Wednesday, December 8, 2010

विरोधकांची पंचाईत

हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या आठवड्यात थंडीत गोंधळ घालून राजकीय हवा तापवण्याचा विरोधकांचा मानस होता.

नागपूरमध्ये मस्त थंडी पडली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या आठवड्यात या थंडीत गोंधळ घालून राजकीय हवा तापवण्याचा विरोधकांचा मानस होता. गेल्या आठवड्यातील दोन दिवस अवकाळी पावसावर वाया घालवल्यानंतर दुस-या आठवडय़ात ‘आदर्श’ गृहनिर्माण सोसायटीच्या नावाने चांगभलं करण्याची त्यांची रणनीती होती. विधान परिषदेत त्यांनी ती  यशस्वीही केली. मंगळवारी विधान परिषदेचे कामकाज सुरू होताच ‘आदर्श’वर स्थगन प्रस्ताव देऊन त्यांनी दिवसभराचे कामकाज तहकूब करण्याची मागणी केली. सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची चर्चेची तयारी असल्याचे सांगत कामकाज पत्रिकेत दाखवलेले कामकाज पूर्ण करू द्यावे आणि नंतर चर्चा घ्यावी, असे सांगितले. मात्र कामकाज तहकूब करण्याची मागणी करत विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी अनुक्रमे 33 मिनिटे, 15 मिनिटे, 10 मिनिटे आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.


असाच गोंधळ विधानसभेत घालण्याचा मनसुबा विरोधी पक्षाचा होता. मात्र या आठवडय़ातही विरोधी पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव प्रकर्षाने दिसला. दुस-या आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी विरोधक ‘आदर्श’चा मुद्दा मांडणार याची  कल्पना असल्यामुळे सरकारने नेमकी मंगळवारीच विदर्भातील प्रश्वावरील चर्चा कामकाज पत्रिकेत देऊन ठेवली होती. अपेक्षेप्रमाणे विरोधी सदस्यांनी ‘आदर्श’ प्रकरणी स्थगन प्रस्ताव दिला. तो नाकारल्यानंतर गोंधळ घालून दोन वेळा कामकाजही बंद पडले. तिसऱ्यांदा गोंधळ घालण्याच्या तयारीत असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी असे डावपेच टाकले की विरोधकांना घातला की त्यांना चर्चेतून मागे जात येईना आणि पुढे सरकता येईना.

‘कोणत्याही विषयावर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. ‘आदर्श’बाबतही विरोधी पक्ष म्हणतील त्या वेळी, म्हणतील त्या नियमाप्रमाणे चर्चा करण्यास सरकार तयार आहे. मात्र  कामकाजात दाखवण्यात आलेली विदर्भाच्या अनुशेषावरची चर्चा पूर्ण होऊ द्यावी. हे अधिवेशन विदर्भात होत आहे. अशा वेळी येथील स्थानिक प्रश्नावर चर्चा व्हावी, अशी येथील लोकांची अपेक्षा असते. हे अधिवेशन होत असताना विदर्भावर चर्चा झाली नाही तर लोकांमध्ये चांगला संदेश जात नाही. त्यामुळे विदर्भावरील चर्चा होऊ द्यावी आणि उद्या तुम्ही सांगाल त्या नियमाप्रमाणे, सांगाल तेवढा वेळ आपण चर्चा करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या या निवेदनाने विरोधकांची पार बोलतीच बंद झाली. विदर्भावरील चर्चेला विरोध करावा, तर विदर्भवासीयांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. मुख्य म्हणजे विदर्भाचे कैवारी म्हणून आगपाखड करण्याची संधी  मिळणार नाही. त्यामुळे आदर्श प्रकरणी गोंधळ घालण्यासाठी तयारी करून आलेल्या विरोधकांच्या तोफांतील वातच सरकारने काढून घेतल्याने त्यांचा बार दुस-या आठवडय़ातील पहिल्याच दिवशी फुसका ठरला.

‘आदर्श’वर सभागृहात चर्चा होणार, अशी अपेक्षा असल्यामुळेच की काय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सभागृहात आले होते. त्यांचे समर्थक आमदारही त्यांच्यासोबत होते. अशोक चव्हाण यांनी नुकताच नांदेड येथे एका कार्यक्रमात बोलताना माझे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी माझ्याच पक्षातील लोकांनी सुपारी दिली होती, असा सनसनाटी आरोप  केला होता. त्यानंतर आज ते सभागृहात आले तेव्हा सर्वाचेच लक्ष त्यांच्याकडे लागले होते. बुधवारी विधानसभेत ‘आदर्श’वर चर्चा होणार आहे. त्यावेळी अशोक चव्हाण काय बोलतात याकडेच सर्वाचे लक्ष लागले आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP