Monday, March 26, 2012

कॉँग्रेसची कमाल, राष्ट्रवादीची धमाल


अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडणुकीत आघाडी राहिली नसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीतील ताणतणाव वाढले आहेत, त्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादीने आघाडीचा धर्म पाळला नसल्याची तसेच काँग्रेसची फसवणूक केली असल्याची टीका केली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उखडले. त्यांनी काँग्रेसलाच जबाबदार धरले आहे. आरोप-प्रत्यारोप वाढत गेले तेव्हा दस्तूरखुद्द शरद पवार यांनी ही काँग्रेसला इशारा देणारे वक्तव्य केले. दोन मित्रांमध्ये झालेल्या भांडणामुळे शिवसेना-भाजपमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, युतीचे नेते त्यांची चांगलीच खिल्ली उडवत आहेत.

राज्यातील 26 जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदांसाठी झालेल्या निवडणुकीत यंदा धमाल झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने आपला मोठा भाऊ मानलेल्या काँग्रेस पक्षाला मागे सारून राजकारणात चांगलीच कमाल करून दाखवली. राष्ट्रवादीने 26 पैकी निम्म्या जिल्हा परिषदा आपल्या ताब्यात घेतल्या. 13 जिल्हा परिषदांचे अध्यक्ष आणि 14 जिल्हा परिषदांचे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने निवडून आणले आहेत. तर काँग्रेसचे केवळ सात अध्यक्ष व चार उपाध्यक्ष निवडून आले आहेत. जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढवून आपली ताकद आजमावायची आणि निवडणुकीनंतर ज्याच्या जागा जास्त त्या पक्षाचा अध्यक्ष आणि ज्याच्या कमी त्याचा उपाध्यक्ष, असे सूत्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने ठरवले होते. पण अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडणुकीत झाले भलतेच. 
 
राष्ट्रवादी काँग्रेसने या दोन्ही पदांवर आपलेच वर्चस्व राहावे आणि जास्तीत जास्त जिल्हा परिषदा आपल्याच ताब्यात राहाव्यात, यासाठी आखलेले डावपेच यशस्वी करून दाखवले. कुठे काँग्रेसशी तर, कुठे शिवसेना-भाजपशी आघाडी करून सर्वाधिक पदे मिळवली. यामुळे राष्ट्रवादीचे  डावपेच  भविष्यातील राजकीय वाटचाल याविषयी उलट-सुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडणुकीत आघाडी राहिली नसल्याने काँग्रेस - राष्ट्रवादीतील ताणतणाव वाढले आहेत. त्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादीने आघाडीचा धर्म पाळला नसल्याची तसेच काँग्रेसची फसवणूक केली असल्याची टीका केली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उखडले. त्यांनी काँग्रेसलाच जबाबदार धरले आहे. आरोप-प्रत्यारोप वाढत गेले तेव्हा दस्तूरखुद्द शरद पवार यांनीही काँग्रेसला इशारा देणारे वक्तव्य केले. दोन मित्रांमध्ये झालेल्या भांडणामुळे शिवसेना-भाजपमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, युतीचे नेते त्यांची चांगलीच खिल्ली उडवत आहेत.
 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची मुत्सद्देगिरी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रणनीती याबरोबरच स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचे संघटन करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांची ताकद देण्यासाठी रसद पुरवण्याची क्षमता यांच्या जोरावर राष्ट्रवादीने यश मिळवले, हे खरेच. पण आपल्या पक्षाची ताकद वाढवत असताना राजकारणातील किमान नैतिकता पाळली जावी, ही काँग्रेसची अपेक्षा राष्ट्रवादीने पूर्ण केलेली नाही. त्यामुळेच मुख्यमंत्री चव्हाण, प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी तर काँग्रेसनेच शिवसेना-भाजपवर युती करण्याची सुरुवात केल्याचा ठपका ठेवला. काँग्रेसने कोल्हापूर, पुणे, परभणी या ठिकाणी विरोधकांशी हातमिळवणी करून निवडणूक लढवली. मोठय़ा भावाने दिलेला धडा आम्हीही गिरवला, अशा शब्दांत काँग्रेसलाच दोष देऊन आपल्यावरील आरोपांचे खंडन केले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी जातीयवाद्यांशी युती करण्याचा दोषारोप एकमेकांवर केले असले तरी, अनेक ठिकाणी काँग्रेसच्या मदतीने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष करणे शक्य असतानाही राष्ट्रवादीने शिवसेना-भाजपशी युती केली आहे. काँग्रेसला मागे सारून पुढे जाण्यासाठी राष्ट्रवादीने पद्धतशीरपणे डावपेच आखले होते. तसे डावपेच आखण्याची तसदी काँग्रेस पक्षाने घेतलेली दिसत नाही. 
 
नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असून, त्या तुलनेत काँग्रेसची पिछेहाट झाली आहे. तिच परिस्थिती जिल्हा परिषदांमध्ये उद्भवली आहे. सिंधुदुर्ग आणि लातूर या जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निर्विवाद बहुमताने निवडून आले आहेत. सिंधुदुर्ग, लातूर, कोल्हापूरसह औरंगाबाद, नांदेड, बुलढाणा आणि वर्धा, अशा सात ठिकाणी काँग्रेसचे अध्यक्ष तर सिंधुदुर्ग, लातूर, कोल्हापूरसह नाशिक या चार ठिकाणी काँग्रेसचे उपाध्यक्ष निवडून आले आहेत. सिंधुदुर्ग, लातूरवगळता राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसची कामगिरी अत्यंत सुमार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महानगरपालिकांची निवडणूक असो अथवा नगर परिषदा व जिल्हा परिषदांची निवडणूक असो, काँग्रेस पक्षाने जनाधार असलेल्या नेत्यांना विश्वासात घेऊन रणनीती तयार करणे आवश्यक होते. तसे घडले नसल्याने काँग्रेसवर नामुष्कीची वेळ आली आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे, पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, परभणी, यवतमाळ, बीड या आठ ठिकाणी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडून आणले आहेत. तर रत्नागिरी, नाशिक, सांगली, अमरावती, गडचिरोली या पाच जिल्हा परिषदांमध्येही राष्ट्रवादीचेच अध्यक्ष निवडून आले आहेत. त्यामुळे अध्यक्षांचे संख्याबळ 13 असून, त्या व्यतिरिक्त औरंगाबाद, नांदेड, बुलढाणा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या सहा ठिकाणी उपाध्यक्ष निवडून आले आहेत. आठ जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्ष-उपाध्यक्ष, पाच जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्ष आणि अन्य सहा जिल्हा परिषदांमध्ये उपाध्यक्ष निवडून आणले असल्याने बहुसंख्य जिल्हा परिषदांमध्ये त्यांनी आपला जम बसवला आहे. भाजपचे जळगाव, नागपूर आणि चंद्रपूर या तीन जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्ष तर, जालना, अमरावती आणि गडचिरोली या तीन ठिकाणी उपाध्यक्ष आले आहेत. शिवसेनेचे जालना आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांमध्ये अध्यक्ष तर, रायगड, रत्नागिरी, जळगाव आणि हिंगोलीमध्ये उपाध्यक्ष निवडून आले आहेत. यावरून ग्रामीण भागामध्ये शिवसेना-भाजप युतीला समर्थन नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई, ठाणेवगळता अन्य महानगरपालिकांमध्ये देखील युतीचा प्रभाव नाही. तेथे मनसेने आगेकूच केलेली दिसते आहे. 
 
काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सातारा, कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा अहमदनगर, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांचा सांगली, केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा सोलापूर, रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत यांचा नागपूर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा यवतमाळ या सात जिल्हा परिषदा कब्जात घेऊन त्यांच्या गडाला सुरुंग लावण्याची कामगिरी राष्ट्रवादीने केली आहे. आज जिल्हे घेतले उद्या त्यांचे मतदारसंघ घेण्यासही ते मागेपुढे पाहणार नाहीत. आपल्या मित्रपक्षानेच दिलेल्या या अनपेक्षित धक्क्यातून काँग्रेसच्या नेत्यांना सावरता आलेले नाही. केवळ नारायण राणे सिंधुदुर्गमध्ये आणि विलासराव देशमुख यांनी लातूरमध्ये केलेली भक्कम तटबंदी राष्ट्रवादीला फोडता आली नाही. यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये शिवसेना-भाजपची मदत घेऊन आघाडीचा धर्म राष्ट्रवादीने पाळलेला नाही. चंद्रपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येणे शक्य होते. पण तेथे राष्ट्रवादीने भाजपला मदत केली आहे. यवतमाळमध्ये काँग्रेसला दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने शिवसेना-भाजपची मदत घेतली आहे. गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य निवडून आले असताना राष्ट्रवादीने भाजपची मदत घेऊन सत्ता आणली. तर, नागपूरमध्ये भाजपला साथ देऊन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना एक प्रकारे मदत केली आहे. राष्ट्रवादीने शिवसेना-भाजपची मदत घेतली असताना काँग्रेसवरच ठपका ठेवण्याचे काम केले आहे. काँग्रेसने मात्र जातीयवादी पक्षांशी कोठेही युती केली नसल्याचा खुलासा केला आहे. कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी आघाडी केली आहे. ही संघटना जातीयवादी नाही, असे म्हटले आहे. अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडणुकीने राजकारणात चांगलीच रंगत आणली आहे खरी. पण 2014 च्या विधानसभा निवडणुकीसह या पुढील कोणत्याही निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी राहील की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP