Friday, February 10, 2012

रिपाइंला ‘हाता’चा फटका, ‘हत्ती’चा झटका


शिवसेना-भाजप-रिपाइं महायुती प्रचाराचे ढोल बडवत असले तरी, आठवले यांची आरपीआय दलित मतांपासून वंचित राहण्याची चिन्हे आहेत.

मुंबई- शिवसेना-भाजप-रिपाइं महायुती प्रचाराचे ढोल बडवत असले तरी, रामदास आठवले यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दलित मतांपासून वंचित राहण्याची चिन्हे आहेत. दलितांची परंपरागत एकगठ्ठा मते काँग्रेसकडे असून दलितबहुल मतदारसंघामधील रिपाइंकडे जाणारी मते बहुजन समाज पार्टीकडे वळण्याची शक्यता आहे. या मतविभाजनाचा फायदा यावेळी काँग्रेसलाच मिळणार असून, यावेळी हाताचा फटका आणि हत्तीचा झटका बसेल की काय, याची धास्ती रिपाइं कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
 
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी, रिपब्लिकन पार्टी, अखिल भारतीय सेना या लहान पक्षांच्या अस्तित्वालाच धक्का बसला आहे. बसपच्या धारावीतील प्रभाग क्रमांक 175 मध्ये पारुबाई कटके या एकुलत्या एक नगरसेविका होत्या. त्यादेखील काँग्रेस पक्षात गेल्यामुळे बसपाचे पालिकेतील अस्तित्वच संपुष्टात आले होते. परंतु आठवलेंच्या रिपाइंने महायुतीत प्रवेश केल्यामुळे बसपच्या आशा पल्लवीत झाल्या. रिपाइं मतांची जागा आपण भरून काढू, असा विश्वास वाटल्याने या पक्षाने 140 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. याउलट रिपाइंला शिवसेना-भाजप युतीने केवळ 29 जागा दिल्या आहेत.

त्यामुळे या जागांवरील मतांचे विभाजन तसेच अन्य जागांवरील दलित मते काँग्रेस, बसप, भारिप बहुजन महासंघ तसेच, पीपल्स रिपब्लिकन पक्ष यांच्यामध्ये विखुरली जातील. आठवलेंचे तीन नगरसेवक होते, त्यापैकी दोघांना काँग्रेसने उमेदवारीही दिली. मात्र बाबा बनसोड हे एकमेव निष्ठावंत रिपाइंसोबत राहिले. मात्र त्यांना महायुतीत उमेदवारी दिली नाही. हा प्रभाग महिला राखीव झाल्याने पत्नीला उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा होती. मात्र तेही हाती न पडल्याने त्यांच्या पत्नीने बंडखोरी करत आठवलेंना झटका दिला आहे. सपच्या सात नगरसेवकांपैकी आस्मा शेख या राष्ट्रवादीमध्ये गेल्याने त्यांची संख्या सहा झाली आहे. सपचे अस्तित्व केवळ मानखुर्द-गोवंडी, या अबू आझमींच्या मतदारसंघात असले तरीदेखील त्यांनी 125 उमेदवार उभे केले आहेत

1 comments:

PRAFUL GORAKH KAMBLE February 10, 2012 at 11:47 PM  

रामदास आठवले आहे काय किंवा नाही काय? परंतु महायुती मुले जर कोणाचा फायदा होणार असेल तर तो मनसेचा..
बसपा हवा तितका प्रभाव याही वेळी टाकेल याची शाश्वती नाही. कारण बसपाचे दिशाहीन प्रदेश नेतृत्वामुळे संघटनात्मक
दृष्ट्या बसपा प्रभाव हीन पक्ष आहे. बसपात टिकट कश्या विकल्या जातात हे कळण्या इतपत आंबेडकरी समाज दुध खुला
राहिला नाही. महायुती मुले निराश झालेला आंबेडकरी समाज न युती न आघाडी सरळ मनसे करणार यात कोणतीही शंका
वाटत नाही.

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP