Wednesday, July 21, 2010

शिवसेनेची कोंडी

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तीन पक्षांनी मिळून शिवसेनेची मंगळवारी चांगलीच कोंडी केली. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे काय होणार, याची एक झलक दिसून आली खरी पण मुंबईच्या प्रश्नावर शिवसेना कशी अपयशी ठरली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तीन पक्षांनी मिळून शिवसेनेची मंगळवारी चांगलीच कोंडी केली. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे काय होणार, याची एक झलक दिसून आली खरी पण मुंबईच्या प्रश्नावर शिवसेना कशी अपयशी ठरली आहे. शिवसेनेचा कारभार कसा भोंगळ आणि भ्रष्टाचारी आहे. यासंबंधी नेमके प्रश्न विचारून आमदारांनी शिवसेनेच्या वर्मावर असे बोट ठेवले की शिवसेना आमदारांचा आवाजच बंद करून टाकला. शिवसेनेचे रवींद्र वायकर यांना आपण विधानसभेत आहोत याचे भानच नसते. महापालिकेतल्या नगरसेवकांसारखेच त्यांचे वर्तन असते. परंतु ही विधानसभा असल्यामुळे त्यांचे पितळ उघडे पाडण्याचे काम सत्ताधारी आमदार केल्याशिवाय राहत नाहीत.

मुंबईतील अंधेरी-मरोळ येथे महानगरपालिकेने खासगी-सार्वजनिक भागीदारीतून ‘सेव्हन हिल्स’ हे पंचतारांकित रुग्णालय उभारण्यासंबंधी केलेल्या करारासंदर्भात तसेच महापालिकेने नालेसफाईची मोहीम राबवण्यासाठी 72 कोटी रुपयांची तरतूद करूनही नालेसफाई झाली नसल्यासंबंधीच्या दोन लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडण्यात आल्या होत्या, या लक्षवेधींवर उत्तर देण्याची जबाबदारी नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्यावर होती. काँग्रेसचे अशोक जाधव, अस्लम शेख, राष्ट्रवादीचे नवाब मलिक, मनसेचे बाळा नांदगावकर, मंगेश सांगळे,  राम कदम यांनी शिवसेनेला लक्ष्य करून प्रश्नांची सरबत्ती केली. राज्यमंत्री भास्कर  जाधव हे त्यांचे प्रश्न टोलवण्याचा प्रयत्न  करत होते. त्यांच्यातील पूर्वीचा शिवसैनिक जागा होऊन शिवसेनेला पाठीशी घालण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो आहे, अशी शंका सुरुवातीला आली होती. परंतु शेवटी रवींद्र वायकरांचा त्यांनी आवाज बंद केला आणि शिवसेनेबद्दलच शंकाकुशंका निर्माण होतील असे उत्तर दिले.

वायकरांनी ‘सेव्हन हिल्स’ संबंधी प्रश्न विचारला की, या रुग्णालयाचे बांधकाम 36 महिन्यांत पूर्ण होणार होते. ते का झाले नाही? त्यावर भास्कर जाधव म्हणाले की, ‘मला जास्त बोलायला लावू नका, पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. बांधकामाची मुदत वाढवण्याचा प्रस्ताव सुधार समिती व स्थायी समितीमध्ये आला होता. तेव्हा बांधकामाला तुम्हीच मुदतवाढ दिली.’ ‘कॅन्सर रुग्णालयासाठी राखीव असलेल्या भूखंडाचे आरक्षण तुम्हीच बदलले?’ असा सणसणीत टोला राज्यमंत्र्यांनी लगावला तेव्हा वायकरांचा आवाज आपोआप बंद झाला.

नालेसफाईची मोहीम तर शिवसेनेने हाती घेतली, पण यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. तर मनसेचे नितीन सरदेसाई यांनी मलिक यांना समर्थन देताना पालिका अधिकारी आणि बिल्डर संगनमताने गाळ उपसण्याऐवजी ट्रकमधून डेब्रिस टाकत आहेत, असा आरोप केला. सेव्हन हिल्स रुग्णालयाचा करार आणि महापालिकेची नालेसफाई यावरून शिवसेनेला सर्वानीच धारेवर धरले, तेव्हा राज्यमंत्री जाधव यांनीही त्यांना चांगलेच सुनावले. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष लागले असून शिवसेनेची पालिकेतली मक्तेदारी मोडून काढण्यासाठी रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे जवळ येऊन शिवसेनेची कोंडी करतील, अशी चर्चा विधानभवनात होती.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP