सेटिंग आणि फिटिंग
राज्यात जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी सर्वत्र जोरदार ‘सेटिंग’ सुरू आहे, तर इकडे मुंबईत राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष आपल्या उमेदवाराच्या विजयाची ‘फिटिंग’ करण्यात दंग झाले आहेत.
इतर जिल्ह्यांतही जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीची जुळवाजुळव सुरू होती. बहुतेक आमदार मतदारसंघातील आपापला गड सांभाळण्यात गुंतले होते. जे विधानभवनात उपस्थित होते, त्यांचे चित्तही आपल्या जिल्ह्यातच होते. आपापल्या चेल्यांकडून ते तेथील परिस्थितीची माहिती घेत होते. तर राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात भूमिका निभावणारे काही ज्येष्ठ आमदार आणि मंत्र्यांचे लक्ष राज्यसभेच्या उमेदवारी अर्जाकडे लागले होते. सहा जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात उतरले असल्याने उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कोण मागे हटणार आणि कोण पडणार, तसेच अपक्ष उमेदवार संजय काकडे यांची कोटी कोटी उड्डाणे होत असल्याने ते कोणाला पाडणार याची रंगतदार चर्चा विधान भवनात होती.
असा निवडणुकीचा माहोल असल्याने सभागृहातील उपस्थिती अत्यंत तुरळक होती. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या दुस-या आठवड्यातील पहिल्याच दिवशी सभागृहात मरगळ होती. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणा-या राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेचा सोमवारी पहिला दिवस होता. या चर्चेत सहभागी होऊन राज्याच्या विकासाला दिशा देण्याचे काम आमदारांनी करावे, अशी अपेक्षा असते. मात्र राज्याच्या विकासापेक्षा प्रत्येकाला आपापल्या मतदारसंघातील राजकारणच महत्त्वाचे वाटत असल्याचे पहायला मिळाले. जे उपस्थित होते, त्यांची भाषणेही अत्यंत निष्प्रभ झाली. कामकाजाची वेळ संपत आली असतानाच गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर सभागृहात आले आणि त्यांनी गिरणी कामगारांच्या घरांच्या किंमतीबाबतचे निवेदन केले. या निवेदनानंतर विरोधकांनी जोरदार हंगामा केला. गिरणी कामगारांना मोफत घरे द्या, अशी मागणी करत सभागृहात गोंधळ घातला. या गोंधळातच दिवसभराचे कामकाज संपवण्यात आले.
0 comments:
Post a Comment