Wednesday, March 9, 2016

बुवा तेथे राजकारणी

धर्मसंस्थेने समाजव्यवस्थेवर अतिक्रमण केल्यामुळे या देशातील सामाजिक पर्यावरणावर विपरित परिणाम झाला़धर्माच्या ठेकेदारांनी जातव्यवस्था आणि त्याचबरोबर माणसा­माणसांमध्ये विषमतेची बिजे घट्ट रोवली़ अत्याधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आणि समानतेसाठी अथक प्रयत्न करणाºया पुरोगामी नेत्यांमुळे वातावरण बदलत असताना दुसरीकडे धर्माचा प्रभाव वाढवण्याचेही काम होत राहिले़ इतकेच नव्हे तर या देशाने स्वातंत्र्यानंतर जात, धर्म, पंथ, लिंग, भेदविरहित समानतेवर आधारलेली लोकशाही शासनव्यवस्था स्वीकारली, तरी देखील धर्म आणि जातीचा राजकारणासाठी पुरेपूर वापर करून घेतला जात आहे़ देशातील प्रमुख सत्ताधारी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाचा अजेंडा लपून राहिलेला नाही़ दुसरा प्रमुख राजकीय पक्ष व सर्वाधिक वर्षे सत्तेत राहिलेला काँग्रेस पक्षही वेगळा नाही़ या पक्षानेही मतांच्या राजकारणासाठी जाती­धर्माला महत्त्व दिले आहे़ भारतीय राज्यघटनेची मार्गदर्शक तत्त्वे झुगारून देत धर्म व जातीय राजकारणच प्रभावी ठरत आहे़ अर्थात सत्ता मिळवण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी जाती­धर्माचा वापर केला जात आहे़


राजकारणात टिकून राहण्यासाठी आणि खूर्ची वाचवण्यासाठी धर्मगुरूंचा आशीर्वाद आवश्यक वाटू लागला. त्यामुळे तथाकथित धर्मगुरू आणि भोंदू बाबांनी अध्यात्माच्या नावाखाली बाजार मांडला आणि अशा अनेक भोंदू बाबांनी माया गोळा करण्यास सुरुवात केली़ सत्ताधारी राजकारण्यांचेच भक्कम पाठबळ असल्यामुळे या देशात बुवा­बाबांचे पेव फुटले आहे़ राजकारणातील जीवघेणी स्पर्धा, स्पर्धेमुळे निर्माण झालेली अस्थिरता आणि खुर्ची टिकवण्याची धडपड, यासाठी राजकारण्यांना विशेषत: पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, मोठमोठे राजकीय नेते, महत्त्वाच्या पदांवरील व्यक्ती यांना बुवा­बाबांच्या मानसिक आधाराची गरज वाटू लागली आहे़ केवळ राजकारणीच नव्हे तर बडे नोकरशाह, मोठे भांडवलदार, उद्योगपती तसेच विविध क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्ती बुवा­बाबांचे भक्त बनले आहेत़
विज्ञान­तंत्रज्ञानात नवनवीन संशोधनाची भर घातली जात असताना पुण्यातील एका शिक्षण संस्थेने स्वामी गुरुवानंद नामक बाबाचा सत्कार आयोजित केला होता़ जग विज्ञान युगात गेले तरी बुवा­बाबांना प्राधान्य आहे, असा संदेश जणू या शिक्षण संस्थेने दिला आहे़ या बाबाने तेथे विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना बोलावून त्यांच्या हातावर आशीर्वाद म्हणून सोनसाखळी ठेवण्याचा चमत्कार केला आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी नाहक वादात सापडल्या़ त्यात मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा दोष नसला तरी उच्चपदस्थ व्यक्तीच्या पत्नीने सार्वजनिक जीवनात वावरताना अनेक बाबींची व्यवधाने आणि भान ठेवणे आवश्यक आहे़ मात्र, या साधूबाबाने चांगलेच भान ठेवले असावे. सोनसाखळी प्रकाराने त्या साधूबाबाची देशभर प्रसिद्धी होणार, त्याचा रुबाब वाढणार, आपण यापूर्वीच्या मोठमोठ्या बाबांच्या पंक्तीत जाऊन बसणार, आपला शिष्यगण वाढणार, या कल्पनेने साधूबाबांना आपण पुट्टपर्थीचे सत्य श्री साईबाबाच झालो, अशी स्वप्ने पडली असतील तर नवल नाही़ साधूबाबा भलतेच खूश झाले असतील़ या घटनेमुळे वादळ उठले नसते तर साधूबाबा जास्तच चमत्कार करत सुटले असते़ ‘वर्षा’वरही गेले असते़
वास्तविक पाहता वर्षावर सत्यश्री साईबाबांची पाद्यपूजा झालेली आहे़ शंकरराव चव्हाण, शिवराज पाटील यांच्यासह महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, अशोक चव्हाण तसेच अनेक मंत्री त्यांचे भक्त होते़ याला अपवाद मात्र शरद पवारांचा होता़ पवारांनी श्रद्धेच्या नावाखाली या थोतांडाला कधीच महत्त्व दिले नाही़ भोंदू बाबांसारख्या व्यक्तींना जवळपासही फिरकू दिले नाही़ मात्र, त्यांच्या राष्ट्रवादी पक्षातील अनेक नेते सत्यश्री साईबाबा अथवा अन्य बुवांच्या मागे लागले असल्याचे दिसत आहे़ बड्या­बड्या नेत्यांच्या पाठबळावर अब्जावधींची माया जमवून या बाबांनी सामाजिक कार्य उभे केले; पण हवेतून सोन्याच्या अंगठ्या काढणे, हवेतून विभूती काढणे, सोन्या­चांदीचे इतर दागिने काढून भक्तांना अलौकिक सिद्धी असल्याचे भासवले जात होते. अर्थात विभूती ही सर्वसामान्यांसाठी असे आणि बडे नेते, उद्योगपती यांच्याकरिता अंगठ्या, सोन्या चांदीचे दागिने असत़ या बोगस चमत्कारांबरोबरच लैंगिक शोषण, लैंगिक छळ या प्रकारचे आरोपही त्याच्यावर होते; पण त्याच्या शिष्यगणांनी सर्व आरोपांचा इन्कार केला होता़
इंदिरा गांधी पंतप्रधान असताना धीरेंद्र ब्रह्मचारी नामक साधूचे त्यांना आशीर्वाद असत़ इंदिरा गांधी यांच्यावरील अरिष्ट दूर व्हावे, याकरिता शतचंडी यज्ञ त्याच्या सांगण्यावरून करण्यात आला होता़ पंतप्रधानपद भूषवणारे चंद्रशेखर आणि त्यांच्यानंतर पी़ व्ही़ नरसिंहराव यांनी तांत्रिक असलेल्या चंद्रास्वामीला जवळ केले होते़ पंतप्रधानांच्या निवासस्थानी या तांत्रिक गुरूंचा कायम वावर असायचा़ या चंद्रास्वामीवर सक्त वसुली संचालनालयाने हवाला प्रकरणात १३ गुन्हे दाखल केले होते़ लंडनस्थित एका उद्योगपतीला एक लाख डॉलर्सचा गंडा घातल्याप्रकरणी त्याला अटक झाली होती़ राजकारण्यांची बुवा­बाबांवर जी श्रद्धा होती तिला अंधश्रद्धाच म्हणावे लागेल़ 
डॉ़ मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना एका स्वामीने केंद्रीय मंत्र्याला उत्तर प्रदेशातील एका गावात गुप्तधनाचा प्रचंड साठा असल्याचे सांगितले. मंत्र्याने ही बाब पंतप्रधानांच्या कानावर घातली़ शेवटी पुरातत्व विभागाला तेथे जाऊन खोदकाम करण्यास सांगण्यात आले़ या खोदकामाचे लाईव्ह प्रक्षेपण अनेक चॅनेलवाल्यांनी चार दिवस दाखवले; पण शेवटी हाती काही लागले नाही़ या पुरातत्व विभागाने खोदकाम बंद केले़
आसाराम बापू हे एक राजकारण्यांचे संरक्षण असलेले बडे प्रस्थ होते़ महाराष्ट्रासह सर्व राज्यातील बहुसंख्य राजकारणी त्यांचे भक्त होते व आहेत़ त्यांनी ४२५ आश्रम आणि ५० गुरुकुल उभारले असून त्यांच्यावर बलात्काराचे अनेक गुन्हे आहेत़ एका १६ वर्षांच्या तरुणीवर झालेल्या बलात्काराबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे त्यांच्यावर सर्व बाजूंनी टीका झाली होती़ शेवटी आसाराम व पुत्र नारायणसाई यांना महिला भक्तांचे शोषण केल्याप्रकरणी तुरुंगात जावे लागले़ अनेक आध्यात्मिक गुरूंनी तुरुंगाची हवा खाल्ली आहे़ योगगुरू रामदेव बाबा योगाप्रचाराबद्दल जगभर प्रसिद्ध झाले; पण या बाबांनी भ्रष्टाचारविरोधी उपोषण आंदोलन सुरू केले असता, पोलिसांनी कारवाई केली तेव्हा बाबा सलवार­कमीज आणि दुपट्टा घालून पळण्याच्या प्रयत्नात होते़ त्याचे गमतीदार चित्रण सर्व जगाने पाहिले़ या बाबावर कर चुकवण्याबरोबरच आर्थिक अनियमितता असल्याचा तसेच बळजबरीने शेतकºयांची जमीन बळकावल्याचे आरोप आहेत़ स्वामी नित्यानंद याने एका सिनेनटीवर अतिप्रसंग केल्याचा व्हिडीओ यूट्युबवर लाखो लोकांनी पाहिला होता़
या जगात चमत्कार होत नसतात, असे चमत्कार करणाºयाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एक कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले आहे़ गेली पन्नास वर्षे हे बक्षीस कोणत्याही बुवा­बाबा, माता, अम्मा, फकीर, तांत्रिक, मांत्रिक, सिद्धी करणारे, चमत्काराचा दावा करणाºया कोणत्याही व्यक्तीने पटकावले नाही़ कारण हे जग निसर्ग नियमाच्या आधारावर चालत असते, कारणाशिवाय कोणतीही गोष्ट घडत नसते, कोणताही चमत्कार आपोआप होत नसतो़ अध्यात्माच्या नावाखाली अनेक बेकायदेशीर धंदे चालत असून केवळ अंधश्रद्धेमुळे दैववादी लोक बुवा­बाबांच्या चमत्काराला बळी पडत आहेत़मात्र, राजकारण्यांचा नेमका फायदा काय? मुख्यमंत्रीपद वाचवण्याचा चमत्कार आजवर कोणत्याही बाबाने केलेला नाही़ तरीदेखील बुवा तेथे राजकारणी आहेतच़ अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करणारेच अंधश्रद्धा पसरवण्याचे काम करत आहेत, त्याला काय म्हणावे?

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP