Wednesday, August 3, 2011

आबा पाहणार छैय्या छैय्या!


राज्यात डान्सबार बंदी करून ‘इमेज बिल्डिंग’ करणारे गृहमंत्री आर. आर. पाटील आता डान्सबारचा अनुभव घेणार आहेत.

राज्यात डान्सबार बंदी करून इमेज बिल्डिंग’ करणारे गृहमंत्री आर. आर. पाटील आता डान्सबारचा अनुभव घेणार आहेत. प्रत्येक अधिवेशनात डान्सबार आणि आर. आर. पाटील हे समीकरणच झाले आहे. पावसाळी अधिवेशनही त्याला अपवाद ठरले नाही. पुन्हा डान्सबारचा प्रश्न उपस्थित झाला. भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत डान्सबार सुरू असल्याचे सांगताना त्याचा पुरावा म्हणून एक सीडीच सभागृहात सादर करून खळबळ उडवून दिली. फडणवीस यांनी डान्सबार बंदीचा दावा करणा-या आर. आर. आबांवरच एक प्रकारे हा सनसनाटी आरोप केला होता. आबांनी डान्सबार बंदीचा दावा करावा आणि विरोधकांनी डान्सबार सुरू असल्याचे पुरावे द्यावेतहे नित्याचे झाले आहे. या वेळी मात्र विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी आणि विधान परिषदेत विनोद तावडे यांनी आजही डान्सबार चालू असल्याचे पुरावे दिले. या दोघांनी कोणते डान्सबार सुरू आहेतत्यांची नावेही दिली. फडणवीस यांनी या डान्सबारमध्ये पोलिस अधिका-यांची भागीदारी असल्याचा आरोप करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.
 
हा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा गृहराज्यमंत्री सतेज पाटील सविस्तर उत्तरे देत होते. त्यांनी संबंधित पोलिस अधिका-यांवर कारवाईचे आश्वासनही दिले. त्यावेळी आबा सभागृहात नव्हते. पणपोलिस अधिका-यांवर कारवाईचे ऐकताच ते सभागृहात आले आणि गृहराज्यमंत्र्यांचे उत्तर संपल्यानंतर विरोधकांनी आबांकडे उत्तराची मागणी केली. डान्सबारच्या मालकांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी करताचत्याला तात्काळ उत्तर देण्याचे काम आबांनी केले. ते म्हणालेआधी सीडी पाहतो आणि मगच कारवाईचे बघतो. पोलिसांना डान्सबार बंद आहेत काहे पाहण्याचे तेवढे एकच काम नाही. सार्वजनिक उत्सवांचा बंदोबस्तसुरक्षा व्यवस्था अशी अनेक कामे असतातअसे सांगून पोलिस अधिका-यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न आबांनी केला.

मुंबई, ठाणे, नागपूर या शहरांमध्ये डान्सबार राजरोस सुरू आहेत. हे सर्वानाच माहिती आहे. पण, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली सीडी पाहून आबा कारवाईचे ठरवणार आहेत. त्या सीडीतील छैय्या छैय्या डान्स पाहिल्यानंतरच डान्सबार सुरू असल्याची त्यांची खात्री पटणार आहे, हे विशेष. खरंतर, आबांचे पोलिस नेमके कशात व्यस्त आहेत, हे समजणे कठीण आहे. एक अनोळखी जहाज राजभवनला वळसा घालत जुहूच्या समुद्रकिनाऱ्यावर हेलकावत आले. पण, आबांच्या पोलिसांना त्याचा पत्ताही नव्हता. तटरक्षक दलाच्या रडारवर हे जहाज दिसलेच नाही, असे सांगण्यात आले. जहाज येऊन आदळले तेव्हा जुहू पोलिस ठाण्याने योग्य पोलिस बंदोबस्त ठेवल्याचे गृहविभागातर्फे सांगण्यात आले आहे. बॉम्बस्फोट झाल्यानंतर सुरक्षेत वाढ करायची आणि अचानक एखादे जहाज परदेशातून मुंबईत आल्यानंतर तेथे बंदोबस्त ठेवायचा, या प्रकाराचा सर्वत्र निषेध केला जात आहे. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी त्याबाबत अत्यंत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, या जहाजातून 50 कसाब आले असते तरी पोलिसांना काही समजले नसते. हे यापूर्वी कसाबने येऊन सिद्ध केले आहे. तटरक्षक दलाचा गलथानपणा पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. राज्याच्या तटरक्षक दलाला तर नाहीच पण,सागरीकिना-यापासून पाच नॉटिकल मैलांपर्यंत राज्याचे पोलिस, त्यानंतर बारा नॉटिकल मैलापर्यंत तटरक्षक दल आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत नौदल अशी सागरी सुरक्षेची यंत्रणा असताना या कोणालाच भरकटलेल्या जहाजाची माहिती मिळू नये याबद्दल आश्चर्य व्यक्त होते आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP