Friday, December 3, 2010

विरोधकांची हवा गुल

राज्यातील जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढणा-या विरोधकांना सत्ताधा-यांनी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी चांगलाच दणका दिला. हा दणका एवढा मोठा होता की, त्यामुळे उसने अवसान आणून आक्रमकपणा दाखवणा-या फुसक्या जोशातील विरोधकांची हवाच गुल झाली.

राज्यातील जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढणा-या विरोधकांना सत्ताधा-यांनी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी चांगलाच दणका दिला. हा दणका एवढा मोठा होता की, त्यामुळे उसने अवसान आणून आक्रमकपणा दाखवणा-या फुसक्या जोशातील विरोधकांची हवाच गुल झाली.


विधानसभेत गोंधळ घालून सभागृहात बेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी शिवसेनेच्या पाच आमदारांना गुरुवारी निलंबित करण्यात आले. शेतक-यांच्या प्रश्नांवर सरकार चर्चा करण्यास तयार असताना शिवसेनेच्या आमदारांनी ठरवून सभागृहात गोंधळ घालायला सुरुवात केली. आपले प्रश्न मांडण्यासाठी विधानसभा सदस्यांकडे अनेक आयुधे उपलब्ध असताना शिवसेनेच्या आमदारांनी त्याचा वापर न करता आपली गोंधळीपरंपरा सुरू केली. मी जास्त गोंधळ घालतो की तूअशी अहमहिका त्यांच्यात  लागली. त्यात त्यांचा इतका तोल सुटला की, त्यांनी थेट विधानसभा अध्यक्षांचे आसनच गाठले. इतके करून हे आमदार थांबले नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेली भारतीय राज्य घटनाच त्यांनी पायदळी तुडवण्याचा अश्लाघ्य प्रयत्नही त्यांनी केला. शिवसेना वगळता अन्य सदस्यांना हा निंदनीय प्रकार सहन न झाल्याने बुधवारी शिवसेनेच्या संजय राठोड या आमदाराला सभागृहाने निलंबित केले. संपूर्ण घटनेचा अभ्यास करून आणि सभागृहाचे प्रोसिडिंग पाहून आणखी चार आमदारांना गुरुवारी एक वर्षासाठी निलंबत करण्यात आले. सभागृहात घटनेचा अवमान आणि बेशिस्त वर्तन करणाऱ्या आमदारांना धडा शिकवलाच पाहिजे, असा एकमुखी निर्णय बुधवारी सायंकाळी झालेल्या काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी आघाडीच्या आमदारांना आक्रमक व्हा, असा सल्ला दिला होता. तो कृतीत उतरल्याने विरोधकांना चांगलाच दणका बसला आहे.

पाच आमदारांना निलंबनाची शिक्षा झालेल्या शिवसेनेचे अवघे अवसान गळून पडले आहे. दुसरीकजे भाजपमध्येही नैराश्य पसरले आहे. पण त्यांच्या नैराश्याचे कारण वेगळेच आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने विश्वासघात केल्यामुळे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे शिवसेनेच्या आमदारांशी बोलणेही टाळत आहेत. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना-भाजपमध्ये समन्वय तर दिसत नाहीच; उलट त्यांच्यातील मतभेदही स्पष्टपणे दिसत आहेत. विरोधी पक्ष म्हणून सभागृहात येताना जी एकजूट, ‘स्ट्रॅटर्जीलागते ती कुठेही दिसत नसल्याने दोन्ही दिवस विरोधी पक्षात सावळय़ा गोंधळाचे वातावरण दिसत होते.

अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे झालेले नुकसान यावर चर्चा होऊन शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय घेण्याच्या भूमिकेत सरकार असताना विरोधी सदस्यांनी कोणत्याही संसदीय मार्गाचा अवलंब न करता गोंधळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान होत आहे. विरोधक बेजबाबदारपणे चर्चेपासून पळ काढत असल्याने विधान भवन परिसरात त्यांच्या विरोधात तीव्र नाराजीचे सूर ऐकू येत आहेत.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP