Wednesday, March 28, 2012

आमदारांचा दुष्काळ


राज्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. अद्याप मार्च महिना संपलेला नसता अनेक तालुक्यांवर पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. चाऱ्यावाचून जनावरे तडफडत आहेत. महिलांना पाच-पाच किमीवरून पाण्याचे हंडे डोक्यावर वाहावे लागत आहेत. जलाशयातील पाण्याची पातळी झपाटय़ाने खालावत आहे. शेतातील पिके पाण्यावाचून करपली आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे. ऑगस्ट महिन्यात जो शेवटचा पाऊस झाला त्यानंतर परतीचा पाऊसच न झाल्याने राज्यावर भीषण संकट कोसळले आहे. या दुष्काळावर सविस्तर चर्चा व्हावी आणि राज्यातील जनतेला दिलासा मिळावा, यासाठी काँग्रेसचे सदस्य सदाशिव पाटील यांनी नियम २९३ अन्वये चर्चा उपस्थित केली होती. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे या चर्चेच्या वेळी सभागृहात आमदारांच्या उपस्थितीचा दुष्काळ असल्याचे दिसून आले. 

लक्षवेधी सूचनेनंतर सभागृहात दुष्काळाचा प्रस्ताव चर्चेला आला तेव्हा त्याचे उत्तर देण्यासाठी संबंधित खात्याचे मंत्रीच उपस्थित नव्हते. दुष्काळाचा विषय हा कृषी, ग्रामविकास, मदत व पुनर्वसन, महसूल अशा अनेक खात्यांशी संबंधित असतो. त्यामुळे या महत्त्वाच्या चर्चेच्या वेळी संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात उपस्थित असणे आवश्यक होते. मात्र या खात्याचा एकही मंत्री या चर्चेच्या प्रारंभी उपस्थित नसल्याचे शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी सभापतींच्या निदर्शनास आणून दिले. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे या प्रस्तावावर बोलायला उभे राहिले तेव्हाही सभागृहात संबंधित खात्याचे मंत्री नसल्याबद्दल त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. राज्यातील जनतेच्या जीवन-मरणाशी संबंधित असणाऱ्या दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही. जोपर्यंत संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात येत नाहीत तोपर्यंत सभागृह तहकूब करावे, अशी मागणी त्यांनी केली. तालिका अध्यक्ष गिरीष बापट यांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. सभागृह सुरू झाले तेव्हा मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी मैं हूँ नाच्या आविर्भावात सभागृहात प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आले.

संबंधित खात्याचे मंत्री जरी सभागृहात आले असले तरी आमदारांची उपस्थितीती मात्र अत्यंत तुरळक होती. जे आमदार उपस्थित होते त्यांचीही चुळबूळ सुरू होती. शेतकऱ्यांचे कैवारी, तारणहार आणि आम्ही शेतकरी आहोत, असा दावा करणारे आमदारच सभागृहात दिसत नव्हते. जे होते तेही आपले भाषण झाले की सभागृहातून काढता पाय घेत होते. एकंदर दुष्काळावरील चर्चेच्या वेळी मंत्री आणि आमदारांचा सभागृहात दुष्काळ असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP