Sunday, February 12, 2012

मतांचे घोटाळे करी महायुतीचे वाटोळे

साक्षात शिवसेनाप्रमुखांना प्रचार यात्रेत उतरवले असले तरी मतांच्या घोटाळ्यांमुळे या महायुतीचे वाटोळे होण्याचीच चिन्हे दिसू लागली आहेत.

मुंबई- शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीने प्रचाराची राळ उडवून दिली असली आणि साक्षात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रचार यात्रेत उतरवले असले तरी मतांच्या घोटाळय़ांमुळे या महायुतीचे वाटोळे होण्याचीच चिन्हे दिसू लागली आहेत. या तिन्ही पक्षांच्या मतांचे एकमेकांच्या पायात पाय अडकवण्याचे उद्योग सुरू असल्यामुळे महायुतीचे नेते अस्वस्थ असल्याचे समजते.

महायुतीला अंतर्गत राजकारणाने ग्रासले असल्यामुळे कोणाची मते, कोणाकडे जाणार याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. शिवसेना-भाजप युतीमध्ये प्रचंड बेबनाव असून शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीमुळे भाजपमध्ये कायमच असंतोष आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी संधान बांधून शिवसेना गोटात अस्वस्थता निर्माण केली आहे. राज ठाकरे यांनी देखील भाजप कार्यालयाला भेट देऊन आणि नरेंद्र मोदींचे निमंत्रण स्वीकारून सलगी वाढवली. त्यामुळे भाजपची मते शिवसेना उमेदवाराला मिळण्याऐवजी मनसेच्या पारडय़ात पडतील. आणि शिवसेनेची मते, भाजप ऐवजी पूर्वीच्या मैत्रीशी इमान राखून मनसेकडेच वळतील. त्यामुळे मनसेचे इंजिन शिवसेना-भाजपच्या मतदारसंघात जोरात धडधडण्याची शक्यता मनसे नेते व्यक्त करत आहेत.

मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांच्यामते, काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी नसताना राष्ट्रवादीची मते मोठय़ा प्रमाणात मनसेकडे आली होती. मात्र, यावेळी आघाडी झाली असली तरी आम्हाला चिंता नाही. शिवसेना-भाजपची मते इंजिनाकडेच आकर्षित होतील, अशी खात्री आहे.
 
रिपाइंकडील दलित मते युतीकडे वळणार नाहीत आणि युतीची मते रिपाइंकडे जाणार नाहीत. त्यामुळे महायुती असली तरी मतांची विभागणी मोठय़ा प्रमाणात होण्याची चिन्हे दिसत आहेत. युतीचा महापालिकेतील भ्रष्ट कारभारही त्यांचे चांगलेच वाटोळे करेल. सलग 15 वर्षे युतीची सत्ता असूनही शाळा, पाणी, उद्याने, मैदाने, मलवाहिन्या, कचरा या प्राथमिक नागरी सुविधा पुरवल्या नसल्याची एक प्रकारे कबुली युतीने वचननाम्याद्दारे दिली आहे. त्यातच मनसेने विधानसभा निवडणुकीत युतींच्या मतांवर डल्ला मारला असल्यामुळे यावेळी सत्ता येईल की नाही, याबद्दल युतीच्या नेत्यांना शंका आहे. त्यामुळेच गेल्या 2-3 वर्षात तिजोरीची लूटमार हा एककलमी कार्यक्रम त्यांनी राबवला आहे.

शिवसेनेचे अष्टप्रधान मंडळ जाऊन त्यांची जागा मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई यांच्यासारख्या प्रशासकीय मंडळींनी घेतली असल्याने केवळ चिरकूट उद्घाटने करण्याची वेळ कार्याध्यक्षांवर आली आहे. मग वाटोळे होणार नाहीतर काय?

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP