Friday, July 16, 2010

वांजळेंची वारी

मनसेचे खडकवासल्याचे आमदार रमेश वांजळे संत वाङ्मयाचे अभ्यासक आहेत. ते सुवर्ण माळकरी आहेत असे प्रथमदर्शनी दिसते, पण ते मनानेही माळकरी असल्याचा प्रत्यय आला.

संपूर्ण महाराष्ट्र ज्ञानोबा-तुकारामांच्या गजराने वारीमय झाला असताना विधिमंडळानेही मागे का रहावे? विधिमंडळातहीपुंडलिक वरदा, हरि विठ्ठलचा गजर गुरुवारी झाला. वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमे पंढरीच्या वारीचे दर्शन महाराष्ट्रालाच नव्हे तर सा-या देशाला घडवत आहेत. या वारीची झलक विधानसभेतही दिसली. मनसेचे खडकवासल्याचे आमदार रमेश वांजळे संत वाङ्मयाचे अभ्यासक आहेत. ते सुवर्ण माळकरी आहेत असे प्रथमदर्शनी दिसते, पण ते मनानेही माळकरी असल्याचा प्रत्यय आला. शेतकऱ्यांना बि-बियाणे आणि खताचा मुबलक पुरवठा व्हावा यासाठी दिलेल्या प्रस्तावावर वांजळेंनी केलेल्या भाषणाने वारीची अनुभूती दिली आणि पुंडलिक वरदा हरि विठ्ठल.. वांजळे महाराज की जय असा जयघोष सत्ताधारी आणि विरोधी बाजूच्या सदस्यांनीही केला. वांजळेच्या वारीने वातावरण भारावून गेले.

खते आणि बियाणांच्या तुटवड्याचा सर्वाधिक फटका लहान शेतक-यांना बसतो. त्यांना खरा आधार देण्याची गरज आहे,सरकार आपल्या हिताचे निर्णय घेत आहे. दिलासा देत आहे असा विश्वास देण्याची गरज आहे. या संदर्भात रमेश वांजळेंनी तुकोबाचा अभंगवाणीतून आपली कैफियत मांडली.

जे का रंजले गांजले
त्यांसी म्हणे जो आपले
तोचि साधू ओळखावा
देव तेथेचि जाणावा ।।१।।
मृदु सबाहय़ नवनीत
तैसे सज्जनाचे चित्त
ज्यांसी अपंगिता नाही
त्यासी धरी जो हृदयी ।।२।।
दया करणे जे पुत्रासी
तेचि दासानि दासी
तुका म्हणे सांगू किती
तोचि भगवंताची मूर्ती ।।३।।

कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांना शेतक-यांसाठी वांजळेंनी असे काही साकडे घातले की त्यांनी एखाद्या देवदूताप्रमाणे धावत येऊन रंजले गांजलेल्यांच्या सेवेला उभे राहावे. ते म्हणाले, आषाढी कार्तिकीला सरकारी पूजा नको, बळीराजाची सेवा करा.

हेचि थोर भक्ति आवडते देवा
संकल्पावी माया संसाराची
ठेविले अनंते तैसेचि रहावे
चित्ती असू द्यावे समाधान

सरकारच्या निर्णयांमध्ये कसा विरोधाभास आहे याचे मार्मिक वर्णन करताना वांजळेंनी सांगितले, जिथे मासे नाहीत त्या नागपूरला मत्स्यकेंद्र, जिथे पाणी नाही तिथे कृषी विद्यापीठे, जिथे कापूस नाही तिथे सूतगिरण्या असे हे सरकारी निर्णय म्हणजे जिथे सरदारजींची वस्ती तिथे न्हाव्यांची दुकाने काढल्यासारखे आहे.. यावर सभागृहात हास्यकल्लोळ झाला. शेतक-यांचे दु:खच काय स्वत:ला भोगावे लागलेले निलंबन ते कसे विसरतील? आपल्या मनातले शल्य त्यांनी बोलून दाखवलेच..

आलिया भोगासी,
असावे सादर
देवावर भार घालूनिया
मग तो कृपासिंधू
निवारी साकुडे, येरे ते बापुडे काय रंके
भयाचित पोटी, दु:खाचिये राशी
शरण खासी जाता भले
तुका म्हणे नव्हे काय त्याकरिता
चिंता वाहतो आता विश्वंभर..

याचबरोबर वांजळेंची अभंगवाणी संपली आणि वांजळे महाराजांच्या जयघोषाने सभागृह दणाणून गेले!

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP