Wednesday, March 9, 2016

नेतृत्वाच्या पोकळीत गेला रोहितचा बळी

हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील जीवशास्त्राचा संशोधक असलेला अतिशय हुशार आणि संवेदनशील विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येचे तीव्र पडसाद देशभरातच नव्हे तर जगभर उमटू लागले आहेत़ देश­विदेशातील आंबेडकरी विचारांची जनता मोर्चे­निदर्शने करू लागली आहे़ त्यात मुंबई विद्यापीठही मागे नव्हते़ मुंबई विद्यापीठातील सामाजिक बांधिलकी मानणारे अनेक प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी आणि काही सामाजिक संघटना अशा सर्वांनी एकत्र येऊन रोहित आत्महत्येप्रकरणी निदर्शने केली, घोषणा दिल्या़ हैदराबाद विद्यापीठात जे घडले ते येथे घडता कामा नये, असे म्हणत कुलगुरू संजय देशमुख यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले़ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेनुसार चालणारे विद्यापीठ दलित विद्यार्थ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करत असल्याचा हल्ला त्यांनी चढवला़ बुद्धिवादी क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांचे जाणूनबुजून खच्चीकरण केले जात असून ओबीसी समाजाला भाजपाने वळवून घेतले़ आता डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांची ठिकठिकाणी स्मारके उभारून आणि १२५वी जयंती साजरी करून बौद्ध समाजालाही आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरू आहे़ विशेषत: बौद्ध समाज हा संघ विचारसरणीचा विरोधक असल्याने साम, दाम, दंड, भेद यांचा वापर केला जात आहे़


या समाजातील तरुण, बुद्धिमान विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात आहे़ शिक्षणाचे भगवीकरण करताना हुशार दलित विद्यार्थ्यांचा छळ करून त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा घाट घातला जात आहे़ याचा सर्वांनी एकजुटीने विरोध केला पाहिजे, या उद्देशाने मुंबई विद्यापीठात निदर्शने करण्यात आली़
रोहितची केवळ संशोधक एवढीच ओळख नव्हती तर विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या आंबेडकरी विद्यार्थी संघटनेचा तो सक्रिय कार्यकर्ता होता़ भारताचे संविधान, लोकशाही आणि डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, यावर श्रद्धा ठेवून ही विद्यार्थी संघटना कार्यरत आहे़ याच विद्यापीठातील अभाविप (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) या संघाशी संलग्न असलेल्या संघटनेशी वैचारिक मतभेद असल्यामुळे विद्यार्थी संघटनेचे त्यांच्याशी सतत खटके उडत असत़ याकूब मेमनला फाशी दिल्यानंतर विद्यार्थी संघटनेने निदर्शने केल्यावरून अभाविपशी त्यांची जोरदार बाचाबाची झाली़ त्यानंतर अभाविपने भाजपाचे स्थानिक खासदार व केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांच्याकडे तक्रार केली़ या मंत्र्यांनी लगेच मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे रोहित व त्याच्या सहकाºयांविरुद्ध लेखी तक्रार केली़ या विद्यापीठात जातीयवादी, अतिरेकी आणि देशविरोधी कृत्ये होत असल्याचा आरोप पत्रामध्ये करण्यात आला़ स्मृती इराणींनी या पत्राची तत्काळ दखल घेऊन विद्यापीठाच्या कुलगुरूंना कारवाई करण्याबाबत पत्र लिहिले़ मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा ग्रीन सिग्नल मिळण्याची विद्यापीठ जणू वाटच पाहत होते़ त्यांनी रोहित आणि त्याच्या सहकाºयाचा मानसिक छळ सुरू केला़  रोहित खचत चालला होता़ आपल्याला न्याय मिळेल, हा विश्वासच त्याला उरला नव्हता़ त्यातूनच त्याने आत्महत्या केली. विद्यापीठाचे कुलगुरू आप्पा राव यांच्या या कृत्याबद्दल आवाज उठवून त्यांच्याविरोधात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तक्रार नोंदवण्यात आली़ त्यानंतर लगेच स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषद बोलावून आरोपाचे खंडन केले़ मात्र, ते करत असताना हे प्रकरण दलित अथवा गैरदलित या विषयाशी संबंधित नाही़ रोहितच्या आत्महत्येला जातीचा रंग चढवला जात असून रोहित हा दलित नव्हता तर मागासवर्गीय होता आणि बंडारू दत्तात्रय देखील मागासवर्गीय आहेत़ अशा प्रकारची सारवासारव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला़ अर्थात हे करत असताना जातींचे अवडंबरदेखील त्यांनीच माजवले आणि या प्रकरणाला जातीय रंग दिला़ यापूर्वीदेखील स्मृती इराणींनी अशाच प्रकारे जातीयवादी विधाने करून शिक्षणाच्या भगवीकरणाचे समर्थन केले होते़ त्यांचे अनेक निर्णय वादग्रस्त ठरले आहेत़ त्यांच्या हस्तक्षेपामुळे आयआयटी, आयआयएमच्या संचालकांनी राजीनामे दिले आहेत़ त्यामुळे अल्पशिक्षित स्मृती इराणी नामक मंत्र्याने उच्चशिक्षणाबाबत जो घोळ घातला आहे त्यावरून या मंत्र्याचे करायचे काय? असा प्रश्न पडला आहे़
मुळात फाशीविरोधी निदर्शने केल्यामुळे रोहित आणि त्याचे सहकारी देशद्रोही कसे काय ठरू शकतात? याकूबच्या फाशीच्या वेळी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या अनेक आजी माजी न्यायाधीशांनी फाशीच्या शिक्षेविरुद्ध मते नोंदवली आहेत, त्यांना देखील देशद्रोही ठरवायचे का? ते जर देशद्रोही नसतील तर रोहित आणि त्याचे सहकारी देशद्रोही कसे असतील? विद्यापीठ प्रशासन, केंद्रीय मंत्री आणि अभाविपचा दबाव तसेच अमानुष कारवाई यामुळे रोहित आत्महत्येस प्रवृत्त झाला़ या प्रकाराचा निषेध म्हणून आंबेडकर संघटनेच्या विद्यार्थ्यांनी निदर्शने सुरू केली़ आपल्या देशात हिंदू धर्म हा धर्म नव्हेच, येथे जात हेच वास्तव आहे़ जातींमधील उच्च­नीचतेमुळे भेदाभेद असून त्याचे फटके जातीच्या उतरंडीतील खालच्या माणसांना आजही सोसावे लागत आहेत़ या जातीभेदामुळे आलेल्या नैराश्य आणि अवमानातून रोहितने आत्महत्या केली आहे़ मागासवर्गाला मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न होत नसून न्याय मिळण्याची शक्यताच उरली नसल्यामुळे तरुण मुले आत्महत्येस प्रवृत्त होऊ लागली आहेत. देशपातळीवर मागास समाजामध्ये नेतृत्वाचा अभाव असल्याने तरुणांना मार्गदर्शन करेल, त्यांच्यातील ऊर्जेला योग्य दिशा दाखवेल, त्यांच्यावरील अन्यायाचे निवारण करण्याकरिता त्यांना भक्कम पाठबळ देईल, असे नेतृत्व नसल्यामुळे तरुणांचे तारू भरकटत जाऊ शकते़ राखीव जागांवर निवडून येणारे खासदार हे समाजाचे योग्य नेतृत्व करतात का? हादेखील प्रश्नच आहे; अन्यथा खासदार रामदास आठवले यांना विद्यापीठातून विद्यार्थ्यांनी पळवून लावले नसते़ यापूर्वी बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले मार्गदर्शन आणि पाठबळ दिले होते़ कांशीराम हे सामाजिक कार्याची तळमळ असलेले आणि समाजाला योग्य दिशा देण्याची दृष्टी असलेले नेतृत्व होते़ तरुणांच्या बुद्धीला आणि ऊर्जेला दिशा देऊन सक्षम तरुण संघटितपणे उभा राहावा, याकरिता महाविद्यालयात ते स्वत: जात. विद्यार्थ्यांसोबत दोन दोन दिवस वसतिगृहात राहत असत. त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास देत असत़ गेल्या २०­२५ वर्षांत महाराष्ट्रात बसपा उभी राहिली अथवा नाही; पण दलित तरुणांना दिशा देणारे नेतृत्वही उभे राहिले नाही़ नेतृत्वाची पोकळी कोणी भरून काढली नाही़
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मागास जातींमध्ये फूट पाडून त्यांना अलग करण्याचे काम होऊ लागले आहे़ नामांतराची चळवळ, मंडल विरुद्ध कमंडलू आणि बाबरीचे पतन यातून ओबीसी हा वर्ग अनुसूचित जाती, जमातींपासून बाजूला करण्यात आला़ त्याचबरोबर दलित समाजातही फुटी पडल्या; पण नेत्यांनी सामाजिक, राजकीय उस्तरवारी केली नाही़ रोहित जाण्याआधी
२० वर्षे ही उस्तरवारी केली असती तर सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक बदल ज्या गतीने होत गेले ते झाले नसते आणि विद्यार्थ्यांवर अशी आत्महत्येची वेळ आली नसती़ ही आत्महत्या नसून जातीय व्यवस्थेचा बळी असल्याचे घटनाक्रमावरून स्पष्ट होत आहे़ यापूर्वी हैदराबाद विद्यापीठातच गेल्या दहा वर्षांत नऊ दलित विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या़ त्या आत्महत्यांची चौकशी करण्याकरिता नेमलेल्या समित्यांच्या अहवालांना केराच्या टोपल्या दाखवण्यात आल्या़ त्यामुळेच देशभरात रोहितच्या आत्महत्येने आक्रोश उठला असून समविचारी युवा वर्ग संघटित होऊ लागला आहे़ हा तरुण संघटित होऊन संघर्षशील राहण्यासाठी कटिबद्ध होईल आणि आत्महत्येस प्रवृत्त करणाºया व्यवस्थेविरुद्ध बंड करण्यास प्रेरित होईल़ दलित पँथरप्रमाणे पुन्हा एकदा नेतृत्वाची नवनिर्मिती होऊन पोकळी भरून येऊ शकेल, असे आशादायक वातावरण निर्माण होऊ लागले आहे़

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP