Wednesday, February 15, 2012

काँग्रेसचा हात, मुंबईकरांची साथ!


काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचाराला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता मुंबईकरांची काँग्रेसच्या विकासाला साथ देण्याची मानसिकता बनली असल्याचे चित्र आहे.

मुंबई- मुंबई महापालिकेची सत्ता गेली 15 वर्षे उपभोगणा-या शिवसेना-भाजप युतीमध्ये पडलेले अंतर आणि रिपाइंला युतीशी जोडल्यामुळे निर्माण झालेला असंतोष तसेच, मनसेमुळे शिवसेनेच्या मराठी मतांचे झालेले विभाजन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पथ्यावर पडले आहे. 

काँग्रेसला त्यांची परंपरागत दलित-मुस्लिम मते तसेच अमराठी मते तर मिळतातच पण मराठी मतेही त्यांच्याकडे वळली आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचाराला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता मुंबईकरांची काँग्रेसच्या विकासाला साथ देण्याची मानसिकता बनली असल्याचे चित्र आहे.

मुंबई शहरात पाच खासदार काँग्रेसचे तर एक राष्ट्रवादीचा मिळून सर्व सहा खासदार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे आहेत. एकूण 36 आमदारांपैकी आघाडीचे 19 आमदार आहेत. मुंबई महापालिकेत मागील निवडणुकीत काँग्रेसचे 79 नगरसेवक होते. 102 ठिकाणी काँग्रेस दुस-या क्रमांकावर होती. यावेळी प्रथमच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाल्यामुळे काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे. आघाडीवर विश्वास ठेवून सलग तीन वेळा राज्याची सत्ता जनतेने आघाडीच्या हाती दिली आहे. निवडून आल्यानंतर मतदारसंघातील विकासकामांवर आमदार-खासदारांनी भर देऊन लोकांचा विश्वास मिळवला आहे. मेट्रो व मोनो रेल प्रकल्प दोन वर्षात पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहेत. 

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील एमएमआरडीएने पायाभूत सुविधा व विकास प्रकल्प यशस्वीरीत्या राबवले आहेत. लंडनच्या धर्तीवरच मुंबईतही रिंग रोड करण्याची योजना मुख्यमंत्र्यांनी आखली आहे. केंद्राने भरपूर निधी देऊनही महापालिकेच्या अखत्यारीत असलेले ब्रिमस्टोवॅड, मलवाहिनी प्रकल्प, मिठी नदी प्रकल्प पाच वर्षात पूर्ण झाले नाहीत. मूलभूत नागरी सुविधांपासून मुंबईला वंचित ठेवणा-या युतीला कंटाळलेली जनता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला कौल देईल, अशी चिन्हे दिसत आहेत.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP