Monday, March 7, 2011

पुणेरी मिसळीची राजकारणात सरमिसळ


काँग्रेस पक्षाने नेहमीच नैसर्गिक शेजार आणि नैसर्गिक घरोबा करण्यावर भर दिला आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र बिनदिक्कत कुणाचाही हात धरून पुढे चालण्यास मागे-पुढे पाहिलेले नाही. राष्ट्रवादीवाले कुणाचाही हात धरून पुढे चालतात. किंबहुना ज्यांचा हात धरतात, त्यांना पळवून तरी नेतात किंवा वाटेत सोडूनही देतात. अजितदादांनी अलीकडेच राष्ट्रवादीला शिवसेनेच्या किरण पावसकरांसह अनेकांचा हात धरायला लावला आणि रामदास आठवलेंसारखे वर्षानुवर्षे घरोबा करून राहिलेल्यांना अर्ध्या वाटेवर सोडून दिले.


मिसळ झाली मुंबई हो दादा मिसळ झाली मुंबई’ शाहीर आत्माराम पाटील यांनी मुंबईत सर्व दिशांनी येणा-या माणसांवरून हा पोवाडा रचला. मुंबईत अठरापगड जाती-जमाती व अनेकविध धर्मपंथांचे लोक एकत्र आले, पुणे मात्र चटकदार मिसळीसाठी अजूनही सर्वपरिचित आहे. त्यात आता राजकारणाची पुणेरी मिसळ चर्चेचा विषय बनली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी पुणेरी मिसळीचा निराळाच पॅटर्न अस्तित्वात आणला आहे. दादांची दादागिरी कशा पद्धतीने चालते,याचा हा उत्तम नमुना आहे. या पुणेरी मिसळीचा झटका आणि वर लाल तडका  मारल्यामुळे कोणाकोणाच्या डोक्यात झिणझिण्या आल्या आणि कोणाच्या डोळय़ांत पाणी आले, याची चविष्ट चर्चा होऊ लागली आहे. हा झटका आणि तडका बसल्यामुळे राजकीय नेत्यांमध्ये चिंतन, आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण होईल, असे कोणाला वाटले असेल तर ते चुकीचे ठरेल. कारण चिंतन हा शब्द सकारात्मक आहे आणि पुणेरी मिसळ नकारात्मक आहे. पक्षाच्या तत्त्वप्रणालीला नकार देऊन पुणेरी मिसळ अस्तित्वात आलेली असल्यामुळे चिंतन करण्याच्या भानगडीत कुणीही पडणार नाही.

‘सत्ता तुराणां न भयं, न लज्जा’ असे चित्र पुणे स्थायी समितीच्या निवडणुकीत दिसून आले.?राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या अभद्र युतीतून भाजपचा स्थायी समिती अध्यक्ष झाला आहे. सत्ता काँग्रेस, राष्ट्रवादीच्या हाती आणि स्थायी समिती अध्यक्ष भाजपचा. असे उलटे वारे पुण्यात वाहू लागले आहेत. वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेशी जवळीक असल्याचे सर्वश्रृत आहे. पुणे महानगरपालिकेत यापूर्वी राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हा पॅटर्न अस्तित्वात आला होता. ही मैत्री गृहीत धरण्यात आली होती. याचे कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांची मैत्री. शरदबाबूंच्या तब्येतीची चौकशी बाळासाहेब करत असतात, तर बाळासाहेबांच्या तब्येतीची चौकशी शरदबाबू करत असतात. शरदबाबू चौकशीसाठी काही वेळा मातोश्रीवर जायलादेखील मागे-पुढे पाहात नाहीत. त्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत नवी दिल्लीत कायम पवारांच्या निवासस्थानी बसलेले असतात, असे हे साटेलोटे राजकारणात सर्वाना माहीत आहेत. पण तरीदेखील शिवसेनेची पिछेहाट थांबत नाही. बाळासाहेबांचे आणि शरदबाबूंचे   सख्य असल्यामुळे शिवसेना-भाजप युतीचा विस्तार कसा होईल? हा प्रश्न भाजपला नेहमीच पडलेला असतो. त्यातच अजितदादांना काकांच्या मैत्रीची फिकीर नसते. काकांच्या मैत्रीलाही झटका देण्याचा मोह त्यांना आवरता येत  नाही म्हणून शिवसेनेच्या किरण पावसकरांना ते राष्ट्रवादीत उचलून आणतात आणि काँग्रेसला सोबत घेऊन विधान परिषदेवर पुनश्च: निवडून आणतात. शिवसेनेला अशी गळती  लागल्याचे दिसताच, भाजपमध्ये अस्वस्थता वाढू लागते. शिवसेना-भाजप युतीचा विस्तार करायचा असेल तर मित्र वाढवावे लागतील, हे राजकीय शहाणपण भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी दाखविले नाही तरच नवल. त्यामुळे युतीचा विस्तार करण्यासाठी मनसेचा अंतर्भाव करावा लागेल, असे पिल्लू मुंडेंनी सोडले.त्यामुळे युतीत बिघाडी आणि आघाडीत भानगडी त्यातूनच गोत्यात आले कलमाडी, अशी अवस्था झाली. पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत  तसेच नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेला चांगलाच झटका दिला. जळगावमध्ये भाजपनेते व विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या चिरंजीवाचा शिवसेनेने पराभव केला होता. त्याचा वचपा भाजपने काढला. शिवसेनेला एकाकी पाडून पुणे निवडणुकीत मनसेला जवळ घेतले आणि मुंडेंचे वक्तव्य खरे ठरते की काय, असे कार्यकर्त्यांना वाटू लागले. नाशिकचे आमदार डॉ. वसंत पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी गेल्या सप्ताहात जी पोटनिवडणूक झाली, त्यामध्ये शिवसेनेची मते फुटली असून, शिवसेनेची घसरण सुरूच असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे शिवसैनिकांची पळता भुई थोडी झाली. भाजपने मनसेशी घरोबा करण्यावर भर दिला तर शिवसेनेला राष्ट्रवादीचीही साथ उरणार नाही, याचे प्रत्यंतर पुणेरी मिसळीने घडले आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीने शिवसेना-भाजपशी घरोबा करून पुणे महानगरपालिकेत काँग्रेसला बाजूला सारले होते.?पण केंद्रात आणि राज्यात सत्तेवर जायचे असेल तर काँग्रेसची साथ धरावीच लागेल, हे पक्के ठाऊक असल्यामुळे काँग्रेसशी जमवून घेतले जात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अजितदादा थेट सुरेश कलमाडींच्या घरी गेले. पवारांनी तंबी दिल्यामुळे ते घडले होते, अशी वृत्ते त्या वेळी प्रसिद्ध झाली होती. अजितदादा कलमाडींच्या घरी गेले म्हणजे सगळे आलबेल झाले, असे मानण्याचे कारण नाही. त्याचा प्रत्यय या वेळी स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आला. खरे तर पुण्यामध्ये अजितदादांचा एकछत्री अंमल असल्याचे चित्र आहे. त्याचे कारण पुण्यात असलेली काँग्रेसची  गटबाजी हे देखील आहे. कलमाडींना कोंडीत पकडण्याची संधी जसे अजित पवार सोडत नाहीत, तसे कलमाडी विरोधी काँग्रेसचा मोहन जोशी गटदेखील सोडत नाही. या वेळी तर कॉमनवेल्थ गेमचे स्टेडियम कोलमडून पडावे, तशी कलमाडींची अवस्था झाली आहे. पेशव्यांनी पुण्यात घाशीराम नेमला होता. तसे एकेकाळी पवारांनी कलमाडींना नेमले होते आणि कलमाडींनी हाती सोन्याचा नांगर घेऊन पुण्यभूमी नांगरायला सुरुवात केली. नांगरणी, पेरणी, खुरपणी, काढणी,मळणी आणि भरणी सगळी ‘कृषीकर्मे’ कलमाडींवर सोपविली होती.?त्यांना त्या वेळी एकही मराठा नेता दिसला नाही. त्यातून कलमाडी पुण्याचे अनभिषिक्त सम्राट झाले. अशा या कलमाडींना पुणेरी मिसळीचा झटका देण्याचे काम अजितदादांनी आरंभले आहे. या बाबतीत काका-पुतण्या एकच असावेत, अशीही कुजबूज आहे. पुणे मनपा स्थायी समितीवर भाजप उमेदवार निवडून आणण्याची किमया राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप- मनसेने घडवून आणली. वस्तुत: मनसेची जवळीक राष्ट्रवादीऐवजी काँग्रेसशी अधिक आहे आणि शिवसेनेची राष्ट्रवादीशी अधिक आहे. हा रूढ समज आहे. पण प्रेमात आणि राजकारणात काहीही घडू शकते. परंपरागत मित्र, नैसर्गिक मित्र तसेच परंपरागत शत्रू आणि नैसर्गिक शत्रू या सर्व संकल्पनांना हादरे देणारी घटना पुणेरी मिसळीच्या रूपाने घडली आहे. काँग्रेसने नेहमीच नैसर्गिक शेजार आणि नैसर्गिक घरोबा करण्यावर भर दिला आहे. पण राष्ट्रवादीने मात्र कुणाचाही हात धरून पुढे चालण्यास मागे-पुढे पाहिले नाही. राष्ट्रवादीवाले कुणाचाही हात धरून पुढे चालतात. किंबहुना ज्यांचा हात धरतात, त्यांना पळवून तरी नेतात किंवा वाटेत सोडूनही देतात. अजितदादांनी अलीकडेच राष्ट्रवादीला शिवसेनेच्या किरण पावसकरांसह अनेकांचा हात धरायला लावला आणि रामदास आठवलेंसारखे  वर्षानुवर्षे घरोबा करून राहिलेल्यांना अर्ध्या वाटेवर सोडून दिले.  शरद पवारांनी डाव्या-उजव्या शक्तींना सोयीनुसार बरोबर घेण्याचे आणि गरज संपताच सोडून देण्याचे तंत्र अवलंबिले होते. तोच प्रकार अजितदादांकडून घडू लागला आहे. शरद पवारांनी  पुलोदचा प्रयोग करून डाव्या आणि उजव्यांना एकत्र आणले होते.  


कम्युनिस्ट, शेकाप, जनता दल यांच्यासोबत भाजपलाही सत्तेत सहभागी करून घेतले होते. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला ताकद मिळाली होती. तेव्हापासून शरद पवार केव्हा तरी काँग्रेसला बाजूला सारून शिवसेना-भाजप युतीबरोबर संसार थाटतील, अशी शंका लोकांच्या मनात आहे. अजितदादांच्या पुणेरी मिसळीमुळे या शंकेला बळ मिळाले आहे. महाराष्ट्रातील राजकारणात पुणेरी मिसळीची,अशी सरमिसळ होऊ लागल्याने कोणाचाच पायपोस कोणाच्याच पायात राहणार नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर नवनवीन युती आणि आघाडी निर्माण होतील, याला धरबंद उरणार नाही

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP