Wednesday, December 15, 2010

शिवसेना चिडीचूप

आवाज कुणाचा .. कालपर्यंत अशा डरकाळ्या फोडणा-या शिवसेनेचा आवाज पुरता बंद झाल्याचे वारंवार पाहायला मिळत आहे. मंगळवारी तर विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी आणि विधान परिषदेत उपमुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे वाभाडे काढल्यानंतर शिवसेनेचा एकही सैनिक बाह्या सरसावून पुढे सरसावला नाही.

आवाज कुणाचा .. कालपर्यंत अशा डरकाळ्या फोडणा-या शिवसेनेचा आवाज पुरता बंद झाल्याचे वारंवार पाहायला मिळत आहे. मंगळवारी तर विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी आणि विधान परिषदेत उपमुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे वाभाडे काढल्यानंतर शिवसेनेचा एकही सैनिक बाह्या सरसावून पुढे सरसावला नाही. एकेकाळी शिवसेनेत असलेला जोश, अंगार आता पुरता थंड झाला असून दोन्ही सभागृहात त्यांनी सपशेल शरणागतीच पत्करल्याचे मंगळवारी दिसून आले. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी महापालिकेतील शिवसेनेच्या भ्रष्टाचाराचे पुरावे मान्य करूनही कोणतीच चौकशी लावली नसल्याबद्दल सत्ताधारी आमदारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.


मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीच्या भ्रष्टाचाराची लक्तरे सोमवारी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मनसेच्या सदस्यांनी विधानसभेच्या वेशीवर टांगली. मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची मालिका दैनिक ‘प्रहार’मधून पुराव्यानिशी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन काँग्रेस आमदारांनी याबाबतची चर्चा विधानसभेत उपस्थित केली होती. देशाची आर्थिक राजधानी आणि जगातील महत्त्वाचे आर्थिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. गेल्या तीन वर्षात या महानगरपालिकेचा ताळेबंदच सादर झालेला नाही. महापालिकेतर्फे जी कामे करण्यात आली त्यात मोठय़ा प्रमाणात अनियमतता आहे असल्याची बाब काँग्रेसच्या आमदारांनी सभागृहात मांडली होती. या चर्चेला मंगळवारी विधानसभेत उत्तर देताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी  महापालिकेच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. दोन महिन्याच्या आत महापालिकेने आपला चालू वर्षाचा ताळेबंद सादर करावा आणि उर्वरित दोन वर्षाचा ताळेबंद येत्या जुलैपर्यंत सादर करावा, अशा शब्दांत त्यांनी महापालिकेला ठणकावले. मागील तीन वर्षातील कामात मोठ्या प्रमाणात फेरफार करण्यात आले असून ते संशयास्पद आहेत. त्याचा अहवाल आपण मागवला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आरोग्य, शिक्षण, आरक्षित मैदाने यामध्ये मोठय़ा प्रमाणात अनियमितता दिसून येत असून याची संपूर्ण तपासणी करण्यात येत आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर त्यात गैर आढळल्यास कुणाचीही गय करणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजूंच्या सदस्यांना मुख्यमंत्री नेमकी कोणती घोषणा करतात याची उत्सुकता लागून राहिली होती. सीबीआय चौकशीची घोषणा करतात की न्यायालयीन चौकशीची. अखरेपर्यंत उत्सुकता ताणली गेली. काँग्रेस आमदारांना चौकशीची घोषणा होईल, अशी आशा वाटत होती. तर चौकशीच्या धास्तीने शिवसेना-भाजपमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांनी कोणतीही चौकशी घोषित केली नाही. त्यामुळे सत्ताधारी बाकावर अस्वस्थता पसरली. तर शिवसेनेना आमदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका वर्षभरात येणार असल्याने मुख्यमंत्री शिवसेनेच्या कारभाराचा पर्दाफाश करतील, अशी काँग्रेस आमदारांची अपेक्षा फोल ठरली. अमिन पटेल आणि बाबा सिद्दीकी या दोन आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमोरच संताप व्यक्त करीत चौकशीची मागणी केली. पण मुख्यमंत्र्यांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. मात्र या चर्चेमुळे धास्तावलेले विधानसभेतील सदस्य पार गाठून चिडीचूप झाल्याचे दिसले.

विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर शिवसेनेवर जणू आज तोफगोळाच सोडला. जैतापूर प्रकल्पात आडमुठी भूमिका घेणा-या शिवसेनेला त्यांनी चांगलेच सुनावले. हे तोडू, ते फोडू हे आता बस्स झाले. शिवसेनाप्रमुखांवर लोकांचा विश्वास होता म्हणून तुमचे चालत होते. त्यानंतरच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास उरलेला नाही, असे सांगत त्यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य केले. शिवसेना नेतृत्वावर अजितदादा तोफा डागत असताना शिवसेना सदस्यांतून कोणतीही प्रतिक्रिया उमटत नव्हती. सगळे चिडीचूप बसले होते.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP