Wednesday, March 9, 2016

शनिपीडेपासून कायमची मुक्ती मिळवा!

शनिदेवाची स्त्रीच्या गर्भावर विपरित परिणाम करण्याची ताकद असल्याने त्याच्या चौथºयावर महिलांनी जाऊ नये, अशी भीती दाखवण्यात आली आहे़ याला प्रखर विरोध करत आम्हालाही शनिदर्शन घ्यायचेच आहे, असा निर्धार करून पुण्याच्या भूमाता ब्रिगेडने शनिशिंगणापूरला धडक मारली़ अर्थात पोलिसी बळाने त्यांना अटकाव केला़ ही गोष्ट निराळी़ मात्र, गर्भावर विपरित परिणाम होतो, हे अमान्य करण्याइतपत महिलांची मानसिक तयारी झाली आहे़ हेही नसे थोडके़ अर्थात शनीची ही अरेरावी झुगारून देण्याऐवजी त्याला नको असताना त्याचे दर्शन घेण्याचा आटापिटा तरी का करावा?

भारतातील धर्मव्यवस्थेने संस्कृती आणि प्रथा परंपरांच्या नावाखाली महिलांना दुय्यम वागणूक दिली असून अंधश्रद्धा आणि कर्मकांडात त्यांना जखडून ठेवले आहे़ अनेक मंदिरांमध्ये त्यांना प्रवेशबंदी करण्यात आली़ रजस्वला स्त्रीने कोणत्याच मंदिरात जाता कामा नये, मासिक पाळीमध्ये स्त्री अपवित्र असते हे त्यांच्या मनावर एवढे ठसवले आहे की, महिला स्वत:च या चार दिवसांत मंदिरात जात नाहीत़ महिलांच्या धर्मभावनांना ठेच लावणाºया आणि त्यांचा अवमान करणाºया या क्रौर्याबाबत कोणी ब्र काढू शकत नाहीत, नव्हे ही बाब महिलांनी देखील बिनबोभाट स्वीकारली आहे़ अत्याधुनिक विज्ञान­तंत्रज्ञानाच्या युगातही महिलांनी अवैज्ञानिक प्रथा, परंपरा जोपासायच्या का? असा प्रश्न उपस्थित झाला असून महिलांमध्ये धीम्या गतीने का होईना जागृती होऊ लागली, ही बाब स्वागतार्ह मानावी लागेल़ प्रजासत्ताक दिनी लोकार्पण करण्यात आलेल्या संविधानाने देशाला स्वातंत्र्य, समता, बंधूता या त्रिसूत्रीचा संदेश दिला़ त्या दिवसाचे औचित्य साधून भूमाता ब्रिगेडच्या रणरागिणी शनी चौथºयावर धडक मारण्यास सज्ज झाल्या़; परंतु देवस्थानाने शनी चौथºयावर महिलांचे आक्रमण होऊ नये, याकरीता याआधीच एक शक्कल लढवली़ देवस्थानच्या पदाधिकाºयांनी विश्वस्त मंडळावर महिला अध्यक्ष नेमून या महिलेकरवी महिलांना चौथºयावर जाण्यास बंदी असल्याची घोषणा पुन्हा एकदा केली़ ती महिला अध्यक्ष, परंपरांच्या जोखडाने आणि पुरुषसत्तेच्या वज्रमुठीखाली दबलेली असल्यामुळे पोपटासारखे बोलली. या विज्ञानयुगात जिथे महिलांनी उत्तुंग भरारी मारली आहे अशा काळात महिलेने जुनाट प्रथा, परंपरांना कवटाळून पुरुष सत्तेपुढे नमते घेत पुरुषसत्ताक व्यवस्था स्वीकारावी, हे आश्चर्य करण्यासारखेच आहे़
शनिशिंगणापूर येथील अध्यक्ष महिलेसह हिंदुत्ववादी संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या महिलादेखील अनिष्ठ प्रथा मान्य असल्याची जाहीर वक्तव्ये करत असल्याने अजूनही हा समाज किती बुरसटलेल्या विचारांचा आहे, हेच स्पष्ट होते़ या रुढी, परंपरांचे जोखड समाजाच्या मानेवर एवढे घट्ट रुतून बसले आहे की, या देशात कितीही सुधारणावादी चळवळी झाल्या तरीदेखील धर्मातील अनिष्ट, रुढी परंपरांचा पगडा कायम राहिला़ अलीकडच्या काळात रुढी, परंपरा अधिक घट्ट होऊ लागल्या आहेत़ 
शनिदेवामुळे महिलांच्या गर्भाशयावर विपरित परिणाम होतो़ म्हणूनच ही बंदी करण्यात आली आहे़, असे समर्थन केले जात आहे़ त्यासाठी धर्मसिंधू ग्रंथात जे शनिमाहात्म्य सांगण्यात आले आहे त्याचा हवाला दिला जात आहे़ हे जर खरे मानले तर ज्या नगर जिल्ह्यात शनिशिंगणापूर आहे त्याच जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावातील तसेच मध्य प्रदेशातील इंदूर येथील शनी मंदिर पुरुषांबरोबर महिलांनाही खुले आहे़ शिंगणापूरचा शनी आणि बेलापूर, इंदूरचा शनी हे वेगवेगळे आहेत का? एक बरे झाले़ द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी शनी हा देव नसून ग्रह आहे तसेच त्याची पूजा करण्याऐवजी त्याला पळवून लावले पाहिजे, असे वक्तव्य केले़ पृथ्वीपासून अनंत प्रकाशवर्षे दूर असलेला शनी ग्रह हा देवरूपात अनेक मंदिरांमध्ये स्थायिक झाला असेल तर त्याला खरोखर पळवून लावणेच योग्य असे जर साक्षात शंकराचार्यांना वाटत असेल तर चुकले कुठे? शंकराचार्यदेखील धर्मशास्त्रानुसारच मत मांडत असतात. ते मान्य करायला हरकत नसावी़ खरे तर शनी हा स्त्री­पुरुष भेदाभेद मानणारा मुळीच नाही़ शनीची साडेसाती केवळ पुरुषांनाच नाही तर स्त्रियांनाही असते़ शनीची पीडा दोघांनाही सारखीच असते़ तेव्हा पीडा देण्यात भेदाभेद न करणाºया शनीचे काय करावे? शंकराचार्य स्वरूपानंदांचा सल्ला मानला तर धर्मवाद्यांचे भलेच होईल़ 
श्री श्री रविशंकर यांनी कालबाह्य परंपरा सोडून आता काळानुसार बदलण्याचे तसेच मुस्लिम, हिंदू, इसाई आदी सर्वच धर्मांनी महिलांना धर्मस्थळांच्या बाबतीत समान अधिकार देण्याचे आवाहन केले आहे़ मुंबईत हाजी अली दर्ग्यात महिलांना एका विशिष्ट ठिकाणी जाण्यास बंदी असून त्याविरुद्ध पुरोगामी मुस्लिम महिलांनी आंदोलन केले आहे़ या ठिकाणी बाबांची मजार आहे़, कबर आहे़ तिथे महिलांनी जाऊ नये असा नियम करण्यात आला आहे़ कालानुरूप सुधारणा होण्याऐवजी धर्मांधता वाढवण्याचे काम होऊ लागले आहे, त्याला रोखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे़ महंत नरेंद्र गिरी महाराज यांच्या आखाडा परिषदेनेही मंदिरात स्त्री­पुरुषांना समान वागणूक द्यावी, अशी भूमिका घेतली आहे़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील महिलांबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून राज्य सरकार स्त्री­पुरुष भेदभाव करू इच्छित नाही, असे स्पष्ट केले आहे़  शनिशिंगणापूरबाबत असलेल्या आख्यायिकांना छेद देणाºया घटना घडू लागल्या आहेत़ या गावात चोरी होत नाही, अशी श्रद्धा आहे़; परंतु प्रत्यक्षात तिथे भरपूर चोºया होत आहेत़ अलीकडे प्रजासत्ताक दिनी वृत्तसंकलनास गेलेल्या पत्रकाराचा मोबाइल चोरीला गेला़
धार्मिक परंपरांमध्ये कमालीचा विरोधाभास दिसून येतो़ मासिक पाळीला अमंगल ठरवून मंदिरातच नव्हे तर घरातही तिचा विटाळ पाळणारे दुसरीकडे स्त्री म्हणजे शक्तीरूप मानून तिच्या सृजनाचा सोहळा साजरा करत असतात़ त्याकरिता गर्भाशयाचं प्रतीक असलेल्या घटाची नवरात्रीत स्थापना करतात़ आणखी एक मोठा विरोधाभास म्हणजे आसाम राज्यात कामाख्या देवीचे मंदिर असून तिथे आषाढात योनीची पूजा होते़ ही शक्तीपूजेची प्रथा आहे़ यामागची आख्यायिका अशी की, सतीने यज्ञात उडी घेतल्यानंतर वेडापिसा झालेला शिव तिचे पार्थिव खांद्यावर घेऊन त्रिभुवनात हिंडू लागला़ तेव्हा तिच्या पार्थिवाचे तुकडे जिथे जिथे गळून पडले ती ठिकाणी शक्तिपीठे मानली गेली़ तिची योनी गळून पडली ते ठिकाण म्हणजे कामाख्या देवीचे मंदिर असून तिथे देवीची मूर्ती नाही, योनीची पूजा होते़ आषाढात ही कामाख्या देवी रजस्वला होते तेव्हा सृजनाचा सोहळा होतो, योनीवर पांढरे वस्त्र लपेटून ठेवतात, चार दिवस मंदिराचा दरवाजा बंद होतो, दरवाजा उघडतो तेव्हा देवीचा रजस्राव आणि रजस्रावाने लाल झालेले वस्त्र, अर्थात ते कुंकवाने लाल केलेले असते़ त्याचा प्रसाद भाविकांना वाटला जातो़ जो हिंदू धर्म रजस्वला स्त्रीला अपवित्र मानून मंदिरात जाऊ देत नाही त्याच धर्मात रजस्वला देवीची नव्हे तिच्या योनीची पूजा होते, याला काय म्हणावे? पुरुषप्रधान व्यवस्था मजबूत करताना महिलांना धर्माच्या कर्मकांडात अडकवायचे आणि महिलांनीही अंधश्रद्धेने ही कर्मकांडे करत राहायचे, शनिदेवाने ज्या स्त्री गर्भाला शापित करून इथली पुरुषसत्ताक व्यवस्था मजबूत केली आणि एकूण हिंदू स्त्रीच्या वाट्याला धर्माच्या आधार दुय्यमत्व आले त्याचा कुठलाही सारासार विचार न करता त्या चौथºयावर चढण्याची मनीषा बाळगणे हा धर्मदेवभोळेपणा आहेच़; पण स्त्रीच्या वागण्याचाही प्रचंड विरोधाभास आहे़ जिथे तिच्या अस्त्वित्वाचाच सन्मान नाही तिथे तिला दुय्यमत्व देणाºया चौथºयाची पायरी चढण्याचा आग्रह कशासाठी? विज्ञानाच्या कसोटीवर या परंपरा सिद्ध होतात की नाही, याचा विचार करण्याऐवजी या परस्परविरोधी अनिष्ट प्रथांचा जाहीर पुरस्कार करायचा, यामुळे त्यांच्या या गोष्टी विज्ञानयुगात हास्यास्पद ठरत आहेत़ निरर्थक, पोकळ, अवैज्ञानिक रुढी­परंपरा झुगारून दिल्याशिवाय स्त्री खºया अर्थाने स्वतंत्र होऊ शकणार नाही़

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP