नामांतराचा मूळ ठराव काँग्रेसचाच
मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याबाबत श्रेय घेण्याची धडपड पुन्हा सुरू झाली आहे. या खेचाखेचीत आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेही उतरले आहेत. आंबेडकरांच्या नावाची शिफारस आपणच केल्याचा दावा करून त्यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. प्रत्यक्षात ना ठाकरेंनी ना शरद पवारांनी, वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळाने या ठरावाला मान्यता दिली होती.
मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यास विरोध करणा-या स्वामी रामानंदतीर्थ, गोविंदभाई श्रॉफ आणि अनंत भालेराव या नेत्यांची सहमती घेण्याची जबाबदारी त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्यावर सोपवली होती. ही कामगिरी पार पाडून चौधरी परत आल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन नामांतरास मान्यता देण्यात आली. या बैठकीस शरद पवारही उपस्थित होते. त्यानंतर शरद पवारांनी अचानक वसंतदादांचे सरकार पाडले आणि पुलोद सरकारचे ते मुख्यमंत्री बनले. विरोधी पक्षात बसलेले काँग्रेसचे मधुकरराव चौधरी यांनी दादांच्या मंत्रिमंडळात चर्चा झाल्याप्रमाणे नामांतराचा अशासकीय ठराव मांडला. या संदर्भात शासकीय ठराव आणू असे आश्वासन देऊन त्यांनी अशासकीय ठराव मागे घेण्यास सांगितले. विधानसभेत काँग्रेसने सर्वप्रथम अशासकीय ठराव आणल्याची नोंद झाली तशी नोंद विधान परिषदेच्या कामकाजातही झाली आहे.
विधानसभेच्या कामकाजात जशी काँग्रेसने सर्वप्रथम ठराव मांडल्याची नोंद झाली, तशीच विधान परिषदेतही झाली असल्याची माहिती केरळचे राज्यपाल रा. सु. गवई यांचे जनसंपर्क अधिकारी सुहास सोनवणे यांनी दिली. 21 जुलै 1978 रोजी विधान परिषदेत काँग्रेसचे नासिकराव तिरपुडे यांनी नामांतराचा प्रश्न उपस्थित केला, त्यावर पुलोदचे मंत्री निहाल अहमद यांनी विचार करतो असे मोघम उत्तर दिले. मात्र हस्तक्षेप करून उपसभापती गवई यांनी मागील मंत्रिमंडळातझालेला निर्णय मान्य आहे का असा प्रश्न विचारून काँग्रेसचा हा निर्णय कामकाजाच्या नोंदीत आणला. त्यावेळी सभागृहात आलेले मुख्यमंत्री शरद पवार यांनी पुढील आठवडय़ात शासकीय ठराव मांडण्याचे आश्वासन दिले.
बाळासाहेब ठाकरे यांनी डॉ. आंबेडकरांचे नाव देण्याची शिफारस केली असती, तर दंगली उसळल्या तेव्हा गप्प का बसले. 1994 पर्यंत नामांतराला तीव्र विरोध करून बाबासाहेबांवर टीकेची झोड उठवणा-या ठाकरेंची समजूत काढू, असे त्यावेळी समाजकल्याणमंत्री असलेल्या रामदास आठवले यांनी तत्कालीन विधानसभाअध्यक्ष मधुकरराव चौधरी यांना एका बैठकीत सांगितले होते. विरोध नव्हता तर आठवले समजूत काढायला का निघाले होते, असा प्रश्न त्यामुळे विचारला जात आहे. घरात नाही पीठ हवे कशाला विद्यापीठ, भोपळ्यावर चष्मा लावला की झाला आंबेडकर, निजामाचे हस्तक अशा प्रकारची वक्तव्ये ठाकरेंचीच होती.
0 comments:
Post a Comment