हवेत विरल्या सा-या डरकाळ्या
शिवसेनाप्रमुखांनी आपले पद सोडण्याच्या डरकाळय़ा अनेकदा फोडल्या आहेत. शिवसैनिक उतले मातले, घेतलेला वसा त्यांनी टाकून दिला की शिवसेना भवनातून शिवसेनाप्रमुख पद सोडून देण्याची डरकाळी ऐकू येते. पण या वेळी निराळे घडले आहे. शिवसेना नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिक यांच्यातील वादामुळे नव्हे; तर राणे यांच्या आरोपामुळे ही डरकाळी फोडली आहे. शिवसेनाप्रमुखांनी अप्रत्यक्षपणे राणे यांचे महत्त्व वाढविल्यामुळे शिवसेना नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.?नारायण राणे यांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा राज्याच्या विकासासाठी कसा आवश्यक आहे, हे पटवून देतानाच शिवसेनेच्या विरोधाची हवा काढून टाकण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. यामुळेच आज ते राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आले आहेत.
जैतापुरात हिंसाचार घडविण्याचा कट शिवसेना भवनात रचला होता आणि अकरा खासगी वीज कंपन्यांनी हा प्रकल्प बंद पाडण्यासाठी पाचशे कोटी रुपये दिले असे दोन घणाघाती आरोप नारायण राणे यांनी केले होते. त्यांनी केलेल्या या हल्ल्याने शिवसेना कार्यप्रमुखांपासून ते शिवसेनेच्या पदाधिका-यांपर्यंत सर्वजण असे सैरभैर झाले की त्यांना प्रतिक्रिया द्यावी कशी,हेच समजेनासे झाले. शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंनी पदाधिका-यांची बैठक बोलाविली आणि काही करून जाळपोळ करा,हिंसाचार करा, आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, असे आदेश रातोरात पोहोचविले आणि जैतापूर पेटविण्यात आले. त्यामुळे एका तरुणाचा बळी गेला, असा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करायला कार्यप्रमुख महाराष्ट्रात राहिले नाहीत, ते जंगल सफरीला निघून गेले होते. इकडे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आणि लोकप्रतिनिधी राणे यांचे अभिनंदन करत होते.
शिवसेना भवनात हिंसाचाराचा कट शिजला असल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर नारायण राणेंनी दोन दिवसांनी आणखी एक बाँबगोळा टाकला, तो पाचशे कोटींच्या तोडपाणीचा, पण शिवसेनेतून कसलीही प्रतिक्रिया नाही. विधिमंडळात शिवसेनेची अब्रू घालवली तरी शिवसेना आमदारांकडून प्रतिकार झाला नाही. मुख्यमंत्री चव्हाण यांना पत्रकारांनी विचारले असता राणेंकडे पुरावे असतील, असे मोघम उत्तर त्यांनी दिले. तर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गृहखात्याकडे याबाबत माहिती नाही,असे सांगून राणेंना एकटे पाडण्याचा प्रयत्न केला. पण राणे आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले. शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई, प्रतोद रवींद्र वायकर यांना राणेंच्या आरोपाबाबत आक्रमक भूमिका घेण्याचे भान राहिले नाही. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत आणि नीलम गोऱ्हे यांनीही आवाज उठवला नाही. उद्धव ठाकरेंचा आवाज चढू शकला नाही. शिवसेनेची उरलीसुरली अब्रू वेशीवर टांगण्याचे काम नारायण राणे करीत असताना सगळेच निपचित पडल्याचे पाहून उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना समोर आणले. जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे आणि शिवसेना गोत्यात येते तेव्हा बाळासाहेबांना धाव घ्यावी लागते. राणेंच्या वक्तव्यावर आमदार आक्रमक झाले नाहीत म्हणून शिवसेनाप्रमुखांनी त्यांची एक बैठक बोलावून त्यांना झाप झाप झापले. यानिमित्ताने शिवसेनेतील अस्वस्थता प्रकर्षाने बाहेर आली.
शिवसेनेवरील आरोपांचा आमदार जर सामना करणार नसतील तर शिवसेना हवी कशाला, ती बरखास्त केलेली बरी, असा इशारा शिवसेनाप्रमुख ठाकरे यांनी दिला. त्याचबरोबर राणे आणि मुख्यमंत्र्यांनी आरोप सिद्ध करून दाखवावे; अन्यथा आपल्या पदांचे राजीनामे द्यावेत आणि सिद्ध केले तर आपण शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा देऊ, अशी डरकाळी फोडली. त्यावर मुख्यमंत्री चव्हाण यांनीही बाळासाहेबांना निर्दोषत्व सिद्ध करण्याचे आव्हान दिले. मुख्यमंत्र्यांनी बाऊन्सर टाकल्यामुळे पेचात पडलेल्या शिवसेनाप्रमुखांनी मग आपल्या नेहमीच्या शिवराळ भाषेत ‘बिनडोक मुख्यमंत्री’ यासारखे अपमानकारक शब्द वापरले. आपले कुटुंब चांगल्या पद्धतीने चालवणारे चालक आणि दुसरीकडे उनाड, वात्रट, पुळचट, टारगट मुले असलेले कुटुंब यात जो फरक तो काँग्रेस आणि शिवसेनेत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या डरकाळय़ा अनेकदा ऐकल्या; पण त्यातून ठोस असे काही हाती लागले नाही. डरकाळय़ा हवेत विरून गेल्या.
शिवसेनाप्रमुखांनी अप्रत्यक्षपणे राणे यांचे महत्त्व वाढविल्यामुळे शिवसेना नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.?नारायण राणे यांनी जैतापूर प्रकल्प हा विकासासाठी कसा आवश्यक आहे, हे पटवून देतानाच शिवसेनेच्या विरोधाची हवा काढून टाकण्याचे काम केले आहे. यामुळेच आज ते राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आले आहेत. प्रकल्पाला संपूर्ण ताकदीनिशी समर्थन आणि विरोधकांची झोप उडेल असे त्यांना दिलेले आव्हान अशी दुहेरी कामगिरी त्यांनी बजावली आहे. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांना आपले पद पणाला लावावे लागले, हे राणे यांचे मोठे यश आहे. शिवसेनेला गुडघे टेकायला लावण्याचे नैतिक धर्य, राजकीय कसब आणि मुत्सद्देगिरी त्यांच्यामध्ये असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. शिवसेनेची झोप उडविण्याची ताकद असलेल्या राणे यांना या डरकाळय़ा किती खऱ्या किती खोटय़ा हे माहिती असल्यामुळे उद्धव ठाकरे यांना त्यांनी पूर्णपणे उघडे पाडले आहे.
0 comments:
Post a Comment