Wednesday, March 9, 2016

साहित्य संमेलनात होतोय स्त्रीशक्तीचा जागर

पिंपरी­चिंचवड येथील साहित्य संमेलन हे संपन्नता आणि शाहीपणा, याचा प्रत्यय देणारे असल्याने रसिकांच्या डोळ्याचे पारणे फिटले आहे़ साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ़ पी़ डी़ पाटील यांनी संमेलनाचे आयोजन नेटकेपणाने करून महाराष्ट्राच्या साहित्य समृद्धीचेच जणू दर्शन घडवले़ त्यातच संमेलनाध्यक्ष प्रा़ श्रीपाल सबनीस यांनी संमेलनाआधीच वादविवाद ओढवून घेतल्यामुळे हे संमेलन चांगलेच वाजत­गाजत आहे़ मात्र, सबनीसांनी सर्वसमावेशक धोरण ठेवतानाच स्वत:ची पुरोगामी मते तर मांडलीच; पण ती मांडताना सनातन्यांना चांगल्याच कानपिचक्याही दिल्या़ आजपर्यंत कोणत्याही संमेलनाध्यक्षाने महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची दिशा एवढ्या परखडपणे आणि स्पष्टपणे घेतली नसावी़ त्यामुळे त्यांचे भाषण विद्यमान राजकीय, सामाजिक परिस्थितीत महाराष्ट्रासाठी निश्चितच दिशादर्शक ठरले आहे़ याचा सर्वांनी खरोखर सखोलपणे आणि गांभीर्याने विचार करणे, ही आजची गरज आहे़ महाराष्ट्रातील सर्व घटक, सर्व प्रकारचे वाद आणि आव्हाने यांना स्पर्श करत असतानाच त्यांनी महिलांनाही तेवढेच प्राधान्य दिले आहे़ स्त्रीवादी विचारांच्या भारतीय व पाश्चात्त्य भूमिकांच्या पार्श्वभूमीवर स्त्रीवादी साहित्याचे मूल्यमापन कोणत्या दिशेने व्हायला हवे, हे सांगायलाही ते विसरले नाहीत़

सबनीस म्हणतात, ‘शेकडो लेखिकांनी स्त्रियांच्या साहित्यात मूल्यात्मक योगदान दिले आहे़ स्त्रीमनाच्या व्यथा, वेदना व गुंता अभिव्यक्त करणे संस्कृती शुद्धीकरणासाठी आवश्यकच आहे़ भारतीय जीवन वास्तवात व्यभिचार हा मध्यवर्ती प्रवाह नाही़ तो अपघात व अपवाद म्हणूनच आज घडताना दिसतो़ अर्थात तोसुद्धा घडू नये म्हणून शास्त्रीय व वैज्ञानिक संस्कार व शिक्षण सेक्सच्या संदर्भात आवश्यक आहे का, याबाबतही मुक्त चर्चा अपेक्षित आहे़ जीवन मोहाडीकर व लीना मोहाडीकरांचे लैंगिकतेसंदर्भातील वाङ्मय आज अपुरे पडते़ प्राचीन काळात वात्सायनाची कामसूत्रे निकोप प्रबोधनासाठीच जन्माला आली़ मंदिर संस्कृतीची शिल्पकलासुद्धा स्त्री­पुरुषांच्या संबंधावरच उभी राहिली़ या कलेला अश्लील म्हणता येत नाही़ मानवी जीवनाचे अर्धे अधिक प्रश्न स्त्री­पुरुष संबंधांतील दु:खाचे आहेत़ पुरुषप्रधान संस्कृतीने निर्माण केलेल्या अनेक पातळ्यांवरील स्त्रीची वेदना आज शब्दरूप घेते आहे़’ सबनीसांचे हे स्त्रियांप्रति सहवेदना दर्शवणारे मतप्रदर्शन हा एकप्रकारे त्यांच्यासाठी दिलासाच आहे़ साहित्य संमेलनामध्ये स्त्रियांच्या सद्यस्थितीबाबत चर्चासत्र आयोजित करून त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यात आली हे बरे झाले़ पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांना पारतंत्र्यात लोटल्यामुळे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्री­पुरुष समानतेचा अभाव दिसून येत आहे़ पुरुषी वर्चस्वाखाली दबलेल्या स्त्रियांचा आवाज बुलंद करण्याकरिता साहित्य संमेलनाचे विचारपीठ आवश्यक होतेच़ त्यानूसार ‘प्रसारमाध्यमातील स्त्री प्रतिमा आणि भारतीय संस्कृती’ या विषयांवर झालेल्या परिसंवादामध्ये स्त्रियांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाबाबत ऊहापोह करण्यात आला़ तत्पूर्वी, आदल्या दिवशी महाड येथे भरवण्यात आलेल्या अखिल भारतीय महिला लोककला संमेलनामध्येदेखील भारतीय ‘भारतीय प्रथा परंपरा आणि महिला’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला होता़स्त्रियांच्या कर्तृत्वाची गौरवशाली पार्श्वभूमी असताना तिला मर्यादित करून टाकले, चूल आणि मूल यापलीकडे तिचे जग नाही़ स्वत:ची कोणतीही महत्त्वाकांक्षा नसलेली आणि केवळ घर सांभाळून मुलाची आणि नवºयाची काळजी घेणारी स्त्रीच आदर्श समजली जाते़ स्त्रीशक्ती केवळ मंदिराच्या स्थापत्यकलेत दिसते़ प्रत्यक्षात तिला पारंपरिक भूमिकाच निभवावी लागते़ स्त्रियांना मंदिर प्रवेशबंदी यांसारखे तिरस्करणीय प्रकार आजच्या एकविसाव्या शतकातही या देशात घडत आहेत़ शबरीमला आणि शनिशिंगणापूर यांसारख्या शेकडो मंदिरांमध्ये आजही महिलांना प्रवेश नाही़ या घटना पुरुषी मानसिकतेचा परिपाक आहे़ समाजाची जडणघडण, सामाजिक सांस्कृतिक जीवन यावर परिणाम करण्याची ताकद प्रसारमाध्यमांमध्ये आहे़ त्यामुळेच या माध्यमांमध्ये स्त्रीची प्रतिमा जास्तीत जास्त चांगली आणि वास्तववादी असली पाहिजे़ स्त्री ही एक वस्तू, एक खेळणे असा समज तिच्याबद्दल होईल अशी तिची प्रतिमा नसावी़ प्रत्यक्षात आज परिस्थिती अत्यंत प्रतिकूल बनली आहे़ जागतिकीकरणाच्या रेट्यात वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमे आल्यामुळे सामाजिक बदलाची परिभाषा बदलली, सामाजिक बांधिलकीची जागा ग्लॅमरने घेतली, प्रबोधनाचे जनमत तयार करण्याचे, जागृती करण्याचे साधन असलेली प्रसारमाध्यमे केवळ माहिती देण्यापुरती आणि मनोरंजनापुरती उरली आहेत, असे मत या परिसंवादामध्ये सर्व वक्त्यांनी मांडले ते रास्तच आहे़ जागतिकीकरणामुळे झपाट्याने बदलत जाणारी अर्थव्यवस्था, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात होणारी स्थित्यंतरे तसेच शोषित, पीडित, दुर्बल घटक आणि महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार याचे प्रतिबिंब प्रसारमाध्यमांमध्ये आणि प्रस्थापित साहित्यामध्ये कितपत उमटते यावर शंका आहे़ वृत्तपत्रांसह शेकडो वाहिन्या माध्यम जगतात दाखल झाल्या आहेत; पण एका विशिष्ट वर्तुळात किंवा आखून घेतलेल्या कुंपणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही़ स्त्रीची पारंपरिक चौकट मोडण्याचे धारिष्ट्य होत नाही, स्त्रीचे जे शोषण होते आहे त्याचा विचार प्रस्थापित साहित्य आणि माध्यमेही करत नाहीत, त्यामुळे श्रीपाल सबनीस म्हणतात की, ‘अन्यायातून मुक्त करण्याच्या प्रयत्नात समाजात व साहित्यातही प्रयोग दिसत नाहीत़ स्त्रीवादी साहित्यप्रवाहात या दिशेने काही जाणिवा सिद्ध होताना दिसतात़ अर्थात पुरुष वर्चस्वाच्या मर्यादाही दूर व्हायला हव्यात़ स्त्री­पुरुष संबंध, स्वातंत्र्य व समतेसह न्यायावरच अर्थपूर्ण ठरू शकतात़ या सूत्राला छेद देणारे संकेत व वर्तमान कायदे कालबाह्य ठरत असतील तर नव्या पिढ्यांना या बंदिस्त चौकटीतून मुक्ती मिळावी’ हे त्यांचे वक्तव्य स्त्रियांच्या अवस्थेचे यथार्थ वर्णन करणारेच आहे़
प्रसारमाध्यमांमध्ये विशेष करून मध्यमवर्गीय स्त्री­पुरुषांचे चित्रण केले जात आहे, जागतिकीकरणात ज्यांच्याकडे क्रयशक्ती आहे असाच वर्ग ‘टार्गेट’ करून प्रॉडक्ट दिले जात आहे़ हे चित्रण पाहिले तर मध्यमवर्गीय स्त्रिया स्वप्नरंजनातच बुडालेल्या दिसतात, कुंपण सोडण्याची त्यांची तयारी नाही, असेच दिसते़ अनुभवविश्वाच्या कक्षा परवडत नाहीत की परवडून घ्यायच्या नाहीत? जाणिवा­नेणीवांच्या कक्षा रुंदावत नाहीत केवळ कुंपणच प्यारे आहे, अशा पद्धतीने शेकडो मालिकांमध्ये विषय चर्चिले जात आहेत़ नवश्रीमंत, मध्यमवर्गीय यांच्या समस्या तुलनेने सपक आणि चंगळवादी असून त्यातच प्रसारमाध्यमे घुटमळताना दिसत आहेत़ महिलांचा संघर्ष, त्यांचे धाडस, त्यांची बंडखोरी जी संतदंतांच्या साहित्यात आहे आणि त्यांनी रोवलेल्या बिजांची रोपे फुले, शाहू, आंबेडकरांच्या चळवळीत आणि साहित्यात दिसतात अशा उपेक्षित वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे, ही मानसिकता दिसत नाही़ स्त्री­पुरुष संबंधात सुधारित दृष्टिकोन बाळगला पाहिजे; परंतु जागतिकीकरणामुळे आलेली चंगळवादी भूमिका स्त्रीला पुन:पुन्हा भोग्यवस्तू म्हणूनच पुढे आणते़ सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनावर परिणाम करण्याची ताकद माध्यमांमध्ये आहे़ मात्र स्त्रीचे सत्त्व आणि स्वत्व यांपेक्षा तिच्या देहाला अधिक महत्त्व दिले जात आहे़ त्यात शोषित, पीडित, गरीब स्त्री कुठेच दिसत नाही़
खरे तर प्रसारमाध्यमे मग ते माध्यम कोणतेही असो दूरदर्शन, वृत्तपत्रे, चित्रपट, नाटके असोत संवादाच्या दृष्टीने, मानवी मूल्ये जपण्याच्या दृष्टीने आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ही माध्यमे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात़ प्रसारमाध्यमांचा जनमानसांवर प्रभाव पडत असतो़ वृत्तपत्रे आणि आकाशवाणीपेक्षा दृक्श्राव्य माध्यम हे जास्त प्रभावी आहे़ मग ते दूरदर्शन असो की चित्रपट असो त्यातील प्रतिमा माणसाच्या मनावर कोरल्या जातात़ त्यामुळेच समाज सदृढ करायचा असेल तर सत्य सांगावे लागेल आणि त्यासाठी वास्तव चित्रण करावे लागेल़ सत्य सांगायचे असेल तर ते बहुजनांच्या बाजूचे असेल, वंचितांच्या, उपेक्षितांच्या, अन्याय, अत्याचाराला बळी पडणाºया स्त्रियांच्या बाजूचे असेल, दृक्श्राव्य माध्यम हे जास्त प्रभावी आहे, याचे सर्व माध्यमांना आत्मभान येणे, ही काळाची गरज आहे़

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP