Saturday, December 17, 2011

भुजबळांमध्ये शिवसैनिक संचारला


भुजबळांच्या तनामनात सीमा प्रश्न मुरलेला असल्याने जेव्हा हा प्रश्न कुठे निघतो तेव्हा भुजबळ यांच्यातील शिवसैनिक जागा झाल्याचे पाहायला मिळते.

शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भुजबळ यांना 20 वर्षे झाली. 20 वर्षापूर्वी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असतानाच भुजबळ यांनी बंडखोरी केली आणि 18 आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र 20 वर्षामध्ये त्यांच्यात सुप्त वावरणा-या शिवसैनिकांचे अनेकदा दर्शन झाले. महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आला की, आपण सध्या सरकारमध्ये आहोत, याचा विसर पडल्यासारखे भुजबळ एकदम आवेशात येऊन भाषण ठोकतात. महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढय़ात त्यांनी स्वत: भाग घेतला होता. शिवसेनेमध्ये असताना त्यांनी सीमाभागातील लोकांसाठी झालेल्या अनेक आंदोलनात हिरिरीने भाग घेतला. मराठी नेत्यांना कर्नाटकात जाण्यास बंदी होती. सर्व सीमांवर पोलिस तैनात होते. अशा वेळी भुजबळांनी वेषांतर करून कर्नाटकात नाटय़मयरीत्या प्रवेश केला होता, असा भुजबळांच्या तनामनात सीमा प्रश्न मुरलेला असल्याने जेव्हा हा प्रश्न कुठे निघतो तेव्हा भुजबळ यांच्यातील शिवसैनिक जागा झाल्याचे पाहायला मिळते.

शुक्रवारीही बेळगाव महापालिका बरखास्तीवरून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्नाटक सरकारच्या निषेधाचा ठराव मांडला. त्यावेळी भुजबळांमध्ये त्या वेळचा शिवसैनिक संचारला होता. आपण सध्या मंत्री आहोत, सरकारमध्ये आहोत आणि शिवसैनिक नसून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहोत, याचा त्यांना विसर पडला की काय असाच त्यांचा आविर्भाव होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अनेक शिवसैनिकांचा त्यांनी मुक्तकंठाने गौरव केला. सीमाभागातील रहिवाशांच्या व्यथा-वेदना मांडत असतानाच शिवसैनिकांनी मराठी माणसांसाठी कशा लाठय़ा-काठय़ा खाल्या आणि सीमाभागातील मराठी माणसांनी हौतात्म्य पत्करले हे त्यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत आणि तेवढय़ाच पोटतिडकीने सभागृहात सांगितले. ते म्हणाले, कर्नाटक सरकार कुणाचेही असो, तेथील मराठी भाषिकांवर अन्याय होतच असतो. त्याबद्दल दु:ख, नाराजी आणि संताप त्यांनी वेळोवेळी व्यक्त केला आहे. 1969 साली या लढय़ात 68 जण मृत्युमुखी पडले. या लढय़ासाठी आयुष्य झोकून देणारे बेळगाव ‘तरुण भारत’चे बाबुराव ठाकूर यांनी शेवटचा श्वास घेताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हात हातात घेऊन हा लढा पुढे चालवण्याचे वचन त्यांच्याकडून घेतले आणि बाळासाहेबांनीही दिलेल्या शब्दाप्रमाणे ही लढाई लढली. विनोद घोसाळकर, दगडू सकपाळ, शिशिर शिंदे इत्यादी शिवसैनिकांनी या लढय़ात भाग घेतला होता. भुजबळांकडून असा शिवसेनाप्रमुख आणि शिवसैनिकांचा गौरव होत असताना समोरील शिवसेना सदस्य बाके वाजवून स्वागत करत होते. तर सत्ताधारी बाकांवरील सदस्य भुजबळांमध्ये संचारलेला शिवसैनिक विस्फारलेल्या नजरेने पाहत होते.
 
बेळगाव महापालिका बरखास्त केल्याचे पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले. सकाळी कामकाज सुरू होण्यापूर्वीच शिवसेना आमदारांनी विधान भवनाच्या दारात या बरखास्ती विरोधात निदर्शने केली. अपेक्षेप्रमाणे विधिमंडळाची दोन्ही सभागृह सुरू झाली तेव्हा हा विषय उपस्थित करण्यात आला. विधानसभेत विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे तर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर यांनी हा विषय उपस्थित केला. सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांनी या विषयीच्या भावना व्यक्त करून बेळगाव येथील मराठी बांधवांना आधार देण्यासाठी आणि तेथील सरकारच्या मराठी विरोधी धोरणाचा निषेध करणारा ठराव सरकारने सभागृहात मांडावा, अशी मागणी करण्यात आली.

कर्नाटक सरकारच्या जुलूमशाहीचा निषेध नोंदवणारा ठराव मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत मांडला. तर विधान परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा ठराव मांडला. सीमाभागातील मराठी माणसांवर होणा-या अन्यायाचेच प्रतिबिंब दोन्ही सभागृहांत उमटले असल्याने वातावरण अत्यंत गंभीर होते. मात्र त्यातही राजकारण झालेच. ज्या प्रमाणे कर्नाटक सरकारने घटनाबाह्य निर्णय घेऊन महापालिका बरखास्त केली त्याचप्रमाणे कर्नाटकातील भाजप सरकार बरखास्त करावे, अशी मागणी भाजपवगळता सर्वच पक्षांच्या सदस्यांनी केली. मात्र या मागणीवर भाजप सदस्यांची अवस्था केविलवाणी झाली होती. मित्रपक्ष शिवसेनेसह सर्व पक्ष एका बाजूला आणि भाजप एकाकी असे चित्र दिसले.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP