Wednesday, March 9, 2016

भ्रष्टाचाराला जातकारणाचा मुलामा कशासाठी?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे भाजपाशी, विशेषकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगलेच सूत जमले आहे़ आजवर कोणी केली नसेल एवढी पवारांची भरभरून स्तुती मोदी करत आहेत़ सरकार चालवताना पवारांचे रोज सकाळी आपण मार्गदर्शन घेत असतो, अशा प्रकारचे राजकारणातले एक अफलातून वाक्य मोदींच्या नावावर फिक्स झाले आहे़ अर्थात मोदींनी अशा आशयाचे वाक्य उच्चारले तो दिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उडालेली झोप परत आणण्यास चांगलाच लाभदायक ठरला़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय वाट्टेल त्या चौकशा करू देत, आपल्याला थेट त्यांच्या हायकमांडचा वशिला मिळू शकतो, या भ्रमात सगळे गाढ झोप घेऊ लागले़; पण तपास यंत्रणांनी आपले काम सुरू ठेवले होते़ कोणतेही नवे सरकार आले की, आधीच्या सरकारची काही लफडी­कुलंगडी असतील त्यांचे पुरावे मिळवण्याचे काम पहिल्यांदा हाती घेत असतात़ पुराव्यांचा अंदाज आला की, विरोधकांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार ठेवली जात असते़ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबतीत असेच घडले असून, त्यांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी सुरू झाली आहे़ भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी भुजबळांना लक्ष्य करून त्यांचे कथित अपराध चव्हाट्यावर मांडले असले तरी ‘आप’ कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून भुजबळांची चौकशी सुरू झाली आहे़ सोमय्यांनी मात्र भुजबळांवरील आरोपांचा जाहीर भडिमार सुरू ठेवल्याने भुजबळांच्या चारित्र्यहननामागे भाजपाच असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे़

महाराष्ट्रात भाजप सरकार येताच काँग्रेस­राष्ट्रवादी नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला. भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांपाठोपाठ काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही चौकशीच्या रडारवर आणण्यात आले. भुजबळांवर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप असून त्यांची मालमत्ता ३६०० कोटींपर्यंत वाढली कशी, हा प्रमुख आरोप आहे़ तसेच ऊर्जा, कोळसा, स्थावर मालमत्ता क्षेत्रात भुजबळ कुटुंबीयांनी केलेली बेकायदे गुंतवणूक, पैशांची अफरातफर अशा अनेक आरोपांबाबत सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) त्यांची चौकशी सुरू असून उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली आणि आदेशानुसार ही चौकशी सुरू आहे़ अलीकडेच भुजबळ कुटुंबीयांच्या मालमत्तांवर छापे घालून भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांना अटक करण्यात आली आहे़ जोपर्यंत चौकशी सुरू होती तोपर्यंत या प्रकरणावर आपण प्रतिक्रिया देणार नाही, अशी शरद पवारांची भूमिका होती़ त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस भुजबळांच्या बाजूने नाही, असा संदेश गेला़ भुजबळांचे पक्षातूनच खच्चीकरण सुरू झाले, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे पक्षाची धुरा सांभाळण्यास समर्थ असल्याने भुजबळांना बाजूला सारण्यात आले, अन्यथा पवारांनी मोदींचा वशिला लावून चौकशी थांबवली असती, ते झाले नसल्यामुळे आपल्या पाठीत खंजीर खूपसला अशी भुजबळांची भावना झाली असावी़  निवडणुकीत भ्रष्टाचाराचा प्रमुख मुद्दा करून निवडून आलेल्या भाजपाने भ्रष्टाचार प्रकरणांच्या तक्रारींची दखल घेऊन चौकशी केली नाही तर भाजपाच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह लागेल, त्यामुळे राष्ट्रवादीला ढील देऊन चालणार नाही; पण समीर भुजबळ यांना अटक झाल्याने राष्ट्रवादीच्याही प्रतिष्ठेचा प्रश्न ऐरणीवर आला असून सरकार सूडबुद्धीचे राजकारण करत असल्याचा आरोप होऊ लागला आहे़ समीर भुजबळांना अटक होताच या प्रकरणी पवारांनी मौन सोडले़ पक्षाची प्रतिष्ठा धोक्यात आली असल्याचे पाहून ‘आतापर्यंतच्या इतिहासात कोणतेही सरकार इतक्या सूडबुद्धीने वागले नसेल’ अशी टीका त्यांनी केली़ एकीकडे मोदींचे गुणगान होत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करण्याचे धोरण पवारांनी अवलंबले आहे, तर तिसरीकडे भुजबळांनी तपासात सहकार्य करावे, असेही त्यांनी सुचविले आहे़ उच्च न्यायालयाने भुजबळ तपासात सहकार्य करत नसतील तर त्यांच्यावर थेट कारवाई करा, असा आदेशच तपास यंत्रणांना दिला आहे़ तरीदेखील भुजबळांवरील कारवाईचे खापर फडणवीस यांच्या माथी फोडले जात आहे, असे समर्थन मुख्यमंत्र्यांच्या गोटातून केले जात आहे़ मुख्यमंत्री या प्रकरणी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष जबाबदार असोत अथवा नसोत; पण भुजबळ प्रकरणाने राज्यातील राजकारण आता मुख्यमंत्र्यांच्या भोवती फिरू लागले आहे हे निश्चित़
या देशात सर्वाधिक भ्रष्टाचारी हे सत्ताधारी असतात हे ढळढळीत सत्य सर्वांनीच मान्य केले आहे़; पण म्हणून त्यांच्यावर कारवाईच करायची नाही किंबहुना कारवाई होत असेल तर तिला संघटितपणे विरोध करायचा हा उद्योग आता सुरू झाला आहे़ संघटितपणे विरोध करायचा तर आपल्या देशात जातकारण हा सर्वोत्तम उपाय आहेच, तो अमलात आणायचा़ भुजबळ यांनीही त्याचाच वापर करायचे ठरवले असून आपण ओबीसी असल्यामुळेच आपल्यावर कारवाई होत असल्याचा आरोप केला आहे़ भुजबळांपाठोपाठ अजित पवार आणि सुनील तटकरे यांचीही चौकशी होणार असून ती थांबवण्यासाठी आणखी एखादा जालीम उपाय मिळावा यासाठी पवार­तटकरे या जोडीने थेट महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे घर गाठले आणि राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले़ त्यांनी खडसेंशी नेमके काय गुफ्तगू केले हे गुलदस्त्यात असले तरी ‘समझनेवालों को इशारा काफी है’ म्हणतात तसे झाले. खडसेंच्या नेतृत्वाखाली सर्व सत्ताधारी बहुजन मंत्री आणि आमदारांना एकत्र करण्याची रणनीती आखली जात आहे़ अनेक आमदार राष्ट्रवादीचेच असून ते निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये गेलेले आहेत़ त्या सर्वांना संघटित करून उच्चवर्णीय असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे़ या रणनीतीला पवारांचाही आशीर्वाद असू शकतो़ मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या खडसेंना मंत्रीपदासाठी इच्छुक असलेले भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचीही साथ असून राजकीय उलथापालथ करण्यासाठी सगळेच इच्छुक बनले आहेत़ उद्या शरद पवारांनी राज्याच्या हितासाठी म्हणजेच बहुजनांच्या हितासाठी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, यासाठी सर्वजण लॉबिंग करायलाही मागेपुढे पाहणार नाहीत एवढा उतावळेपणा या मंडळींच्यात दिसत आहे़ देवेंद्र फडणवीस हे त्यांना यशस्वीपणे टक्कर देतात, की ‘बळी तो कान पिळी’ या उक्तीप्रमाणे ताकदवान नेत्यांच्या व्यूहरचनेचे बळी ठरतात हे पुढील काळात दिसून येईलच़
निवडणुकीत शाहू­फुले­आंबेडकरांचे नाव घेऊन बहुजनांची मते घ्यायची, निवडून यायचे आणि नंतर बहुजनांना बाजूला सारून आपलीच तुंबडी भरायची हा उद्योग महाराष्ट्रात वर्षानुवर्षे सुरू आहे़ बहुजनांतलेच सर्वसामान्य नेते सत्तेत जातात, अब्जावधींची माया गोळा करतात आणि बहुजन मात्र आहे त्याच परिस्थितीत जगतात, हे व्यक्तिकेंद्री राजकारण चांगले ठाऊक झाल्यामुळेच तर बहुजनांची मते या वेळी भाजपाच्या पारड्यात पडली, याचे आत्मपरीक्षण करावे लागेल़ या देशातील मतदार सुज्ञ आहेत. ते तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहत नाहीत़ तेव्हा आपण भ्रष्टाचार केलेलाच नसेल तर जातकारणाचा मुलामा त्याला कशाला लावायचा? कर नाही त्याला डर कशाला? चौकशी होऊन जाऊ द्या आणि निष्कलंक होऊन बाहेर या. बहुजन तुम्हाला आपोआप डोक्यावर घेतील़

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP