एक बाबा, दोन दादा!
ब-याच दिवसानंतर विधानसभेत चैतन्य असल्याचे सोमवारी जाणावले. जैतापूर प्रकल्पावर विधानसभेत चर्चा रंगली.
विशेष म्हणजे कणकणवली मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे प्रमोद जठार यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच नारायण राणे यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आणि आमचे सर्वाच्या लाडक्या ‘दादां’वर माझे विशेष प्रेम आहे आणि त्यांचेही माझ्यावर प्रेम आहे, असे सांगत राणे यांचा उल्लेख ‘लाडके, लोकप्रिय, कार्यसम्राट’ असा केला. त्यांनी जैतापूर प्रकल्पाबाबत असलेल्या अनेक तक्रारींचा पाढा वाचला. मनसेचे प्रवीण दरेकर यांनीही दोन दादा आणि एक बाबा यांना एक प्रकारे साकडे घातले. दोन दादा या प्रकल्पाशी संबंधित असले तरी दादागिरीने प्रकल्प आणला, असे होऊ देऊ नका. लोकांचे म्हणणे समजून घ्या. लोकांचे समाधान करा, तोपर्यंत प्रकल्प उभा करू नका, असे ते म्हणाले.

तत्पूर्वी शिवसेना गटनेते सुभाष देसाई यांनीही कोकणातील प्रकल्पाबाबत असलेले आक्षेप नोंदवून हा प्रकल्पच रद्द करण्याची मागणी केली. त्यांचीही मागणी एवढी फिकी पडली की मनसे, भाजप अथवा शेकाप आदी कोणत्याही पक्षाने त्यांच्या मागणीला समर्थन दिले नाही. त्यांनी केवळ स्थानिकांचे प्रश्न सोडवा, मग प्रकल्प आणा, असे सांगून प्रकल्पाला पाठिंबाच दिला.
कोकणचे प्रतिनिधी म्हणून कोकणच्या विकासावर तळमळीने बोलताना विकास प्रकल्पांना विरोध करणा-या शिवसेनेवर नारायण राणे चांगलेच तुटून पडले. तेव्हा त्यांच्या बोलण्याला आक्षेप घेण्यासाठी दोन-तीन शिवसेना आमदार उभे राहिले. पण राणे यांच्यासह काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीच्या आमदारांनी त्यांचा आवाज बंद केला. या चर्चेला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अत्यंत सविस्तर आणि अभ्यासपूर्ण उत्तर दिले. त्यांचे उत्तर सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी मनापासून ऐकले. कोणताही अडथळा आणला नाही. जणू काही त्यांना सर्व मुद्दे पटत होते. परंतु शेवटी शिवसेनेला विरोधासाठी विरोध म्हणून सभात्यागाचे नाटक करावे लागले आणि भाजपला त्यांच्यामागे फरफटत जावे लागले. त्यांच्या सभात्यागाकडे दुर्लक्ष करीत दोन दादा आणि एक बाबा आपापसात चर्चा करत राहिले.
0 comments:
Post a Comment