Wednesday, August 10, 2011

पाणी पेटले..


दोन आठवडे शांत असलेले विरोधक मंगळवारी एकदम आक्रमक झाल्याचे दृश्य बघायला मिळाले. विषयदेखील तेवढाच महत्त्वाचा होता. पुणे जिल्ह्यातील मावळ येथे पाण्यासाठी सुरू झालेल्या सर्वपक्षीय आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि त्याचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटले.

दोन आठवडे शांत असलेले विरोधक मंगळवारी एकदम आक्रमक झाल्याचे दृश्य बघायला मिळाले. विषयदेखील तेवढाच महत्त्वाचा होता. पुणे जिल्ह्यातील मावळ येथे पाण्यासाठी सुरू झालेल्या सर्वपक्षीय आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि त्याचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटले. मावळमध्ये पाणी पेटल्याची धग सभागृहात जाणवली. मावळच्या पवना धरणातील पाण्याचा वापर शेतीसाठी व्हावा, या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आणि त्यांना सर्वपक्षीयांची साथ मिळाली. जलसंपदामंत्री असताना अजित पवार यांनी धरणातील पाणी पिण्यासाठी वापरण्याच्या योजनेला चालना दिली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि गोळीबार केल्याने आंदोलक अधिक प्रक्षुब्ध बनले. जलसंपदा आणि गृहखाते ही दोन्ही खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस चांगलेच अडचणीत आल्याची चर्चा विधान भवनात होत होती. त्यामुळेच विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत जेव्हा वातावरण तप्त झाले तेव्हा दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 पवना धरणातील पाणी जलवाहिन्यांतून पिण्यासाठी पुण्याला नेण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये धुमसत असलेला असंतोष सर्वपक्षीय आंदोलनाच्या रूपाने बाहेर पडला. मात्र हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. पोलिस गोळीबारात एकाचा मृत्यू आणि अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त विधान भवनात येऊन धडकताच विरोधकांनी सरकारकडे निवेदन करण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला तर सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहाच्या प्रथा आणि परंपरेनुसार सभागृह काही तासांसाठी स्थगित करावे आणि घटनेची सविस्तर माहिती घेऊन निवेदन सादर करावे, अशी आग्रही मागणी केली. या वेळी विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांनी पाच मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले आणि पुन्हा सभागृह सुरू झाले तेव्हा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याद्वारे निवेदन केले जाईल, असे मोघम आश्वासन दिले. पण विरोधकांचे समाधान झाले नाही. उलट ते अधिक आक्रमक बनले असता, गृहमंत्री आर. आर. पाटील सभागृहात आले आणि त्यांनी आंदोलन थांबवण्याचा ‘नामी’ उपाय सांगितला. पोलीस गोळीबार कसा झाला आणि त्यामुळे काय घडले हे सांगण्याऐवजी त्यांनी तुम्ही तुमच्या लोकांना शांत करा आम्ही आमच्या लोकांना शांत करतो, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. एक तासाने निवेदन सादर करू, असे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, आबांचे शांततेचे आवाहन मानण्याच्या मनस्थितीमध्ये विरोधक नव्हते. त्यांनी गोंधळ चालूच ठेवला. दोन्ही सभागृहात हेच वातावरण निर्माण झाले असल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस अत्यंत संवेदनशील बनत चालला असून, यापुढील काळात पाण्यासाठी युद्धे होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याचा अनुभव मावळच्या आंदोलनाने दिला. सभागृहापर्यंत पोहोचलेली आंदोलनाची धग विझते की वाढत जाते हेच आता पाहायचे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP