Saturday, December 11, 2010

..अजब तुझे सहकारी

विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असते तेव्हा सरकार आणि सरकारी अधिका-यांवर जोरदार टीका होण्याचे प्रकार घडतात. परंतु विरोधकांवर टीका झाली तर वातावरण भलतेच तापते. त्यातून आपल्या नेत्यावर आरोप झाले तर सभागृहात रणकंदन माजण्याचीच वेळ येते. यावेळी मात्र अघटीत घडले. साक्षात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर टीका झाली. पण विरोधी बाकावरून कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही.

विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असते तेव्हा सरकार आणि सरकारी अधिका-यांवर जोरदार टीका होण्याचे प्रकार घडतात. परंतु विरोधकांवर टीका झाली तर वातावरण भलतेच तापते. त्यातून आपल्या नेत्यावर आरोप झाले तर सभागृहात रणकंदन माजण्याचीच वेळ येते. यावेळी मात्र अघटीत घडले. साक्षात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर टीका झाली. पण विरोधी बाकावरून कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही. खरे तर आपल्या नेत्यांवर अशा प्रकारचा विधानसभेत आरोप झाल्यानंतर शिवसेनेच्या सदस्यांनी तुटून पडायला पाहिजे होते. आकांडतांडव करायला पाहिजे होते. मात्र उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीमुळे त्यांच्याबद्दलचा आदर आणि धाक कुणालाही उरला नसल्याचे वारंवार पाहायला मिळत आहे.
 
एकेकाळी शिवसेना ही आक्रमक तरुणांची फौज म्हणून ओळखली जायची. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात कुणी ब्र जरी काढला तरी सभागृहाबाहेर शिवसेना कार्यकर्ते आणि सभागृहात शिवसेनेचे आमदार तुटून पडत असत. एकटे छगन भुजबळ शिवसेनेचे आमदार म्हणून विधानसभेत असताना जेवढा धाक होता तेवढा शिवसेनेचा धाक आज ४५ आमदार असूनही सभागृहात उरलेला नाही. 1985 ते 1990 च्या दरम्यान भुजबळ एकटेच सभागृहात होते. तेव्हा त्यांनी एकटय़ाने सभागृह बंद पाडल्याची अनेक उदाहरणे आहेत. पुढे भुजबळ काँग्रेसमध्ये गेल्यानंतरही शिवसेनेची एकनिष्ठ फळी सभागृहात होती. शिवसेनाप्रमुखांविरुद्ध कुणी एक शब्द उच्चारला तरी शिवसेनेचे आमदार चवताळून उठत असत. पक्षनेतृत्वावर असलेली निष्ठा आणि श्रद्धा त्या आमदारांच्या प्रत्येक हालचालीतून व्यक्त होत असे. मात्र शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर शिवसेनेची रयाच गेली आहे. शिवसेनेचा सभागृहातील आणि सभागृहाबाहेरील धाक पूर्ण लोप पावला आहे. एवढेच नव्हे तर शिवसेना आमदारांच्या मनातील पक्षनेतृत्वाबद्दलची निष्ठाही कमी झाली असल्याचे वारंवार पाहायला मिळते.
 
अधिवेशनाच्या पहिल्याच आठवडय़ात शेतक-यांच्या प्रश्नांवरून शिवसेनेच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना पायदळी तुडवली. त्यावरून शिवसेनेच्या पाच आमदारांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर दुस-याच दिवशी उद्धव ठाकरे नागपुरात आले. आपल्या आमदारांच्या निलंबनावरून सभागृहात गोंधळ घाला. सर्व आमदारांना निलंबित व्हावे लागले तरी मागेपुढे पाहू नका, असे आदेश त्यांनी या वेळी पक्षाच्या आमदारांना दिले. बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलतानाही आमचे सर्व आमदार निलंबित झाले तरी बेहत्तर. मात्र आमचा लढा चालूच राहीलअशी कोल्हेकुई त्यांनी केली होती. मात्र त्यांचा हा आदेश शिवसेनेच्या आमदारांनी मानला नाही. गोंधळ घालायचे सोडाच उलट निलंबन झालेल्या आमदारांवरील कारवाई मागे घ्यावी यासाठी त्यांनी सरकारची मनधरणी केली. आपल्या आमदारांचे निलंबन मागे घ्यावे यासाठी शिवसेनेने तडजोड करून उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली.

गुरुवारी तर थेट उद्धव ठाकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. वीज कंपन्यांकडून उद्धव ठाकरे पैसे घेत असल्याची टेप असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार बाबा सिद्दीकी यांनी सभागृहात केला होता. सर्व वृत्तवाहिन्यांवरून संपूर्ण देशात ही बातमी सतत दाखवली जात होती. आपल्या पक्षप्रमुखावर आरोप झाल्यानंतर शिवसेनेचे आक्रमक होणे अपेक्षित होते. मात्र शिवसेनेच्या गोटातून किंचितही प्रतिक्रिया उमटली नाही. एक दिवस आणि रात्र उलटून गेल्यानंतर शुक्रवारी शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई जागे झाले (की त्यांना जागे केले गेले?) गुरुवारी झालेले आरोप कामकाजातून काढून टाकावेत, अशी मागणी त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. ही बाब तपासून पाहावी लागेल, असे अध्यक्षांनी सांगताच शिवसेना आमदारांचे समाधान झाले. हे सर्व दृश्य पाहिल्यानंतर पत्रकार गॅलरीतही कुजबुज सुरू झाली. हाच प्रसंग दहा वर्षापूर्वी झाला असता तर उद्धवा, अजब तुझे सरकार म्हणण्याइतके सभागृहातील वातावरण तापले असते. आता मात्र उद्धवा, अजब तुझे सहकारी म्हणण्याची वेळ आली आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP