कोंडदेवांनी केला कोंडमारा, कांबळेंनी केली कोंडी
संमेलनात असे वाद निर्माण करण्यात आल्यामुळे संमेलनस्थळी अभूतपूर्व अशी सुरक्षा देण्याची वेळ आली. या संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी मात्र या वादाची दखल घेण्याचे टाळून एका वाक्यातच त्याची वासलात लावली. ‘वादांना मी घाबरत नाही आणि त्यापासून पळ काढत नाही,’ असे सांगून त्यांनी वादाला बाजूला सारले. तर गोडसेच्या उल्लेखाचा निषेध केला. संमेलनाध्यक्षांनी आपले भाषण एवढय़ा उंचीवर नेऊन ठेवले होते की, त्यापुढे राजकीय स्वार्थासाठी उकरून काढलेले वाद आणि प्रस्थापित हिंदुत्ववादय़ांनी स्मरणिकेच्या माध्यमातून केलेली घुसखोरी हे दोन्ही प्रकार अगदीच खुजे ठरले. दादोजी कोंडदेवांनी केला उद्धवांचा कोंडमारा आणि उत्तम कांबळेनी केली कोंडी अशी वाद घालणा-यांची अवस्था झाली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वादाचे गालबोट लागल्याशिवाय पार पडले असे कधी घडले नाही. कोणतेही साहित्य संमेलन असो, ग्रामीण, विद्रोही, ओबीसी, कोंकणी, दलित त्यामध्ये वादाचे प्रसंग आले नाहीत असे कधी होत नाही, तरीदेखील संमेलने होत आहेतच ही चांगली गोष्ट आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला पुणे महानगरपालिकेने दादोजी कोंडदेवांचा पुतळा लाल महालातून हटविण्याचा ठराव संमत केला. त्याच वेळी संभाजी ब्रिगेडने दादोजी कोंडदेव स्टेडियमचे नाव बदलण्यासाठी संमेलन वेठीस धरण्याचा डाव रचला. दादोजी कोंडदेवांना विरोध होऊ लागताच शिवसेनेला कोंडदेवांच्या प्रेमाचे भरते आले. आणि कोंडदेव विरोधकांना चोप देण्यापर्यंत त्यांची मजल गेली. कोंडदेव समर्थक आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आणि भावनिक मुद्दा ऐरणीवर आल्याचे पाहून निवडणूक जवळ आली की काय, अशी शंका वाटू लागली. केंद्रातील राजकीय घडामोडींमुळे मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाकारता येत नाही, अशी कुजबूज सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या इशा-यावर चालणा-या संभाजी ब्रिगेडसारख्या संघटना आगीत तेल ओतण्याचे काम करीत आहेत.
कोंडदेव हे ऐतिहासिकदृष्टय़ा गुरू नाहीत, हे सिद्ध झाले तर कोंडदेवांना मोठे करण्याची गरज नाही, असे म्हणावे लागेल. दादोजी कोंडदेव स्टेडियमला प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी करून संभाजी ब्रिगेडने शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरेंचा कोंडमारा केला आहे. कारण त्यांच्या आजोबांपेक्षा म्हणजेच दादाजींपेक्षा दादोजी प्रिय असा संदेश महाराष्ट्रात गेला आहे. खरे तर दादोजी हे शिवरायांचे गुरू नसतील तर हे ऐतिहासिक सत्य शिवसेनेला स्वीकारावे लागेल. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची मनोवृत्ती पाहिली तर त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्टेडियमचे नामांतर करण्यासाठी आटापिटा करणाऱ्या मराठा संघटनांनी तसेच शिवसेनेने मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यास विरोध केला होता. त्यामुळे शिवसेना काय किंवा राष्ट्रवादीच्या छत्राखाली असलेल्या संघटना काय भावनिक मुद्दय़ांचे भांडवल करीत सोईचे राजकारण तेवढे केले जात आहे. राष्ट्रवादीने मराठा समाजाचे संघटन सुरू करताच शिवसेनेने दलित ओबीसींना चुचकारणे सुरू केले. मतांचे ध्रुवीकरण करून निवडून आल्यानंतर संख्याबळाच्या जोरावर एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप एकत्र येऊन आघाडी करायलाही कमी करीत नाहीत. पुणे पॅटर्नचा जन्म अशा आघाडीतूनच झाला आहे.
शिवसेनेचे छत्रपती शिवाजी महाराजांवर एवढे अगाध प्रेम आहे की, सत्ता हातात असताना महाराजांच्या गड-किल्ल्यांची दुरुस्ती आणि सुशोभीकरण करणे त्यांना जमले नाही. कार्यप्रमुख उद्धव ठाकरेंनी हेलिकॉफ्टरमधून त्यांचे फोटो काढण्यातच समाधान मानले. शिवसेनेने एका तरी किल्ल्याचे सुशोभीकरण करून दाखवायचे होते. त्यामुळे भावनेचे मुद्दे कितीही तीव्र करण्याचा प्रयत्न केला तरी फारसा उपयोग होणार नाही. भाजपची तर आणखी गोची झाली आहे, राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे शिवसेनेसारखी आक्रमक भूमिकाही घेता येत नाही. पुतळा हटविणे असो की स्टेडियमचे नामांतर असो; भाजप टोकाची भूमिका घेऊ शकत नाही. मात्र जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले ‘खोटे बोल, पण रेटून बोल’ या उक्तीप्रमाणे आपली भूमिका लोकांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रस्थापित हिंदुत्ववाद्यांचा पगडा असलेल्या महामंडळाच्या स्मरणिकेमध्ये महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचे उदात्तीकरण करण्यात आले. नंतर मात्र जेव्हा निषेध झाला तेव्हा हात झटकून मोकळे झाले. हा ढोंगीपणा संघवालेच करू शकतात.?साहित्य असो नाटक असो वा सिनेमा असो; त्यात नथुराम गोडसेला आणण्याचा उद्योग या मंडळींनी चालविला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली लोकांचा बुद्धिभेद करण्याचा कुटील डाव या लोकांनी रचला आहे. बरे झाले संमेलनात त्यांचे पितळ उघडे पडले. खुनी तो खुनी; मग तो मोठा लेखक असो वा संपादक असो; त्याचे उदात्तीकरण होताच कामा नये.
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या हमरीतुमरीमध्ये संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी मराठीच्या तथाकथित सारस्वतांचे असे काही बौद्धिक घेतले, त्यांच्या डोळय़ांत असे झणझणीत अंजन घातले की गपकन डोळे मिटून घेण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय उरला नाही. प्रस्थापित समाजाच्या मनोरंजनासाठी आयुष्यभर लेखणी झिजवून स्वत: प्रस्थापित बनलेल्या साहित्यिकांनी आपल्या झापडबंद डोळय़ांनी आत्मपरीक्षण करावे आणि आजूबाजूच्या धगधगत्या वास्तवाचे आकलन आपल्या साहित्य कृतीत उतरवावे, अशा आशयाचे आव्हान उत्तम कांबळेंनी दिले आहे.