Thursday, December 2, 2010

पळपुट्यांची सेना

मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार घालणारे शिवसेना-भाजप युतीचे सैनिक तलवारी परजून सभागृहात येतील आणि सरकारवर सपासप वार करून लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडतील, असे वाटले होते. प्रत्यक्षात विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील युतीची सेना भलतीच पळपुटी असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

नागपुरात अद्याप थंडी सुरू झालेली नाही. दुपारी तर वातावरण ब-यापैकी तापलेले होते. तसे विधिमंडळाचे वातानुकूलित सभागृह तापवण्याचा प्रयत्न विरोधकांनी बुधवारी पहिल्या दिवशी केला खरा, पण तो सपशेल फसला. मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार घालणारे शिवसेना-भाजप युतीचे सैनिक तलवारी परजून सभागृहात येतील आणि सरकारवर सपासप वार करून लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडतील, असे वाटले होते. प्रत्यक्षात विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील युतीची सेना भलतीच पळपुटी असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
जनतेच्या जिव्हाळय़ाच्या प्रश्नांवर सभागृहात चर्चा करण्याची तयारी सभागृहाचे नेते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दाखवली असताना आम्हाला चर्चा नको निर्णय द्या,’ असा अजब युक्तिवाद करून विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. राजदंड पळविण्याचा प्रसिद्धी स्टंट केला, सदस्यांचे निलंबन ओढवून घेण्याची वेळ आणली. राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी विरोधकांच्या या पळपुटेपणाचे अत्यंत समर्पक शब्दांत वर्णन केले. राणे म्हणाले की, ‘‘अवकाळी पावसाच्या संकटाने त्रस्त झालेल्या जनतेविषयी विरोधकांना कसलीही सहानुभूती नाही. त्यांच्या प्रश्नांची चर्चा नको आहे, परीक्षा देण्याआधीच त्यांना उत्तीर्ण व्हायचे आहे.’’

नवी दिल्लीत टेलिकॉम घोटाळा प्रकरणी विरोधकांनी संयुक्त संसदीय समितीच्या मागणीवरून लोकसभा बंद पाडली. तशी राज्यातील विरोधकांनी विधानसभा बंद पाडली. विरोधकांना नेमके काय करायचे आहे, हेच त्यांना समजत नव्हते, सगळाच सावळागोंधळ. राजकारणात साधायचे काय, राजकीय भूमिका मांडायची कशी, युतीची एकजूट ठेवायची कशी, कसलेच डावपेच आखलेले नाहीत, असा मजेशीर प्रकार पाहायला मिळाला. एरवीही ऊठसूठ मराठीचा उद्घोष करणारे शिवसेनानेते दिवाकर रावते यांना विधान परिषदेत मराठी प्रेम उचंबळून आले. मुख्यमंत्र्यांनी नव्या मंत्र्यांचा परिचय करून देताना राज्यमंत्री डी. पी. सावंतअसे म्हणताच रावते उठले आणि इंग्रजीत डी. पी. कशाला दिगंबर.. म्हटले असते तर? असा प्रश्न केला. याच रावतेंना त्यांनी परिधान केलेल्या जॅकेटवर सरकारच्या निषेधाच्या घोषणा शुद्ध मराठीत नाहीत याचे मात्र भान नव्हते. इडा, पिडा, टळोऐवजी इळा, पिळा, टळोअसे अशुद्ध मराठी सर्वाचे लक्ष वेधून घेत होते.

अधिवेशनाचे निमित्त साधून विदर्भ संघर्ष समितीने स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी बंदचे आवाहन केले होते. या ‘बंद’ला संमिश्र पाठिंबा मिळाला. पण स्वतंत्र विदर्भाचे पाठीराखे असलेले भाजपवाले या प्रश्नावर मूग गिळून बसले होते. मूळ प्रश्नाला बगल देऊन निव्वळ राजकारण करणाऱ्यांचे पितळ त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उघडे पडले.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP