Tuesday, March 27, 2012

अर्थसंकल्पातून दिलजमाईकडे


राज्यात झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांत चांगलीच जुगलबंदी रंगली. राष्ट्रवादीने विश्वासघात केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. तर मोठ्या भावाने जो धडा घालून दिला, तोच लहान भावाने गिरवल्याचे प्रत्युत्तर राष्ट्रवादीने दिले होते. राज्य पातळीवर चाललेल्या या आरोप-प्रत्यारोपांबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त करत आघाडीचा धर्म काय फक्त राष्ट्रवादीनेच पाळायचा का, यापुढे असेच चालू राहिल्यास आमचे लोक सहन करणार नाहीत, असा इशारा दिला होता. 

या दोन पक्षांमध्ये असे संबंध ताणलेले असतानाच सोमवारी राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजनमंत्री अजित पवार यांनी सादर केला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दोघे एकत्र पत्रकारांना सामोरे गेले. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्र्यांचे तोंड भरून कौतुक करत मंदीच्या काळातही राज्याचा अर्थसंकल्प शिलकीचा सादर केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. विकासदर कमी होत असताना, गेल्या वर्षी काही उत्तरदायित्व स्वीकारावे लागले. तरी अजित पवार यांनी शिलकी अर्थसंकल्प सादर केला. तो देतानाही शेतीला प्राधान्य, पायाभूत सुविधांवर भर, वीजबिल वसुलीसाठी योजना जाहीर केल्या आहेत. कोणतीही फार मोठी करवाढ न करता समतोल करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी पावती मुख्यमंत्र्यांनी दिली.
 
मुख्यमंत्र्यांनी असे तोंड भरून कौतुक केल्यानंतर मग दादा तरी कसे मागे हटतील? त्यांनीही मग या चांगल्या अर्थसंकल्पाचे मुख्यमंत्र्यांनाच समर्पित केले. पत्रकारांनी कोणताही प्रश्न विचारला की दादा एकदम नम्रपणे ‘मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली’ अशी प्रस्तावना करून उत्तर देऊ लागले. गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प शिलकी सादर करूनही अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शेवटी तुटीत गेला. कापूस, धान आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना करावी लागलेली मदत, होमगार्डच्या मानधनात करावी लागलेली वाढ, कोतवाल, अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात करावी लागलेली वाढ आणि औद्योगिक प्रोत्साहन अनुदान यामुळे तूट वाढल्याचे दादांनी सांगितले. मात्र ती भरून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये रंगलेला हा कौतुक सोहळा पाहून दोघांमधील दिलजमाईचा मार्ग अर्थसंकल्पातून गेल्याचा प्रत्यय आला.
 
माजी मंत्री आणि विद्यमान आमदार डॉ. विमल मुंदडा, स्वातंत्र्यसैनिक व माजी मंत्री नागनाथअण्णा नायकवडी, माजी आमदार शिवाजीराव काळे आणि ज्येष्ठ कवी ग्रेस यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. खरेतर विद्यमान आमदाराचे निधन झाल्यास दिवसभरासाठी कामकाज तहकूब करावे, असा संकेत आहे. पण राज्याचा अर्थसंकल्प असल्याने दोन तास कामकाज तहकूब करून, ते पुन्हा सुरू करण्याचा समजूतदारपणा सर्वानी दाखवला.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP