Tuesday, August 9, 2011

शिवसेना चिडीचूप


एकेकाळची आक्रमक शिवसेना पुरती गलितगात्र झाली असल्याचा प्रत्यय सोमवारी सभागृहात पुन्हा आला. ठाकरे कुटुंबीयांपैकी कोणाचेही नाव घेतले तरी चवताळून उठणारी शिवसेना प्रचंड आक्रमक असल्याचा अनुभव याच सभागृहाने यापूर्वी अनेकदा घेतला आहे.

एकेकाळची आक्रमक शिवसेना पुरती गलितगात्र झाली असल्याचा प्रत्यय सोमवारी सभागृहात पुन्हा आला. ठाकरे कुटुंबीयांपैकी कोणाचेही नाव घेतले तरी चवताळून उठणारी शिवसेना प्रचंड आक्रमक असल्याचा अनुभव याच सभागृहाने यापूर्वी अनेकदा घेतला आहे. शिवसेनेच्या वाघाची शेळी केव्हाच झाली आहे. पणआता ती पुरती गलितगात्र होऊन पडली आहे. राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि दै. सामनाचे संपादक संजय राऊत यांच्याविरुद्ध हक्कभंगाची सूचना देताना त्यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून आपले चारित्र्यहनन केल्याचे आणि त्यासाठी अत्यंत हीन दर्जाचीशिवराळ भाषा वापरली असल्याचे सूचनेत नमूद केले. राणे विशेषाधिकार भंगाची सूचना देताना समोर विरोधी पक्षांच्या बाकावर शिवसेना गटनेते सुभाष देसाई,सभागृहात देसाईंना डावलून पोपटपंची करणारे रवींद्र वायकरसतत आक्रस्ताळेपणा करणारे विनोद घोसाळकरठाण्याचे सुभेदार एकनाथ शिंदे आणि सर्वपक्षीय मित्र बोलबच्चन प्रताप सरनाईक अशा शिवसेनेची भिस्त असलेल्या आमदारांमध्ये नारायण राणेंचा सामना करण्याची धमक नसल्याचे स्पष्ट झाले. नारायण राणेंबरोबर समोरासमोर वादविवाद करण्याची ताकद त्यांच्यात उरली नाही. राणे उभे राहताच शिवसेनेच्या बाकावर कमालीची शांतता पसरल्याचे दृश्य पाहावयास मिळते. राणेंना घाबरून नव्हे तर त्यांच्याबद्दल आदर असल्यामुळे शिवसेना आमदार त्यांना विरोध करत नाहीतअशी प्रतिक्रिया भाजपच्या एका आमदाराने दिली.
 
गेल्या आठवडय़ात नारायण राणे सभागृहात नसताना आदर्श प्रकरणात एका बातमीच्या आधारे ओढूनताणून राणेंचे नाव आणण्याचा प्रयत्न झाला. पणराणेंनी दुस-या दिवशी त्याचे खंडन करताना खालापूरच्या रेव्ह पार्टीत सुभाष देसाईंच्या मुलाचा व सुनेचा सहभाग असल्याचे स्पष्टपणे सांगितले. तरीदेखील शिवसेनेच्या एकाही आमदाराला विरोध करण्याचे भान राहिले नाही. राणेंनी शिवसेनेवर चढवलेल्या हल्ल्याचा प्रतिकार करणे सोडाच ते उभे राहिले कीशिवसेनेचे आमदार चवताळण्याऐवजी बावचळून गेल्याचेच दृश्य दिसते.

शिवसेनेत नारायण राणे आणि छगन भुजबळ असताना शिवसेना त्यावेळी खरोखरच ढाण्या वाघासारखी होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सभागृहात उल्लेख होताच शिवसेनेचे वाघ चवताळून उठायचे. सभागृह डोक्यावर घ्यायचे. जे सभागृहात नाहीत त्यांचे नाव घेता येणार नाही, असा सज्जड दम भरायचे. साहेबांचे नाव कामकाजाच्या नोंदीतून काढून टाकण्यासाठी एकच गोंधळ, गदारोळ व्हायचा. आकाशपातळ एक करायचे. शिवसेनेचे सुमारे सत्तर आमदार सभागृहात असायचे. पण 288 सदस्यांपेक्षाही त्यांची ताकद जास्त असायची. त्यांचा जोश, आवाज आणि आक्रमकता याच्या जोरावर सत्ताधा-यांना सळो की पळो करून टाकण्याची हिंमत त्यांच्याकडे होती. विधानसभा अध्यक्षांनी प्रसंगी नेम करून निलंबित केले तरी त्यासाठी त्यांची तयारी असे. सरकारच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवून घणाघाती हल्ले चढवण्याची ताकद होती. 1985 ते 90 या काळात शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले छगन भुजबळ यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर 285 भूखंडांचे श्रीखंड खाल्ल्याचा आरोप करून त्यांना नाकीनऊ आणले होते. या आरोपातून पवार सुटले आणि भुजबळ त्यांच्याच पक्षात दाखल झाले ही गोष्ट निराळी. नारायण राणे विरोधी पक्षनेते असताना त्यांनीही सरकारसमोर नेहमीच पेच निर्माण केले होते. अर्थसंकल्पावरील त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी तसेच जनतेच्या जिव्हाळय़ाच्या प्रश्नांनी सरकारची कोंडी करून टाकली होती. आता शिवसेनेचा तो जोश आणि आवाज उरला नाही. शिवसेना निष्प्रभ, निस्तेज आणि कमकुवत बनली आहे. सभागृहात आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याची ताकदही तिच्यात उरली नाही. शिवसेनेची घसरण होत गेली असून, सत्तर सदस्य संख्या 45 वर आली आहे. या खच्चीकरणामुळे विरोधी बाकावर शिवसेना चिडीचूप असल्याचे दृश्य दिसू लागले आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP