माणुसकीला साद
एसआरएचे प्रकल्प गोरगरीबांसाठी आहेत की बिल्डरांसाठी आहेत, असा प्रश्न पडतो, अशी टिप्पणी करून राजकीय दबावाने खोटय़ा तक्रारी करण्याच्या सर्व प्रकरणांची खोलवर जाऊन चौकशी केली जाईल, असे त्यांनी जाहीर केले. तर सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एसआरए योजनांच्या अमलबजावणीसाठी स्वतंत्र मॅन्युअल तयार करण्याची घोषणा केली. तरीदेखील हा प्रश्न ताणला जाऊ लागला, तेव्हा विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी सदस्यांना इतकी जास्त माहिती ठेवत जाऊ नका, असा उपरोधिक टोला लगावला तेव्हा अनेकांचे चेहरे पाहण्यासारखे झाले.
एसआरए, कंत्राटे अशा हितसंबंध दडलेल्या प्रकरणासाठीच बहुतेक आमदार धडपडत असताना बुधवारी मात्र माणुसकीला साद घालणारा विषय विधानसभेत चर्चेला आला.
कुष्ठरोगाचे संपूर्णत: निर्मूलन झाल्याचे सरकारने जाहीर केले असतानाच या वर्षी केलेल्या पाहणीत कुष्ठरुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची बाब विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी लक्षवेधीद्वारे सभागृहाच्या निदर्शनास आणली. राज्यात कुष्ठरोगाचे निर्मूलन झाल्याचे सरकारने जाहीर केल्याने कुष्ठतंत्रज्ञांची पदे रद्द करण्यात आली आहेत. मात्र ऑक्टोबर महिन्यात केलेल्या पाहणीमध्ये नवीन 12 हजार रुग्ण आढळल्याचे त्यांनी सांगितले. कुष्ठरोग अनुवांशिक नाही, तो संसर्गजन्य नाही, असे सांगितले जात असले तरी त्यावर कुणीही विश्वास ठेवत नाही. एखाद्याला कुष्ठरोग झाल्याचे आढळल्याबरोबर घरातील माणसे निष्ठुर होऊन रुग्णाला घराबाहेर काढतात. त्यांना अस्पृश्यासारखी वागणूक दिली जाते. खडसे यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नावर दोन्ही बाजूच्या सदस्यांनी अत्यंत संवेदनशील शब्दांत भावना व्यक्त केल्या. कुष्ठरुग्णांना त्यांचे नातेवाईकच घरात ठेवत नसल्यामुळे ते स्वतंत्र वसाहती करून राहतात.त्यांच्या वसाहतीला कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत. उदरनिर्वाहासाठी पूर्वी ते दारू गाळत. आता त्यांना तेही साधन उरलेले नाही. त्यांना मलमपट्टी करण्यासाठी बाहेरचा डॉक्टर कुष्ठरुग्णांच्या वसाहतीत जात नाही. त्यांच्यातील मुलांना प्रशिक्षण देऊन मलमपट्टी करावी लागते. या प्रश्नाकडे माणुसकीच्या दृष्टीने पाहावे असे आवाहन त्यांनी दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी केले. आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनीही याबाबत अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे या प्रश्नावर माणुसकीला साद घालण्यात आली आणि त्यावर चांगला प्रतिसादही मिळाला, असे चित्र दिसले.
0 comments:
Post a Comment