Monday, July 8, 2013

सांगलीची तोंडपाटीलकी..

सांगलीच्या राजकारणात वर्चस्व प्रस्थापित करायचे असेल, तर कॉँग्रेसने मदन पाटील आणि प्रतिक पाटील या वसंतदादांच्या वारसदारांना ताकद दिली पाहिजे. कौटुंबिक मतभेद बाजूला सारून त्यांनी चांगले काम सुरू केले आहे. सांगलीत निवडणुकीच्या निमित्ताने जे तोंडपाटीलकीचे दर्शन घडले तशी तोंडपाटीलकी दादांच्या वारसदारांकडून होण्याची शक्यता नाही. आघाडीच्या नेत्यांचा ताल आणि तोल कसा गेला आहे, हे महाराष्ट्राने पाहिले. आता सावरासावरदेखील करमणूक प्रधान असेल, याबाबत शंका नाही.



सांगलीत निवडणुकीच्या निमित्ताने जे तोंडपाटीलकीचे दर्शन घडले तशी तोंडपाटीलकी दादांच्या वारसदारांकडून होण्याची शक्यता नाही. आघाडीच्या नेत्यांचा ताल आणि तोल कसा गेला आहे हे महाराष्ट्राने पाहिले. आता सावरासावर देखील करमणूक प्रधान असेल याबाबत शंका नाही.सांगली महापालिका निवडणुकीने यापुढील काळात राज्याचे राजकारण कोणत्या थराला जाऊन बसणार आहे याचे प्रात्याक्षिक करून दाखविले आहे. राजकारणाचा दर्जा घसरला असल्यामुळे चांगले लोक राजकारणात आले पाहिजेत, अशी हाकाटी अधूनमधून केली जात आहे. परंतु चांगले लोक राजकारणापासून लांब पळून जातील, अशी तजवीज मुरलेल्या राजकारण्यांनी करून ठेवली आहे. त्याचे प्रत्यंतर सांगलीत घडले. सांगलीमध्ये प्रत्येक निवडणुकीत कदम-पाटील यांची तोंडपाटीलकी सर्वश्रुत आहे. त्यात पवारांच्या पॉवरप्लेची भर पडली की, श्रोते आश्‍चर्यचकीत होऊन तोंडात बोटे घातल्याशिवाय राहत नाहीत. देशमुख-पाटील-कदम आणि पवार सगळे आपापल्या गावचे पाटील एकत्र आल्यावर काय होऊ शकते? हे केवळ महाराष्ट्रानेच नव्हे तर संपूर्ण भारत देशाने पाहिले आणि उत्तर प्रदेशचे मुलायम, अखिलेश, मायावती आणि बिहारचे नितीश, लालू यांनी स्वत:च्या राज्यांना पुरोगामी घोषित करून टाकले. कारण महाराष्ट्राचे उरले सुरले पुरोगामित्व यशवंतराव चव्हाणांच्या जन्मशताब्दी वर्षातच संपुष्टात आले आहे.

नाशिकमध्ये किसन कुंभारकर नामक बापाने पोटच्या गरोदर मुलीचा केवळ जातीबाहेर लग्न केले म्हणून गळा दाबून खून केला, तर आंतरजातीय विवाहाला मान्यता न देणारा जात पंचायतीचा आदेश धुडकावून लावला म्हणून अण्णा हिंगमिरेंच्या कुटुंबाला वाळीत टाकण्याचा प्रकार घडला. दलित आणि आदिवासी वर्गावर होणार्‍या अन्याय अत्याचाराने तर परिसीमा गाठली आहे. गावातील धनदांडग्यांकडून होणारे बलात्कार, अत्याचार आणि खून दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. पुरोगामित्वाला काळीमा फासणार्‍या या दुर्घटनांची मंत्रिमंडळाने कधी गंभीर दखल घेतली नाही. सत्ता मिळेपर्यंत फुले-आंबेडकर-शाहू महाराजांच्या पुरोगामी महाराष्ट्राचा जयघोष करायचा आणि सत्ता मिळताच कोटीकोटींची उड्डाणे करण्यावर आणि मोक्याचे भूखंड लाटण्यावर सगळे लक्ष केंद्रित करायचे ही बाब आता लपून राहिलेली नाही. राज्यातल्या जनता दल शेकापपासून दलित पँथरपर्यंत सगळे पुरोगामी पक्ष संपून टाकले आणि आता मोकळय़ा मैदानात धुमाकूळ सुरू झाला आहे.

सतत तीन वेळा सत्ता हाती आल्यामुळे कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये मस्तवालपणा वाढला आहे. महाराष्ट्रात कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी शिवसेना-भाजपा युती हे चार प्रमुख पक्ष असून आघाडी युतीमधील प्रत्येक पक्षाला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी आपल्या मित्रपक्षांची गरज आहे. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपली ताकद आजमवण्यासाठी स्वतंत्र लढायचे आणि विधानसभा, लोकसभा निवडणुकीत आघाडी युती करायची त्याशिवाय गत्यंतर नाही. एकट्याच्या ताकदीवर जगू शकत नाही हे पक्के माहीत असूनही महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन चिखलफेक करीत आहेत.

सांगली महापालिका निवडणुकीत प्रचाराला गॅँगवॉरचे स्वरूप आले. दोन्ही पक्षांच्या बड्यांनी एकमेकांना गुंड संबोधल्यामुळे आघाडीचे सरकार हे दोन गुन्हेगारी टोळय़ांचे सरकार आहे की काय? असा प्रश्न पडावा. कॉँग्रेसचे नेते उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादीवर गुंडगिरीचा आरोप केला, त्याचा समाचार घेताना राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी राणेंनाच 'गुन्हेगार' संबोधून गुन्हेगारांच्या मांडीला मांडी लावून बसण्यापेक्षा मांडी कापून फेकून देईन, असे प्रक्षोभक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. त्यावर 'सनसनाटी'फेम उपमुख्यमंत्री अजित पवार गप्प कसे बसतील. त्यांनी मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीनंतर आर. आर. यांना मांडी कापून फेकून द्यावी लागेल, असा टोला लगावला. एवढय़ावर ते थांबले नाहीत. राणेंचे उद्योग तपासण्याची भाषाही त्यांनी केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राणे, पतंगराव कदम, माणिकराव ठाकरे या सर्वांवर त्यांनी अशी तोफ डागली की, राष्ट्रवादीचे करायचे काय? असा प्रश्न कॉँग्रेसला पडला. राष्ट्रवादीवाल्यांना आपल्याच मस्तीत जगण्याची सवय लागली आहे आणि ढवळय़ा शेजारी कॉँग्रेसचा पवळा बांधला असल्याने कॉँग्रेसला पण त्यांचा गुण लागला आहे. एकमेकांवर दुगाण्या झाडणारे येत्या बुधवारी पुन्हा मंत्रिमंडळ बैठकीत एकत्र येतील आणि आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी संसार टिकविण्याचा आटोकाट प्रयत्न करतील. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी तर ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनाच टार्गेट केले. जयंतराव सोनिया गांधींना भेटत असून कॉँग्रेसच्या वाटेवर असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न ठाकरेंनी केला.

त्यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी माणिकरावांना असे प्रत्युत्तर दिले की, आपल्याला असे बोलण्याची बुद्धी का झाली, असा पश्‍चात्ताप करण्याची वेळ माणिकरावांवर आली असावी. भुजबळांनी आपल्या खास शैलीत माणिकराव मूळचे पवारांचे असून, पवारांना नेहमीच भेटत असतात, असे सांगून टाकले. त्यामुळे माणिकरावांची चांगलीच गोची झाली असून त्यांची राजकीय पार्श्‍वभूमी तपासण्याचे काम दिल्लीत सुरू झाले असल्याचे अनेक नेते खाजगीत बोलत आहेत. खरे पाहता जयंत पाटील हे कॉँग्रेसमध्ये आले तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना हवेच आहे. त्यांचे वडील राजारामबापू पाटील आणि पृथ्वीबाबांचे वडील अनंतराव चव्हाण यांचे संबंध किती घनिष्ट होते हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे कॉँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत आणखी एकाची भर घालून दिल्लीत जाणे बाबांना नक्कीच आवडेल. कदाचित जयंतरावांना मुख्यमंत्रीपदी बसवायला त्यांना आवडेल. दोघेही इंजिनीयर असल्यामुळे अशाप्रकारचे राजकीय इंजिनीयरिंग होऊ शकते. पण जयंत पाटील परत येणे अवघड आहे कारण आर. आर. आबांसोबत जयंतरावांनाही शरद पवारांनी गाजर दाखवून ठेवले आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP