Sunday, December 5, 2010

वार, पलटवार आणि हार

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातील शेवटचा दिवस गाजला तो वार, पलटवार आणि हारांनी. अवकाळी पावसावरील चर्चेसाठी दोन दिवस वाया घालवल्यानंतर विरोधकांनी शुक्रवारी चर्चा केली.

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातील शेवटचा दिवस गाजला तो वार, पलटवार आणि हारांनी. अवकाळी पावसावरील चर्चेसाठी दोन दिवस वाया घालवल्यानंतर विरोधकांनी शुक्रवारी चर्चा केली. दोन्ही सभागृहात विरोधकांनी आपापल्या भागात झालेल्या नुकसानीची आकडेवारी सभागृहात देत भरीव मदत करण्याची मागणी सरकारकडे केली. आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील कहाण्या सांगितल्या. परंतु आपल्या मतदारसंघातील परिस्थितीची करुण कहाणी अत्यंत पोटतिडकीने सांगताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी अध्यक्षांसह सभागृहातील सर्वच सदस्यांचे लक्ष वेधून घेतले. आपल्या मतदारसंघासाठी संघर्ष करताना त्यांनी धारण केलेला रुद्रावतार पाहून सभागृह आवाक झाले. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनीही त्यांच्या संतापाचे समर्थन केले. आपल्या मतदारसंघात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची माहिती देताना हर्षवर्धन जाधव यांनी सरकारवर शब्दांचे धुव्वाधार वार केले. हर्षवर्धन यांचा अभ्यास आणि आवेश पाहून सभागृहातील अनेक ज्येष्ठ सदस्यांना त्यांचे वडील व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत रायभान जाधव यांची आठवण झाली.


रायभान जाधव हे काँग्रेसचे आमदार होते, परंतु लोकांच्या समस्या मांडताना ते आपल्याच सरकारवर तूटून पडत असत. शंकरराव चव्हाण यांचे समर्थक म्हणून ते सर्वाना परिचित होते, मात्र चव्हाण मुख्यमंत्री असताना जायकवाडी प्रकल्पासाठी 200 कोटी रुपयांची अंदाजित तरतूद असताना सरकारने फक्त 50 कोटीच जाहीर केले, तेव्हा ते सभागृहात सरकारवर तुटून पडले होते. शंकरराव चव्हाण हे जायकवाडी प्रकल्पाचे जनक होते. त्यांनी आपल्यालाही तेवढीच तळमळ आहे, परंतु राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून तरतूद करावी लागते, असे त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मराठवाड्याच्या अनुशेष भरून काढला जात नाही, याबाबतदेखील त्यांनी आपल्याच सरकारवर अनेदा वार केले. त्याचीच प्रचिती हर्षवर्धन यांच्या रूपाने सभागृहाला आली.

हर्षवर्धन यांच्या या आक्रोशाला राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आक्षेप घेत त्यांना निलंबित करावे, अशी मागणी सभागृहात केली. तेव्हा विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी हर्षवर्धन यांच्या तळमळीचे समर्थन करून त्यांचे मुद्दे महत्त्वाचे आहेत, त्याकडे लक्ष द्या, असे सरकारला सुनावले आणि मी त्यांना माफ करतो, असे सांगत त्यांनी हर्षवर्धन यांची प्रामाणिक भावना समजून घेतली.
हर्षवर्धन जाधव यांनी सरकारवर असे चौफेर वार केले असताना विरोधी पक्षनेते खडसे यांनीही सरकारवर वार करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उत्तरात केवळ आश्वासने असून दम नसल्याची टीका त्यांनी केली. पाच लाख 44 हजार हेक्टरसाठी एक हजार कोटी रुपये मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. याचे गणित केले, तर एक हेक्टर मागे दोन-तीन हजार रुपये एवढीच मदत मिळते. खोदा पहाड निकला चूहा,’ असा वार खडसेंनी मुख्यमंत्र्यांवर केला. परंतु त्याला मुख्यमंत्री चव्हाण यांनी तितक्याच ताकदीचा पलटवार करत खडसेंचे चुकीचे गणित सभागृहासमोर मांडले. मुख्यमंत्री म्हणाले: माझ्या गणिताच्या ज्ञानानुसार एक हजार कोटीला पाच लाखाने भागले तर प्रत्येकी वीस हजार होतात. इतकी मदत यापूर्वी कधीही शेतक-यांना मिळालेली नाही. खडसेंच्या भाषणातील अन्य मुद्दे सरकारला निरुत्तर करणारे होते, पण मुख्यमंत्र्यांच्या गणिताने त्यांना निरुत्तर केले.

दिवस असा वार आणि पलटवाराने रंगला असताना संध्याकाळ मात्र उपाध्यक्षपदाचा हार वसंत पुरके यांच्या गळ्यात पडल्याने प्रसन्न झाली. विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते या सर्वानीच पुरके यांच्या गुणवत्तेचे गोडवे गायले आणि अष्टपैलू गुणवत्ता असलेले उपाध्यक्ष लाभल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP