा बहुमताचा दावा फोल!

पुणे / राही भिडे : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी हे आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाला २५0 जागा मिळवून देतील, असा प्रचार सुरू असला तरी भाजपला बहुमत मिळवून देण्याचा मोदींचा दावा फोल असून, बहुमताजवळ त्यांना जाता येईल असे वाटत नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष व देशाचे कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. सध्यातरी त्रिशंकू लोकसभेचे चित्र दिसत असल्याने चमत्काराची शक्यता वाटत असली तरी देशाची ढासळलेली आर्थिक परिस्थिती पाहता स्थिर सरकार असणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.



'दैनिक पुण्यनगरी'शी बातचीत करताना शरद पवार यांनी वरील मत व्यक्त केले. नरेंद्र मोदींना असलेला पक्षांतर्गत विरोध बाजूला सारून भाजपने त्यांची राष्ट्रीय प्रचारप्रमुख या पदावर नियुक्ती केली.


पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींचे नाव चर्चेत आले; परंतु त्यांना त्यांच्याच पक्षातून तीव्र विरोध झाला आणि अजूनही होत आहे. भाजप नेते यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा तसेच गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मोदींच्या कार्यपद्धतीवर टीकाटिप्पणी केलेली आहे. परंतु, सुशील मोदी, रविशंकर प्रसाद, बलबीर कुंज, राजूप्रसाद रुडी, मीनाक्षी लेखी, स्मृती इराणी यांसारख्या प्रवक्त्यांनी मोदींची वारेमाप स्तुती सुरू केली आहे. याउलट मोदींना तीव्र विरोध करण्यास कॉँग्रेसने कंबर कसली असून, मोदींचे कट्टर हिंदुत्व, गुजरातची जातीय दंगल, दहशतवाद तसेच विकासाच्या मुद्दय़ांवर मोदींना धारेवर धरण्याचा निर्धार केला आहे. 

या पार्श्‍वभूमीवर शरद पवार यांनीही मोदींच्या झंझावाती प्रचारावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. भाजपची लोकसभेतील सदस्यसंख्या ११६ आहे. त्यात फार तर २0-२५ जागांची भर पडू शकेल. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये काही जागा वाढू शकतील. उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू, ओरिसा, महाराष्ट्र यासारख्या मोठय़ा राज्यांमध्ये भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता नाही. उत्तर प्रदेशात मुलायमसिंह, मायावती, बिहारमध्ये नितीशकुमार, तामिळनाडूत जयललिता, कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या, आंध्रमध्ये किरणकुमार रेड्डी, ओरिसात नवीन पटनायक यांचा प्रभाव असल्यामुळे मोदींनी कितीही प्रचार केला तरी या राज्यांमध्ये त्यांच्या जागा वाढण्याची शक्यता नाही, असे पवार यांनी संगितले. 

स्थिर सरकार आवश्यक

रुपयाच्या घसरणीमुळे देशाच्या आर्थिक स्थितीवर ताण आला असून, जागतिक पातळीवरदेखील अशीच परिस्थिती दिसत आहे. अशा वेळी केंद्रामध्ये स्थिर सरकार असणे आवश्यक आहे, असे सांगून पवार म्हणाले, कॉँग्रेस व भाजपा या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांना सरकार स्थापन करणे अवघड झाले तर कदाचित अन्य डावे व प्रादेशिक पक्षांचे सरकार येऊ शकेल. अशा प्रकारची सरकारे यापूर्वी अल्पजीवी ठरलेली आहेत. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणायची असेल तर स्थिर सरकारची आवश्यकता आहे. याचा पुनरुच्चार त्यांनी केला. कॉँग्रेसला अधिक मित्रपक्ष जोडण्याची गरज असून, सध्या राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि जम्मू-काश्मीरचे डॉ. फारुख अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स हे दोनच मित्रपक्ष आहेत. 


अन्न सुरक्षा योजना

वाढत्या महागाईबद्दल चिंता व्यक्त करून अन्न सुरक्षा योजनेचा चांगला फायदा होऊ शकतो. मात्र अन्नधान्याचे वितरण चांगले झाले पाहिजे, असे पवारांनी सांगितले. अन्न सुरक्षा योजनेसंबंधी सुरुवातीला आपले काही आक्षेप होते, असे एका प्रश्नावर मान्य करून पवार म्हणाले, अन्न सुरक्षा योजना अमलात आणली तर सरकारवर एक लाख कोटींहून अधिक आर्थिक भार पडेल. गव्हाचा दर प्रतिकिलो १६ रुपये असताना या योजनेअंतर्गत २ रुपये किलोने दिला तर सरकारला किलोमागे १४ रुपये आणि तांदूळ २१ रुपये किलो असताना, ३ रुपये किलोने दिला तर १९ रुपये सरकारला भरावे लागतील. त्यामुळे ही योजना सरसकट राबविण्याऐवजी श्रीमंतांना वगळून दारिद्रय़ रेषेखालील लोकांना प्राधान्य द्यावे, असे आपले मत होते. या योजनेचा यूपीए सरकारला निश्‍चितच फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले. अन्नधान्यामध्ये भारत दुसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे. अन्नधान्याचा अजिबात तुटवडा नाही. आपली निर्यातदेखील वाढली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. अन्नधान्य विपुल प्रमाणात असल्यामुळे ही योजना राबविणे कठीण नाही. मात्र, त्याकरिता शिधावाटप यंत्रणा सक्षम असली पाहिजे. अशी यंत्रणा महाराष्ट्रात आहे; परंतु सर्व राज्यांमध्ये ती तशी असेलच असे नाही, असे त्यांनी सांगितले.


त्रिशंकू लोकसभा आणि चमत्कार..

उत्तर प्रदेशात यावेळी कॉँग्रेसच्या जागा वाढण्याची शक्यता दिसते, असे एका प्रश्नावर सांगून पवार म्हणाले, मात्र सत्ता स्थापनेएवढे बहुमत कॉँग्रेसला मिळेल का? याबाबत शंका आहे. कॉँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांना बहुमत प्राप्त करता आले नाही तर त्रिशंकू लोकसभा येऊ शकते. तसे झाले तर नेमके कोणते सरकार येईल हे सांगता येणार नाही. कॉँग्रेस, भाजपाव्यतिरिक्त प्रादेशिक आणि डाव्या पक्षांचे तिसरेच सरकार येऊ शकेल का ? या प्रश्नावर चमत्कार झाला तर येऊ शकेल, असे मिश्किल उत्तर पवारांनी दिले. 


कॉँग्रेससोबतच आघाडी



आगामी लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेस पक्षासोबत राष्ट्रवादीची आघाडी राहील, असे पवारांनी स्पष्ट केले. केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी आघाडी राहणार असल्याचे सांगून पवार म्हणाले, सरकारमधील सर्वाधिक समित्यांवर आपली नेमणूक झालेली आहे. कॉँग्रेससोबत आपले चांगले संबंध आहेत. कॉँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशीही आपली वेळोवेळी चर्चा होते, असे त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकीमध्ये कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची स्थिती चांगली राहील, असेही ते म्हणाले.

1 comments:

Anonymous,  July 31, 2013 at 3:20 PM  

There is no point in commenting on most popular leader of india by a leader of only 1/4 th part of maharashtra.
NCP MP -
3 are from one family ( Pawar,sule & padmasinh patil )
Bhujabal,sanjiv naik & prafulla patel
(They dont need NCP to get elected but NCP needs them )
Udayanraje (he in NCP is only technicality)
Agatha sangma - not in party.

The party name was 'nationalist' because he was against soniya gandhi & what he is saying now.
I will be with congress.....
Then what is the use of the new party??????
He was good in congress then.

NCPians dont know why do they exist at all??????

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP