Monday, July 29, 2013

एक तुतारी द्या मज आणूनि..

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आणि वेगवेगळय़ा राजकीय पक्षांत तुतार्‍या वाजू लागल्या. प्रत्येक राजकीय पक्षात तुतारी वाजवण्याची चढाओढ चालू झाली 'एक तुतारी मज आणूनि, फुंकीन जी मी स्वप्राणाने..' या केशवसुतांच्या कवितेच्या पंक्तींची आठवण व्हावी असा प्रकार प्रत्येक पक्षात सुरू झाला आहे. कधी स्वबळावर लढण्याची भाषा तर कधी आघाडी आणि युतीची भाषा कधी तुतारीचे संवादी सूर तर कधी विसंवादी कधी दोन विरोधी राजकीय पक्षांच्या तुतार्‍यांचे विसंवादी दूर तर कधी एकाच पक्षात असूनही विसंवादी सुरांच्या तुतार्‍या. गंमत म्हणजे प्रत्येकाला वाटते बाजी मीच मारणार कुस्तीगिराने शड्ड ठोकताना पूर्ण ताकद पणाला लावावी; पण कधी शड्ड ठोकण्यासाठी उतरले आणि दवाखान्यात दाखल झाले अशी परिस्थिती उद्भवू शकते. मात्र सध्या तरी प्राणपणाने तुतार्‍या फुंकण्यासाठी राजकीय पक्ष सरसावले आहेत.


भारतीय जनता पक्षाने पूर्ण ताकदीनिशी तेल लावून नरेंद्र मोदी नामक पहिलवानाला मैदानात उतरवले आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रचारप्रमुख झालेले मोदी यांनी सर्वप्रथम आरोळी ठोकून कॉँग्रेसला अंगावर घेतले. कॉँग्रेसला कधी एकदा दोन्ही हातांनी उचलून फेकतो असा मोदींचा आविर्भाव मैदानात येताच क्षणी दिसून आला. कॉँग्रेसला फेकून देऊन दिल्लीच्या तख्तावर बसण्यासाठी मोदी उतावीळ झाल्याचे दिसताच त्यांच्या पक्षातून तुतार्‍यांचे विसंवादी सूर घुमू लागले. भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी मोदींचे हिंदुत्व आणि दहशतवाद यासंबंधीच्या भूमिकांना विरोध केला. भ्रष्टाचाराचा मुद्दा यामुळे मागे पडत असून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवले जात आहे, असे मत व्यक्त केले. शत्रुघ्न सिन्हांनी. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या मान्यतेशिवाय कोणी पंतप्रधान होऊ शकणार नाही, असे सांगून मोदींच्या सुसाट सुटलेल्या वारूला लगाम घालण्याचा प्रय▪केला. गोव्याचे भाजपाचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी थेट गुजरात दंगलीवर मतप्रदर्शन केले. गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या मोदींवर तेथील दंगल भडकवल्याचा ठपका असून त्या वेळी अटलबिहारी वाजपेयी यांनीदेखील नाराजी व्यक्त केली होती. मोदींची प्रचारप्रमुखपदी निवड करण्याची जी कार्यकरिणीची बैठक गोव्यात झाली. त्या बैठकीला दिल्लीतील बहुसंख्य नेते गैरहजर राहिले. मोदींवर थेट हल्ला करण्यासाठी कॉँग्रेसवाले तुतार्‍या घेऊन सज्ज झाले असताना पक्षांतर्गत विसंवादी सूर आळवले जात आहेत. मोदी हे हिंदुत्वाबरोबरच विकासाच्या मुद्दय़ांवर कॉँग्रेसला नामोहरम करण्याचा प्रय▪करत असताना कॉँग्रेसने मोदींच्या राज्यात गुजरात कसा मागे पडला आहे, याची आकडेवारी देण्यास सुरुवात केली आहे. 

कॉँग्रेस पक्षातही सारे काही आलबेल आहे असे नाही. महाराष्ट्रात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वपक्ष कॉँग्रेस या दोहोंमधून विसंवादी सूर आळवले जात आहेत. मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्र नेमणूकच मुळी भ्रष्टाचार दूर करण्याच्या मुद्दय़ावर झाली आहे. आदर्श घोटाळय़ामुळे महाराष्ट्र सरकारची देशभरात बदनामी झाली. त्या पार्श्‍वभूमीवर कोणत्याही प्रकारचा आरोप नसलेले, उच्चशिक्षित असलेले, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदी पाठवण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी येथील कामकाजाचा आढावा घेऊन गैरव्यवहाराची कामे अडवून ठेवण्याचा सपाटा लावला. मुख्यमंत्र्यांची प्रतिमा 'मिस्टर क्लीन' अशी होत असताना, पक्षांतर्गत आणि मित्रपक्षातही विरोधक वाढू लागले आहेत. विशेष म्हणजे विरोधी शिवसेना-भाजपा युतीमध्ये मुख्यमंत्र्यांबद्दल आदर वाढू लागला; परंतु विरोधकांची ही आडवळणाची कामे करायची नाहीत, असा मुख्यमंत्र्यांचा निर्धार असल्याने मुख्यमंत्री स्वच्छ प्रतिमेचे पण फायलींच्या ढिगार्‍याआडून दिसत नाहीत, फायलींचे ढीग वाढू लागले, प्रशासन ठप्प झाले आहे, अशी ओरड सगळेच करू लागले; पण मुख्यमंत्र्यांनी विसंवादी तुतार्‍यांवर दुर्लक्ष केले आणि सार्वजनिक हिताच्या कामांवर लक्ष केंद्रित केले.

चांगले काम झाले असेल तर त्याचे सरकारने आणि कॉँग्रेस पक्षाने नगारे वाजवले पाहिजेत; परंतु कॉँग्रेसवाले या कामात मागेच पडलेले दिसतात. उलट नगार्‍यांऐवजी तुतार्‍यांचे विसंवादी सूर सर्व बाजूंनी उमटत असल्याने त्याचाच गलका ऐकू येत आहे. वास्तविक पाहता कॉँग्रेसच्या इतर मुख्यमंत्र्यांपेक्षा पृथ्वीराच चव्हाण यांची लोकप्रियता वाढत असल्याचे सीएनएन-आयबीएनच्या एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामांचा प्रचार त्यांनी केला तर लोकप्रियता आणखी वाढू शकेल; परंतु कॉँग्रेसवाल्यांना ढोल बडवणे जमत नाही. सरकारने जर खरोखर चांगले काम केले असेल तर मुख्यमंत्र्यांसह नारायण राणे, पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील यांच्यासारखे ज्येष्ठ मंत्री महाराष्ट्रभर दौरे काढून प्रचार का करत नाहीत? किमान स्वपक्षात तरी सुसंवाद असावा; पण अद्यापि असे काही दृष्टिपथात येत नाहीत. आपल्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री व माजी मुख्यमंत्री असलेले नारायण राणे यांच्याशी विविध निर्णयांबाबत मुख्यमंत्री संवाद साधत असतात; परंतु सरकारच्या कामाचा प्रचार करण्याबाबत अद्यापि संवाद झालेला दिसत नाही. राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये अजितदादा सर्मथक आणि विरोधक यांच्यात असेच विसंवादी सूर ऐकू येतात. दादा विरोधक असलेले काही ज्येष्ठ नेते आपण मोठय़ा साहेबांच्या जवळ असल्याची शेखी मिरवत असतात. अर्थात मोठय़ा साहेबांचे नाव घेतले म्हणून अजितदादा त्यांना खास वागणूक देतील अशातला भाग नाही. उलट वेळोवेळी अजितदादांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली असते. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक, कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी एकत्र लढेल, असे स्पष्ट केले आहे. कॉँग्रेसचे नेते मुख्यमंत्री चव्हाण यांनीदेखील पवारांना दुजोरा दिला आहे. केंद्रीय पातळवरही आघाडी करण्याचे ठरले असावे; परंतु महाराष्ट्रात काही नेत्यांना जागा वाटपाची घाई झाली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसने कार्याध्यक्षपदी नेमलेले जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यात दहीहंडी फोडण्याची जशी घाई झालेली असते तशी जागा वाटपाचीही झालेली दिसते.

लोकसभा निवडणुकीसाठी कॉँग्रेसला २६ आणि राष्ट्रवादीला २२ असे जागावाटप कायम राहील, असे त्यांनी सांगून टाकले. त्यावर कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी असे काही ठरलेले नाही, असे सांगून जागा वाटप निश्‍चित नसल्याचे स्पष्ट केले. जागा वाटपाच्या चर्चेआधीच विसंवादी सूर उमटू लागले आहेत. भाजपामध्ये नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातील मतभेद जगजाहीर आहेत. या वेळी मुंडे सर्मथक देवेंद्र फडणवीस यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने गडकरी गटाला शह देण्याची रणनीती आखलेली दिसते. राज्यातील सिंचन घोटाळय़ाबाबत गडकरींनी नरमाईची भूमिका घेतली होती; परंतु मुंडे आणि अजितदादा यांचे राजकीय वैर धनंजय मुंडे राष्ट्रवादीत गेल्याने टोकाला गेले असल्याने सिंचन घोटाळा पुन:श्‍च उकरून काढण्यात आले आहे. विधिमंडळात यावर चर्चा करण्याचा आग्रह फडणवीस आणि विनोद तावडे यांनी केला आहे. 

शिवसेनेत गटबाजी चांगलीच वाढली आहे. सुभाष देसाई आणि रामदास कदम यांच्यातील तू-तू मै-मै सर्वपरिचित आहे. कदम हे शिवसेनेला जय महाराष्ट्र करतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. २00९च्या मागील विधानसभा निवडणुकीपासूनच कदम यांची नाराजी वाढली असून राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनादेखील विसंवादात मागे नाही. शिरीष पारकर, प्रवीण दरेकर यांचा एक सूर तर बाळा नांदगावकरांचा वेगळा सूर अलीकडे उमटू लागला आहे. निवडणूक जसजशी जवळ येईल, तसतसे विसंवादी सूर अधिक प्रभावी होऊन 'आयाराम गयारामां'ची चलती सुरू होईल, असे चित्र आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP