Saturday, December 4, 2010

दादांची दादागिरी

अजितदादांची दादागिरी अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित आहे. उपमुख्यमंत्री झाल्यापासून तर या दादागिरीला भलतीच धार चढली आहे. आपण उपमुख्यमंत्री नव्हे; तर मुख्यमंत्रीच आहोत, अशा थाटात त्यांचे काम सुरू असते.

अजितदादांची दादागिरी अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित आहे. उपमुख्यमंत्री झाल्यापासून तर या दादागिरीला भलतीच धार चढली आहे. आपण उपमुख्यमंत्री नव्हे; तर मुख्यमंत्रीच आहोत, अशा थाटात त्यांचे काम सुरू असते. आपण आक्रमक आहोत आणि मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा मवाळ आहेत, याची त्यांना चांगलीच जाणीव आहे. तसे त्यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकारांशी अनौपचारिक बातचीत करताना मान्य केले आणि आपला आक्रमकपणा मुख्यमंत्री समजून घेतील, अशी अपेक्षा व्यक्त करून आघाडीचा संसार चांगला चालेल अशी ग्वाही दिली. पण मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी मित्रपक्षावर अधिक असते याचे भान दादांना राहत नाही. शुक्रवारी सभागृहात त्याचे प्रत्यंतर घडले.


मुख्यमंत्री चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या दालनात विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे व शिवसेना गटनेते सुभाष देसाई यांच्याशी चर्चा करून सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरू करण्यासाठी मन वळविले. तत्पूर्वी सभागृहात आक्रमक विरोधकांना शांत करण्यासाठी मुख्यमंत्री उभे राहिले. त्यांनी सभागृहाचा वेळ वाया जात असून कामकाज बंद पडल्याने शेतक-यांना आपण न्याय देऊ शकत नाही, याबद्दल आपल्याला दु:ख होत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. सरकारची भूमिका त्यांनी सविस्तर मांडली. त्यांचे बोलणे संपताच अजितदादा उठले आणि त्यांनीही मुख्यमंत्र्यांप्रमाणे भूमिका मांडण्यास सुरुवात केली. वास्तविक मुख्यमंत्र्यांचे निवेदन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री किंवा मंत्र्याने त्याच विषयावर बोलणे उचित नाही. सभागृहाच्या परंपरेला शोभा देणारे नाही. पण अजितदादांना त्याचे भान नसते. आपला पक्ष स्वतंत्र, आपण सभागृहातील प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री तेव्हा आपली भूमिका स्वतंत्रपणे मांडलीच पाहिजे, असा दादांचा खाक्या. त्यातून असे भान सुटते.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेतही दादांनी आपला आक्रमकपणा मुख्यमंत्र्यांसमोर दाखविला होता. सभागृहात पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांआधी दादांनीच उठून शेतक-यांना 250 कोटी थकबाकी दिल्याची घोषणा केली होती, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही दादांची दादागिरी गोड मानून घेतलेली दिसते. थकबाकीचा निर्णय घ्या, अशी आपण उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली होती, असे त्यांनी सभागृहात सांगितले. मुख्यमंत्री जर दादांना आदेश देण्याऐवजी अथवा सूचना करण्याऐवजी विनंती करणार असतील तर दादांनी पुढे दामटलेले त्यांचे घोडे चौखूर उधळल्याशिवाय राहणार नाहीत.
गेले दोन दिवस गोंधळ घालून दोन्ही सभागृहांचे कामकाज बंद पाडणारे विरोधक शुक्रवारी बॅकफूटवर गेले. सरकारने त्यांना अखेर नमवले आणि कामकाजात सहभागी होण्यास अखेर भाग पाडले. 


शिवसेनेने भाजपला मागे सारण्याचा आणि आपणच अधिक आक्रमक असल्याचे दाखविण्यासाठी उसने अवसान आणले होते. खरे तर निलंबनाच्या भीतीने गर्भगळीत झालेल्यांची हवा गुल झाली होती. तरीदेखील आपणच शेतक-यांचे कैवारी असल्याचा आव आणला जात होता. शिवसेनेच्या सर्व आमदारांनी गोंधळ घालायचा, नियमबाह्य वर्तन करायचे आणि सर्वाचे निलंबन ओढवून घ्यायचे, असा डाव कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आज्ञेने रचण्यात आला होता. पण निलंबनाचा कालावधी कमी करून सरकारने त्यांचा डाव हाणून पाडला.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP